Showing posts with label कविता...स्वच्छंद. Show all posts
Showing posts with label कविता...स्वच्छंद. Show all posts

Friday, 22 May 2020

वारूळ नवे- जुने


मन एक वारूळ जणू
जखमांचे, जखमांवरील खपल्यांचे
अनेक वार, काहीसे घाव
कोण जाणे एखादा आघातही
कोण्या एकट्या क्षणी वारूळ फूटावे
अन एकापाठी एक याव्या बाहेर
जखमा भळभळणाऱ्या, खोलवर रुतलेल्या
काही चिघळलेल्या, काही चघळलेल्या
त्यांतही चुरस कोण कोणापेक्षा मोठी
एकेकीला मग करायचे बोलते
एखादी निमूट गप्प दोन वाक्य बोलून
एखादी बोलूच देत नाही इतरांना
कोणी मोकळ्या होऊन जातात विरून
काही दगड झालेल्या सोसून सोसून
तरीही खपली निघाली तर भुणभुण करणाऱ्या
काही हळव्या टचकन डोळे ओलावणाऱ्या
वारूळ फुटले की सगळ्याच बाहेर पडतात
काही चिरडल्या जातात, भरडल्या जातात
काही फक्त मागे व्रण ठेवून जातात
काही ओले घाव आणखी खोल करतात
काही जातात निघून कायमच्या
तर काही...काही पुन्हा नवे वारूळ बांधतात
ते नवे वारूळ असते की असतो फक्त आभास
जुन्याच जखमांवर नवीन खपल्या आणि नव्याचा भास

Saturday, 4 January 2020

अरसिक



अगदीच नाही झाले अरसिक रुक्ष वगैरे

पण आताशा नाही तो उत्साह

रहाटगाडग्यात गुरफटले की

अपेक्षाभंगाने केले नीरस?

घेण्याचा आनंद नाही म्हणून

आता सापडू लागला तो देण्यात?

बक्षीस म्हणा की कौतुक

सन्मान असो की शाबासकी

ओंजळ भरलीच नाही आणि

तरी होत चाललीये रिकामी?

हेच असतं का गमक मोठेपणाचं?

औदार्याचं की नुसतंच वय वाढण्याचं?

Friday, 10 May 2019

कर्ण-वृषाली भेट



काही दिवसांपूर्वी कर्ण-वृषाली भेटीची काल्पनिक गोष्ट वाचलेली... त्यावर आधारित मी रचलेली छोटीशी कविता

अश्व दौडे चंपानगरी, आनंदी आज स्वारी
कित्येक वर्षांनी जाऊ घरी, दोन क्षण घुटमळे गंगातीरी
तांबूस रंग पसरुनी चौफेर, सूर्यनारायण क्षितिजावर
तीच लालिमा नभावर, चित्र जुनेच मनावर
गंगामाईच्या कुशीत बालपण, खेळगडी-सोबती-बंधू शोण
शंख शिंपले आणि पोहणं, मध्यान्हाचे राही भान
राधाईची साद कानी, वृषालीची आठवण मनी
कर्ण थबकला एका क्षणी, हाती लगाम आवरुनी
जाता परिचित मार्गांनी, काठावर दिसे एक तरुणी
जलकुंभ डोईवर धरुनी, पाहता नजर रोखुनी
कानी पडला मधुर स्वर, वाट चुकला का धनुर्धर?
हसून मनोमन दिले उत्तर, स्वगृहाचा कधी पडतो विसर?
उत्तरे-प्रत्युत्तरे चालली, एकमेका ओळख पटली
डोळ्यांची भाषा कळली, बालपणीची वसु भेटली
लटका राग नाकावर, चालू लागली वाटेवर
पत्र धाडले आजवर, माझी नाही अगदी फिकीर
काय बोलतो कुमार, स्नेह जडलेलातीवर
करुनी हलके स्मित, अंगराज प्रवेशला नगरीत

Monday, 8 April 2019

दुरावा

आज गुपचूप आले दोन हुंदके
ऐकणारे कोणी नाही म्हणून माघारी गेले
तेवढ्याच अलवारपणे
तू जातेयस पुन्हा दूर
पहिल्यासारखी...
जिथून सुरुवात झालेली आपल्यातील
पडत जाणाऱ्या अंतराची
न मिटणाऱ्या, न दिसणाऱ्या
वाढत जात होते, डोळ्यांना दिसत नसले तरी
जाणवत मात्र होते...
मी करत राहिले मूक आर्जव
मूकच होते ते, कसे पोहोचणार तुजपाशी
मीही प्रयत्न केले नाही ती दरी मिटवण्याचे
आक्रोश तुला ऐकू येणार नाही 
अशी एवढी घट्ट समजूत झाली की
तुझ्या नसण्याची होऊ लागली सवय
हाकेच्या अंतरावर आलीस तरी
आपलेपणा वाटला नाही,
कसा कोण जाणे...
तुझ्या जवळ येण्याचा खरेपणाही
आता भासू लागला एका मृगजळासमान

Sunday, 31 March 2019

फुटक्या आरशात...



