Saturday, 25 July 2015

भूरीबेन विरीयाभाई राठवा ऊर्फ "आमची दादी"

                    आमची दादी… मलाजा मुक्कामात पूर्ण दोन महिने आमची काळजी घेणारी आणि निरपेक्ष प्रेम करणारी ही एकमेव व्यक्ती… पहिल्या दिवशी मात्र तिला घरी पाहिलेले मला आठवत नाही. कुठे गेली होती कोणास ठाऊक? दादीचे जावई रामसिंगभाई भाषा केंद्रात काम करतात. त्यांच्या घरी आमची राहण्याची व्यवस्था केलेली होती. ते घरजावई असल्याने अर्थातच त्यांचे सासू सासरे म्हणजे विरीयाभाई आणि भूरीबेन यांच्या राहत्या घरी आम्ही  गेलो. विरीयाभाई सरकारी वन संशोधन केंद्रात काम करतात. आम्ही त्यांना दादाजी म्हणू लागलो. आणि भूरीबेन झाली आमची हक्काची दादीमा… 

              त्यांच्या भाषेत लहानांसाठी  तू आणि मोठ्यांसाठी तुम्ही असे वेगवेगळे संबोधन नसल्यामुळे बोलताना सर्वांशी एकेरी बोलतोय असं वाटायचं. पण हळूहळू त्याची सवय झाली. आणि दादीला हिंदी येत नसल्यामुळे तिच्याशी राठवी बोलताना तीचे एकेरी संबोधन होऊ लागले. पण त्यामुळे तिच्याबद्दल आपसूक जवळीक वाटू लागली. आमच्यासाठी दादी 'मकईनू रोटला' म्हणजेच मक्याची भाकरी करायची. रोटला एवढा मोठा असायचा की एकावेळी अर्ध्याच रोटल्यात पोट भरायचे.  पण अगदी चवदार… रुचकर आणि खमंग भाजलेला तो रोटला खाल्ला की अगदी तृप्त व्हायचो आम्ही. भाजी शक्यतो दारात लावलेल्या गवार, वांगे, दुधी भोपळा, कोबी किंवा बटाट्याची असायची. भरपूर तेल आणि हळद, चवीला थोडंसं मीठ आणि मिरची एवढाच काय तो भाजीचा मसाला! पाणी न घालता फक्त तेलावर शिजवलेली तिने केलेली भाजी विशेषत: वांग्याची भाजी खूपच छान व्हायची.
                  गव्हाच्या रोटीला ती 'गमनी रोटली' म्हणायची… तिने केलेली ती रोटली खाणे मात्र जिवावर यायचे. शक्यतो दुपारी कधी चपाती करायची असेल तर मीच करायचे. एकदा ती मला मदत करायची म्हणून आली. मी तिला म्हटलं "मी लाटून देते, तू भाजून घे." तिच्या पद्धतीने चपाती भाजताना चपातीला तेल लावत नसत. मी तेलाची किटली जवळ घेऊन बसले होते. दोन तीन वेळा चपाती उलटल्यावर तिला म्हटलं "तेल लाव थोडं" तिने पळीभर तेल ओतलं आणि चपाती जणू तळून काढली! नंतर माझ्या लक्षात आलं की तिला सांगण्याआधी मी करून दाखवायला हवं होतं. मग ती शिकली आणि नंतर बरोबर करायला लागली. पण तरीही तिने मक्याची भाकरीच करावी असा आमचा आग्रह असायचा. रात्री मक्याची भाकरी करून ठेवायची आणि आम्ही जेवायला उशीर करत असू तर "बेन, रोटला थी जो !" म्हणून आवाज द्यायची. 
                     चुलीवर स्वयंपाक करायला मला तिनेच शिकवले. याआधी कधी मी चुलीवर स्वयंपाक नव्हता केला. (एकदा आई कुठेतरी गेलेली असताना चुलीवर वांग्याचं भरीत तेवढं केलं होतं. मस्त झालं होतं कारण माझ्यासोबत ते खाल्ल्यावर शेजारच्या छोट्या मुलाने त्याच्या आईला हट्टाने ते शिकून घ्यायला सांगितलं होतं. आणि त्यादिवशी आम्हाला जेवण पुरलं नव्हतं.)