एका वेड्या मुलीने गावात फिरताना पाहिले सहज,
रस्त्यावर पडलेल्या फुटक्या आरशात स्वत:ला...
उन्हात फिरून चेहरा काळवंडलेला,
डोक्यावर घेऊन मानेभोवती रुमाल लपेटलेला ...
खांद्यावर लटकवलेली कधीकाळी लाल रंगाची असलेली,
ब्रँडेड बॅग पण आता विटकरी रंगाकडे झुकलेली...
पार्लरसाठी खर्चलेले हजार रुपये तिसऱ्या दिवशी व्यर्थ
वीस वर्ष शिकून घेतलेल्या डिग्रीला नोकरी पुरताच अर्थ...
तापलेले रस्ते तुडवत, नकाशातून वाटा धुंडाळत
सोबत चार विश्वासू मुलींना घेऊन होती दारोदार हिंडत...
इथे प्रत्येक दिवशी भेटत नवी माणसे, नवे अनुभव
नवे चेहरे, कधी अशिक्षिताकडून एक नवी शिकवण...
जगाच्या शाळेत तुजसम असतील बहू,
नको वेडे तू उगाच तुझ्या भ्रमात राहू...
एकदा पुन्हा त्या फुटक्या आरशात नीट पहा,
पण अंतर्यामी डोकावून जाणून घे स्वत:ला,
कष्ट कर, कर्तृत्वाचा ठसा उमटवून मग मिरव
वेगळेपण तुझ्यातील दिसू दे जगाला...
~ मेघा निकम

Wednesday, 22 August 2018

आठवणींचा कप्पा

कधीतरी वर्ष दोन वर्षातून एखादा दिवस मोकळा मिळावा,
मुद्दामहून सगळा पसारा बाहेर काढावा,
एकेका फायलीमध्ये ठेवलेले एवढाले चिटोरे आणि त्यावरील तारखा,
एकटीनेच जाऊन पाहिलेल्या त्या नाटकाचे हे तिकीट..
अरेच्चा..! ७ वर्षे झाली का या सहलीला,
बापरे! गेल्यावर्षी याच दिवशी केवढा पाऊस झालेला आणि आपण अडकलेलो रेल्वेमध्ये १५ तास,
आणि ही दंड म्हणून भरलेल्या ज्यादा फी ची पावती, हे स्वतःच्या पहिल्या कमाईतून घेतलेल्या कॅमेराचे बिल....
नको असलेले कागद बाजूला काढून काही आठवणी जपून
फायली जाव्या पुन्हा कपाटाच्या एका खणात,
हाती लागावी एक छोटी बाहुली दुसऱ्या क्षणात,
बाहुलीच्या गोष्टी आठवत मांडला जावा चहा,
चहाच्या उकळीसोबत अनेक क्षण मनात दाटतील पहा,
पाचवीमध्ये रंगवलेले मोराचे चित्र आणि रंगपेटी,
मैत्रिणीने दिलेल्या रंगीत पेन्सिली,
तिच्याकडूनच काढून घेतलेले गणपतीचे चित्र,
बचतपेटी बनवून त्यात साठवलेली नाणी आणि बरेच काही!
आणि चिंचा बोरे आवळे आणून देणाऱ्या सख्या,
शाळेतल्या मैत्रिणींना भेटलेच नाही ना किती दिवस,
विचार मनात यावा,
दिवस कसले वर्षे निघून गेली भराभर....
चहाचे घोट घेत घेत कपड्यांचा कप्पा रिकामा करावा,
सणावाराला, वाढदिवसाला घेतलेला तर कधी हट्टाने मागितलेला ड्रेस आणि मग त्यावेळी केलेली रडारड,
सगळं सगळं आठवून खुदकन हसावं..
घराच्या वास्तुशांतीला घातलेला तो घागरा..
आणि ताईच्या लग्नात नेसलेली साडी,
लोकांनी केलेले कौतुक आणि आजीने काढलेली दृष्ट ...
आता पुस्तकांच्या कपाटाकडे वळावे,
फक्त वयानेच नाही तर मनाने, विचारांनीही
आपण कसकसे मोठे झालो ते या पुस्तकांकडे पाहून समजावे,
मग हळूहळू चंपक, इसापनीती, तेनालीरामच्या गोष्टी
आणि पु.ल., वपु, जीएंच्या पुस्तकांवरून हात फिरवावा,
नव्या जुन्या पुस्तकांची पाने उलगडून त्याच्या सुगंधात रमावे,
आणि एखाद्या पुस्तकात ठेवलेले आजीला बाबांनी लिहलेले पत्र मिळावे,
तेवढ्यात तिकडून मोबाईल खणखणावा,
आणि यावेळी फक्त आईचाच आवाज यावा,
तिच्यासोबत बोलता बोलता थंड झालेल्या अर्धा कप चहाचा आठव व्हावा आणि
तिन्हीसांजेला पश्चिमेवर झालेली रंगाची उधळण पाहून आठवणींचा कप्पा
काही महिने अथवा वर्षभरासाठी पुन्हा बंद करावा...
~ मेघा निकम

Monday, 26 February 2018

आयुष्याच्या संध्याकाळी

ते आधी खूप रमतात
भरपूर मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांमधे
ओळखीच्या माणसांमध्ये
गप्पा गोष्टी सुख असतं...
आपुलकी असते, विचारपूस असते..
सूख असतं तोवर सगळेच आपले!
आणि मग चोरपावलाने दु:ख येतं
हळूच मागच्या दाराने...
आता तीच "आपली" माणसे
चौकशी करू लागतात!
भेटलो असतो पण आता जरा
"व्यस्त आहे हो" म्हणतात..
आपल्या अपयशाची चवीने चर्चा
मात्र आपल्यापाठी करत असतात!
उबग येतो त्यांना सर्वांचाच
दूरदेशी निघून जातात ती!
तिकडे सगळे अनोळखी
त्यांच्या भूतकाळाबद्दल अनभिज्ञ..
स्वत:ची नवी ओळख जपत
सावरतात अन् विसरतात सारे दु:ख..
मन तिकडेही रमतेच की
स्वच्छंद विहार ,मोकळा श्वास!
वर्षे उलटून जातात मनमुराद जगताना
अन् स्वत:ला 'पदोपदी' सिद्ध करताना..
दमछाक होते आता रोज
दुनियेला ओळख पटवून देताना!
'ओढ' जाणवते आपल्या मातीची
अन् त्या मातीत खेळलेल्या सवंगड्यांची..
आपली माणसे ती आपलीच
आणि "तीच" असतात आपली!
परतायची वेळ होते तेव्हा
आकाश असतं निरभ्र...
अन आता सर्वांचेच
डोईवरील केस शुभ्र...!
हेवेदावे, मत्सर आता कुणी करत नाही...
(आयुष्याच्या)संध्याकाळी पार्कातले हितगुज चुकत नाही...
कारण तोवर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं...
जगायचं जगायचं म्हणताना खरं जगणंच राहून गेलेलं असतं...
- मेघा निकम

Wednesday, 25 October 2017

मला नाही भेटायचे आता तुला!

तुला एक सांगू का?
मला नाही भेटायचं आता तुला!

आपण महिना-दोन महिने पाहत नाही एकमेकांना
किती छोट्या गोष्टी असतात, बऱ्याचवेळा निरर्थक,
भांडतो त्यावरून आपण दोन दोन दिवस
रुसून बसतो आपण एकमेकांवर
बस्स झाले आता हे सगळे, मला नाही भेटायचं आता तुला!

तुझी पाठ दुखते माहित आहे मला
आणि नाही आवडत मला हे
तू फक्त मला भेटण्यासाठी
सहा तास बसचे हेलकावे खातोस ते
मलाही एका दिवसाच्या सुट्टीत
एवढ्या दूरचा प्रवास करणे नाही जमत
बस्स झाले आता हे सगळे, मला नाही भेटायचं आता तुला!

भेटल्यावर कोणीतरी पाहिल
म्हणून गावापासून दूर जायचे
बाहेर भेटतोय म्हणून चुकुनही
हातही हातात नाही घ्यायचे
कशाला हवा मग एवढा खटाटोप
बस्स झाले आता हे सगळे , मला नाही भेटायचे आता तुला!

भेटल्यावर मांडायचे महिनाभराचे हिशोब
ताळेबंद होता होत नाही
मागचे गैरसमज दूर करता करता
नवीन गैरसमज आणि मग रडारड
तुझी होत नसेल पण मी रडतेच
नेहमीप्रमाणे मनातल्या मनात
बस्स झाले आता हे सगळे , मला नाही भेटायचे आता तुला!

निरोप देताना पुन्हा डोळे पाणावतात
नंतर कधी भेटू ते सांगता येत नाही
या गोष्टीचा कंटाळा आलाय मला
बस्स झाले आता हे सगळे
मला नाही भेटायचे आता तुला दोन चार तासांसाठी!
मी येतेय राहायला तुझ्यासोबत
कधीही दूर न जाण्यासाठी
पुन्हा या अशा भेटींचा खेळ नाही मांडायचा मला
बस्स झाले आता हे सगळे , मला नाही भेटायचे आता तुला!
- मेघा 

Tuesday, 12 September 2017

ती आज एकटी

भयाण शांत खोली, कोंदट कुबट..
ती बावरलेली...
जोरदार पाऊस,सोसाट्याचा वारा...
ती घाबरलेली..
नव्या गावात ती आज एकटी,
एकाकी रात्र सरण्याच्या प्रतिक्षेत...!!

पंखा नाही, दारे खिडक्या बंद
ती घामेजलेली...
मोबाईल नेटवर्क नाही, बैटरी उतरलेली
ती वैतागलेली...
सर्वांपासून दूर ती आज एकटी
वीजप्रवाह सुरू होण्याच्या प्रतिक्षेत..!!

अनोळखी चेहरे, अनामिक सावल्या
ती बिचकलेली...
एकीकडे खट्, दुसरीकडे फट्...
ती बिथरलेली...
अंधाऱ्या घरात ती आज एकटी
उद्याच्या  सोनेरी किरणाच्या प्रतिक्षेत..!!

Saturday, 24 December 2016

लेखाजोखा

उजाडता एक दिवस
मी मागे वळून पाहतो...
सरत्या वर्षाचा लेखाजोखा
न ठरवता मांडतो...
जोडलेली तोडलेली नाती
गावाकडची माती
भेटलेली सुटलेली माणसे
शेतातील कणसे
बांधलेली तुटलेली घरे
नक्षीदार दारे
गोड कडू आठवणी
लेकीची पाठवणी
सोप्प्या अवघड परीक्षा
विनाकारण शिक्षा
पुऱ्या-अपुऱ्या कथा
संसारातील व्यथा
उरले सुरले प्रश्न
यशापयशाचे जश्न
डोळ्यासमोर झरझर
एक पट उलगडतो
उगवत्याचे स्वागत करायला
मावळत्याला निरोप देतो...
~ मेघा

Thursday, 1 December 2016

शोध क्षितिजाचा

ठराव पास होतो एक तिच्या मनात,
सुरु होतो प्रवास दूरच्या देशात...
गर्दी-आवाज-कुजबुज-कोलाहल सर्वांच्या पार,
मागे पडत जातात मनीचे असंख्य विचार...
शहर सुटले की मोकळे दिसतात रस्ते,
निसर्गाच्या सानिध्यात मनही होते रिते...
नव्या प्रदेशात सगळे अनोळखी चेहरे,
गावात-रानात-दुकानांत होतात तिचे दौरे...
आता हे नवे चेहरे खुलू लागतात,
दुसऱ्या-तिसऱ्या भेटीत ओळखीचे वाटतात...
चहाच्या एका कपात मिळतो मायेचा ओलावा,
दोन क्षणांच्या भेटीत लाभतो आपुलकीचा ठेवा...
शेवटी नकोशी वाटणारी तरीही अटळ,
समोर उभी ठाकते ती निरोपाची वेळ...
निरोप घेतला जातो पुन्हा भेटण्यासाठी,
किंवा पुन्हा कधीच न भेटण्यासाठी...
जडावलेले पाय, डोळ्यांत दाटलेले आसू,
तरीही तिच्या ओठांवर कायम एक हसू...
पाठीवर टाकून अनुभवांच्या शिदोरीचे गाठोडे,
नव्या क्षितिजाच्या शोधात नवा प्रवास पुढे...
~ मेघा निकम

Thursday, 5 May 2016

गझल शिकताना...

सतत अस्वस्थ वाटत राहिले, तंद्री लागली किंवा नजर शून्यात… सवयीची कामे नकळत होऊन जातात पण नेमकी मनाची अवस्था उमजत नाही आणि अचानक काहीतरी सुंदर घडते. हाच तो क्षण…! निसटता निसटता चिमटीत पकडला जातो आणि हुरहूर कमी होते. रुणझुण शब्दांची चाहूल लागते.. आज असेच घडले.
गझल… या काव्यप्रकाराबद्दल मला  फार उत्सुकता होती. काहीतरी फार वेगळे असते पण नेमके काय ते माहित नव्हते. मग ऐकायला आणि वाचायला सुरुवात केली. जे गवसले ते फार सुंदर वाटले. आणि आज ही माझी पहिली गझल (कारण मला वाटले की ही कविता गझलेच्या आकृतीबंधात बसू शकते) कागदावर अवतरली. ही व्याकरणाच्या दृष्टीने किती बरोबर आणि किती चूकलीये ते काही माहित नव्हतं, पण काहीतरी नवीन सुचल्याचा आणि सापडल्याचा आनंद खूप झाला.  काहीतरी मोडके तोडके लिहिले आणि मित्र मैत्रिणींना वाचायला दिले. त्या ओळी अशा… 

सुख गोजिरे, स्वप्न साजरे कुणासाठी… 
अनामिक ही ओढ चिरंतन कुणासाठी… 
शब्द-सुरांच्या मैफिलीत परका आज मी
गीत हे प्रेमाचे रचतो  कुणासाठी ?
घरट्याचे स्वप्न मोडले रचण्याआधी
काडी काडी जमवे मन कुणासाठी?
दूरवरून दिसे तो डोह शांत नितळ 
आतल्या आत खोल ढवळे कुणासाठी?
निश्चयाचा बांध मना अन कठोर तटबंदी
निर्झर अनवट वाहतो कुणासाठी? 
तोडला धागा स्वत:च मी नात्याचा
मग आज मन अस्वस्थ कुणासाठी?
निरोप दिला तुज हास्यमुखाने
वळणावरी त्याच मी थांबलो कुणासाठी?

काही वेळाने लक्षात आले की आपल्या ओळखीची एक ताई आहे, तीची एक गझल वृत्तपत्रात वाचली होती.  मग तिला ही रचना वाचावयास दिली आणि गझलेच्या आकृतीबंधात बसते का विचारलं. तिने खूप छान समजावले. या रचनेला गझल म्हणता येणार नाही.  गझलेत ऱ्हस्व दीर्घ अक्षरांचा एक विशिष्ट क्रम सांभाळायचा असतो. आणि पहिल्या ओळीतील क्रम नंतरच्या प्रत्येक ओळीत आला पाहिजे. आणखी बरेच नियम असतात म्हणाली ती; पण आधी स्वरांची लय समजून घे असे तिने सांगितले. आणि शिकण्यासाठी, समजण्यासाठी  काही गझलकारांच्या गझला वाचायावयास सुचवले. 
अभ्यासाची सुरुवात आहे फक्त ही… मुळाक्षरे गिरवता यायला लागल्यावर बाराखडी, शब्द , वाक्य  आणि मग पुढचा धडा… शिकायला भरपूर आहे या जगात. एका भाषेचे एवढे कंगोरे… हा जन्म नाही पुरायचा पण सुरुवात तर झाली, हेही नसे थोडके!

Wednesday, 9 March 2016

सांजवेळ

संध्याकाळ… 
कोणाला खुणावणारी, कोणाला हसवणारी…
कोणाच्या डोळ्यात पाणी आणणारी, काहीशी हुरहूर लावून जाणारी ….
मला मात्र या मावळत्या दिनकराच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी… अशी ही संध्याकाळ… 


थोडावेळ सूर्यास्ताकडे पाहून मी माघारी फिरले आणि तेवढ्यात माझ्या  लक्षात आले, आणखी दोन क्षण न पाहते तर किती सुंदर दृश्य पाहण्यास मुकले असते कोण जाणे!!!



घरट्याच्या दिशेने जाणारा हा पाखरांचा थवा थोडा रेंगाळला… सूर्याला जणू प्रदक्षिणा घालत आहेत असा भास झाला...  कॅमेऱ्याची सोबत आहेच आणि आता तर शब्दांनीही सोबत केली हे क्षण साठवून ठेवायला..आणि नकळत मी पुटपुटले ... 
"अशाच एका सांजवेळी
नभी सोन्याचे कोंदण
सोन्याच्या गोळ्याला अन 
पाखरांची ती माळ मनोरम"

आजकाल अनेक कवितांच्या प्रेमात पडले आहे. स्पृहा जोशी, शांता शेळके यांच्या कविता, चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्या वाचायला मिळत आहेत याचा आनंद आहेच, शिवाय माझ्या शब्दकोशात मोलाची भर पडते आहे आणि असे काहीसे सुचते आहे...आणि आजच जीएंची पत्रवेळा हाती पडली… ते म्हणतात "खरं सांगायचं तर, मला काव्याची देणगी नाही, पण मिजास मात्र आहे!" व्वाह! 

Friday, 4 March 2016

तुझ्यावरच्या कविता

कविता कशा सुचतात गं तुला?
तू विचारल्यावर काय सांगू कळत नाही
तुझ्यावरच्या कविता लिहायला
तुझ्या आठवणींतून वेळ मिळत नाही
हल्ली दुसऱ्यांच्याच कविता वाचते फक्त
कवितेचा अर्थ मात्र आकळत नाही
त्यात शोधत राहते तुला आणि मला
माझे असे काही मला मिळत नाही
प्रेरणा कोण माझ्या कवितेची?
तूच आहेस ते तुला मात्र कळत नाही

-    मेघा

Tuesday, 9 February 2016

ती आणि तो

जुनी रद्दी तपासत होते त्यात एका कागदावर मीच केव्हातरी लिहलेली कविता सापडली. अशा माझ्या काही कविता खरंच रद्दीत गेल्या. त्या फार सुंदर नसतीलही कदाचित पण त्या त्या वेळच्या "माझी"च आठवण मला करून देणाऱ्या ठरल्या असत्या. आता कागद कुठेही गेले तरी काळजी नसावी म्हणून हा ब्लॉग वर जपून ठेवण्याचा अट्टाहास.  चार वर्षापूर्वी लिहली असेल मी ही कविता. अगदी सोप्प्या शब्दांत सहज मांडलेली रचना…
प्रत्येक मुलगी आपल्या घरात अगदी लाडात वाढलेली असते आणि तिच्या "बाबा"रुपी हिरो ने तिला भरभरून प्रेम दिलेलं असतं. ती कितीही "मी लग्न करणारच नाही" असे म्हणत असली तरी तिची तिच्या भविष्याबद्दल आणि जोडीदाराबद्दल काही स्वप्ने असतात. ही स्वप्ने कितपत खरी होतात, हे ती स्वप्ने रंगवणारी आणि जगणारीच जाणो!

तिच्या आयुष्यात एक तो असतो
जीवन सुंदर करणारा….
चांदण्याच्या प्रकाशात
हातात हात घेऊन चालणारा
तिच्या सौंदर्याचं अगदी
मनापासून कौतुक करणारा
तिचे अश्रू हातात घेऊन
ओंजळभर फुले देणारा…

तिच्या आयुष्यात एक तो असतो
जीवन सुंदर करणारा…
तिच्यासमोर तिच्यासारखाच
लटकं लटकं रागावणारा
तिच्या मनातल्या गोष्टी
पाहताक्षणी समजून घेणारा
स्वत:च्या मनातल्या गोष्टी
पहिल्यांदा तिलाच सांगणारा

तिच्या आयुष्यात एक तो असतो
जीवन सुंदर करणारा….
डगमगली कधी जर ती
आधाराचा हात देणारा
थकली श्रमाच्या ओझ्याने तर
पाठीवरून हात फिरवणारा
तिचे चुकते पाऊल फिरवणारा
जाणारा तोल सावरणारा

तिच्या आयुष्यात एक तो असतो
जीवन सुंदर करणारा….
तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
रात्रंदिवस धडपडणारा
स्वत:च्या स्वप्नातदेखील
तिला सोबत घेऊन जगणारा
तिच्या आयुष्यात असा "तो" खरंच असतो
की फक्त स्वप्नात भेटून जाणारा??

Thursday, 24 December 2015

नवे पर्व... नवा प्रवास...

२०१५ चे शेवटचे काही दिवस उरलेत … वर्ष सरताना नाही म्हटलं तरी गेलेल्या वर्षाचा मागोवा घेतला जातोच. या वर्षात अनेक महत्वपूर्ण गोष्टी घडल्या. माझ्यासाठी काही जग इकडचे तिकडे नाही झाले पण मला मिळालेली अनुभवाची शिदोरी नक्कीच मोठी आहे. 
                २०१४ ची जागृती यात्रा सुरु होती न त्या यात्रेसोबत मी उडीसाहून बिहारमधील नालंदा विद्यापीठाकडे प्रयाण करत असताना आम्ही ट्रेनमध्येच नवीन वर्षाचे स्वागत केले. त्याचदिवशी आम्ही आमच्या Water group तर्फे "save water" अर्थात "पाणी वाचवा" मोहीम राबवली. जागृती यात्रा उत्साहात पूर्ण केली आणि त्याचबरोबर नवीन लोकांशी मैत्रीही झाली. मला एक फ्रेंच मैत्रीण मिळाली
सुहानी… गुजरातमधील अहमदाबादहून यात्रेसाठी आलेली मुलगी माझी अगदी जवळची मैत्रीण झाली. अर्चना... एक हसतमुख सुंदर मुलगी मला आयुष्यभराची प्रेरणा व मार्गदर्शक म्हणून लाभली. जगावं तर तिच्यासारखं अशी मुलगी. 

त्यानंतरचा उल्लेखनीय प्रवास आणि अनुभव म्हणजे मलाजा… गुजरातच्या छोटा उदेपूर जिल्ह्यातील एक आदिवासी गाव … मी माझ्या मनाचा राजा, ना सवयीचा गुलाम, ना ही वेळेचा… अशी जीवनपद्धती असलेल्या राठवा कुटुंबात मी जगण्याची नवीन कला पाहत होते, शिकत होते, अनुभवत होते. दोन महिने रोज सकाळी आले, पुदिना किंवा गवतीचहा घालून बनवलेला कोरा चहा न चुकता समोर यायचा अन दिवसाची गोड सुरुवात व्हायची. हळद , मीठ, मिरचीची तेलात फोडणी देऊन केलेली कोणतीही भाजी आणि मक्याची भाकरी हेच रोजचे जेवण… कधी कधी आमटी-भात. आधी फक्त हातवारे करून सुरु झालेला संवाद हळूहळू शब्दांमध्ये व्हायला लागला. त्यांना आपली भाषा शिकवण्यापेक्षा त्यांचीच भाषा बोलणे सोप्पे पडले. माझ्या 'राठवी शब्दकोशा'त रोज २-४ शब्दांची भर पडू लागली. तिथे मला भेटलेली माझी माणसे म्हणजे भूरीबेन आणि विरीयाभाई. ते कधी माझे दादा-दादी झाले कळलेच नाही.
 
जगणे हे आपले उत्तरदायित्व आहे हे मी त्यांच्याकडून शिकले. दादीबद्दल मी या आधीही सविस्तर लिहले आहे. 

आनंदवनला भेट देण्याची माझी इच्छाही याच वर्षाच्या उत्तरार्धात पूर्ण झाली. जगण्याचं बळ मिळतं या प्रकल्पाला भेट दिल्यावर. बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खूप मोठे व्रत घेतले आहे. या कार्यात कोणत्याही रूपाने मला हातभार लावता आला तर मी माझे भाग्य समजेन. सहा वर्षांपूर्वी भेटलेल्या माझ्या अर्चूताईला मी या निमित्ताने पुन्हा भेटले. तिच्यासोबत तिच्या घरी असताना मला आपल्याच घरी असल्यासारखं वाटलं. तिच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे.

 हे सर्व पाहिलं की जाणवतं अजून खूप काही करायचं बाकी आहे आपलं… अखंड चालायला हवं…
              त्या प्रेरणेमुळेच की काय पण याच वर्षात मी एक नवीन प्रवास सुरु केला. दूर राहणारा पण सदैव सोबत असणारा कार्तीदादा भेटला मला. त्याच्या सोबतीने आणि निमित्ताने मी एका लहान मुलाच्या शिक्षणासाठी माझ्या परीने मदत करायला लागले. आपल्याला आपल्या आई-बाबांकडून खूप काही मिळाले, अगदी कशाचीच उणीव भासली नाही. मग एका होतकरू आणि गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आपला थोडा हातभार लागला तर आपल्याच जन्माचे सार्थक होईल. याचे श्रेय मात्र माझ्या या दादालाच. 
               प्रवास… कोणताही असो मग , प्रवासाची विलक्षण आवड असलेली मी या वर्षातील काही थरारक अनुभवांमुळे मात्र  थोडी वैतागले. अनपेक्षित अंगावर आलेल्या काही प्रसंगांमुळे माणूस घाबरतो… मीही थोडी घाबरलेच. सुट्टी असेल, project चं काही काम असेल किंवा सण -समारंभ, घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकाला प्रवास अपरिहार्य आहे.  त्यामुळे कुठेही थांबणे शक्य नाही… थांबले तरी पुढची मोठी झेप घेण्याकरता सिद्ध होण्यासाठी… सज्ज होण्यासाठी… काही दिवसांपूर्वीच Robert Frost ची एक कविता वाचनात आली.
Whose woods these are I think I know.   
His house is in the village though;   
He will not see me stopping here   
To watch his woods fill up with snow.   

My little horse must think it queer   
To stop without a farmhouse near   
Between the woods and frozen lake   
The darkest evening of the year.   

He gives his harness bells a shake   
To ask if there is some mistake.   
The only other sound’s the sweep   
Of easy wind and downy flake.   

The woods are lovely, dark and deep,   
But I have promises to keep,   
And miles to go before I sleep,   
And miles to go before I sleep.

                कितीही थांबावेसे वाटले तरी आपले इच्छितकार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा मैलांचा प्रवास करावाच लागेल. खूप आवडली मला ही कविता. नवीन वर्षात नव्या उत्साहाने नवीन प्रवासासाठी नव्या दिशेला जायला मी आता सिद्ध होत आहे.  तुम्हाला ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. तुमचाही हा प्रवास सुखाचा, आनंददायी आणि समृद्ध होवो.
चार वर्षांपूर्वी प्रवासात असतानाच मी लिहिलेली एक कविता….

प्रवास
कधी निसर्गाच्या सानिध्यात एकांतात
कधी आप्तेष्टांच्या सहवासात उत्साहात
प्रवास
कधी कधी आनंददायी रमणीय
तर कधी अगदीच कंटाळवाणा
प्रवास
कधी द्रुतगती मार्गाने सुसाट
कधी पायवाटेने अनवाणी
प्रवास
कधी नव्या दिशेचा शोध घेण्यासाठी
कधी मळलेल्या वाटाच पुन्हा तुडवण्यासाठी
प्रवास
     कधी फक्त मौज म्हणून
तर कधी त्याशिवाय गत्यंतरच नाही म्हणून
प्रवास
बसमधील असेल तर संपेल तासा- दोन तासांत
पण तरीही सुरूच राहील आयुष्याचा अखंड
प्रवास
जन्मापासून मृत्युपर्यंत माणसाच्या
की उत्पत्तीपासून लयापर्यंत ग्रह ताऱ्यांच्या ?
प्रवास
 एक कोडे याचे उमगलेच नाही मला
गणित सृष्टीचे सुटले का कुणाला?
प्रवास करताना विचार करते आयुष्याचा
की विचार करताना प्रवास करते आयुष्याचा?
~ मेघा


Friday, 11 September 2015

तुझ्यासवे...

सकाळ सांज ऊन सावली
                  खेळ तुझ्यासवे...
रंग आणि कुंचले
                  चित्र तुझ्यासवे...
सूर ताल शब्द
                 गीत तुझ्यासवे...
राग लोभ माया
                 प्रीत तुझ्यासवे... 

Friday, 4 September 2015

दौरा

काल गडकरी रंगायतन ला "आयुष्यावर बोलू काही" ची मैफिल होती. हा कार्यक्रम सुरु होऊन ऑगस्ट मध्ये १२ वर्षे पूर्ण झाली. तपपूर्ती विशेष कार्यक्रम म्हणून सध्या याचे आणखी काही कार्यक्रम सुरु आहेत. त्यातील एकातरी कार्यक्रमाला आपण जायचेच अशी माझी इच्छा होती. गेली ५-६ वर्षे मी या कार्यक्रमाला जाता येईल अशी संधी शोधत होते. पण सध्या मुंबईत राहत असल्याने हे सहज साध्य झाले. कार्यक्रम खूपच सुंदर आहे, असतो आणि कालही तेवढाच सुंदर झाला. मैफिल संपूच नये असा वाटत असतं पण ती संपते. एक अगदी नवं, आधी न ऐकलेलं गाणं ऐकवून सलीलसरांनी कार्यक्रमाची सांगता केली. या संपूर्ण कार्यक्रमातील एक मला भावलेली कविता… 
दौरा-- संदीप खरे 
कसले झाले आहे जिणे उनाड दुनियाभर
वारा बांधून देत नाही एका जागी घर
बैठक मारून बसत नाही एका जागी जीव
गावालाही उरलीच नाही आता कुठली शीव
सरकत येतात डोक्यावरती रोज नवे ढग
डोळे मिटून उघडेस्तोवर बदलून जाते जग
गाठण्यासाठी ठरल्या वेळी ठरलेला टप्पा
मैलांच्या या अटळ ठोंब्या दगडांशी गप्पा
जेव्हा मिळेल तेव्हा घास, जो जो मिळेल तो
सवयीनेच हात ओंजळ ओठांशी नेतो
असोशीने होत नाही क्षुधेचा उत्सव,
पाण्यालाही उरली नाही तहानेची चव
डोळे लाल, कोरडे ओठ आणि केस राठ
एक तुकडा जमिनीचा मागत राहते पाठ
कट कट हालचालींच्या हाडांचा आवाज
दुखरा मणका, माथी ठणका अन निद्रा नाराज
कसले सूर, कसले शब्द, कसली कलासक्ती
अहो गाढवासारखी वाटू लागते जगण्यावरची भक्ती
वर्ष काय विरून जाते क्षणाचीही खात्री
दर मैलावर दिसत राहतात चिरडलेली कुत्री
जड मन, जड जीभ, जड जड अंग
तसाच घ्यायचा चेहऱ्यावरती लावून थोडा रंग
ढवळून येतात सत्य, स्वप्न, दिवस आणि रात

दिसत राहतात फक्त टाळ्या वाजवणारे हात  

ही कविता स्वत:च सर्व काही सांगून जाते. खुपदा आपल्याला या कविता का आवडतात तर त्या आपल्या मनातील भाव हळुवार प्रकट करत असतात म्हणून. आपल्याला जे खूप आर्ततेने सांगायचे असते ते अगदी मोजक्या शब्दात त्या सांगून जातात म्हणून..