               तर ही माझी दादी रोज सकाळी सकाळी मला उठवायची चहा प्यायला.  बिनदुधाचा चहा मी तिच्या प्रेमाखातर दोन महिने दररोज घेतला. कधीकधी तर सकाळी लवकर केलेला चहा ग्लासमध्ये भरून गरम राहावा म्हणून ती चुलीत निखाऱ्यांवर ठेवायची. आणि मी उठल्यावर तो ग्लासभर चहा प्यायचे. नंतर नंतर तिने चहा बनवून ठेवण्याऐवजी सगळे साहित्य काढून ठेवायची. पातेले, गाळणी, पाणी आणि चहापत्ती (वाघबकरी मसाला चहा ) सगळं बाजूला काढून ठेवून मला हाक मारून मग तिच्या कामाला जायची. "बेन चा पिवो" असं दटावायची… साखरेला मोरुस, पातेल्याला तपेली, आणि चहाला चा म्हणायची तर गवतीचहाला लिली चा… कधी आले, पुदिना, गवतीचहाचा चहा प्यायची मला लहर यायची. मग मी स्वत: बनवून प्यायचे.

                    घरात नेहमी एकटीच असल्याने सतत कोणत्यातरी कामात ती स्वत:ला गुंतवून ठेवायची. घरातली सर्व कामे तीच करायची पण तरी ती तिच्या मर्जीची मालकीण होती. कसलीही तक्रार नाही. एखाद्या दिवशी खाटेवर पडून राहायची आणि मला म्हणायची "आज खूप काम आहे पण मी नाही करणार." तिच्यासोबत एकदोनदा मी शेतात गेले. तिला काम करताना पाहून माझ्या आईची आठवण झाली मला. माझी आईसुद्धा असंच काम करत असते दिवसभर. अखंड…
                           दादीने दारात अळू लावलेली होती. दर ४-८ दिवसांनी ती काही पाने काढून विकायला जायची. सोबत पुदिना आणि लिंबे पण विकायची. बाजारात गेल्यावर तिकडचे रस्ते पाहून तिचा गोंधळ व्हायचा म्हणून शक्यतो बाजारात न जाता बाजारपेठेच्या अलीकडेच दारोदार जाऊन ती ते विकायची. 


               
              एरवी घरात ओढणीच गुंडाळलेली असायची पण बाजारात जाताना मात्र छान साडी घालून जायची. निरोप घेताना तिला एक साडी दिली. ती स्वीकारताना बरेच आढेवेढे घेतले तिने पण "ती तुझ्याचसाठी आहे आणि तूच ठेव" म्हटल्यावर तिच्या डोळ्यातील जो आनंद होता तो लाखमोलाचा… 
              घरात तिचा दरारा होता, मनमानी होती, आपलं मत विचारणार पण स्वत:च्या मनाचंच करणार अशी तिची ख्याती होती. तिला मी काम करताना पाहिलं, ओरडताना पाहिलं, हसताना पाहिलं, रडताना पाहिलं तर कधी पदराआड अश्रू लपवतानाही पाहिलं. तिची जगण्याची उर्मी पाहिली.
              एकदा शेतात गेले असता मी तिला म्हटलं "मी तुला शिकवते, माझा फोटो काढ".  मला नाही जमणार मला नाही जमणार असं ती म्हणत असतानाही उगीचच तिच्या हाती कॅमेरा सोपवून दिला. आधी दोन - चार फोटो काढताना कॅमेरा हलला पण नंतर तिला जमलं. तिने काढलेला माझा हा फोटो.

तिला फोटो काढायला जमले याच्या आनंदाने फुललेला तिचा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही. त्याक्षणी ती जगातील सर्वात आनंदी व्यक्ती होती…. 



Tuesday, 21 July 2015

खंड्या...

खंड्या… 
             माझ्या मलाजा गावातील मुक्कामात खंड्या हा एक वेगळा chapter बनला. त्यामुळे त्यासाठी एक separate post पाहिजेच. प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषा बदलत जाते, याचे पक्षिविश्वाशी निगडित उत्तम उदाहरण म्हणजे खंडया पक्षी. किंगफिशर या पक्ष्याला काही लोक खंड्या म्हणतात, काही जण बंड्या, बंडू तर काही धीवर नाव सांगतात. पक्ष्यांची प्रमाण नावे शोधताना महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे कार्याध्‍यक्ष डॉ. राजू कसंबे यांनी या पक्ष्याला धीवर हे नाव दिले आहे. धीवर म्हणजे मासे पकडणारा... त्यामुळे आता खंड्या नाही; तर मराठीत धीवर या नावाने किंगफिशर ओळखला जाणार आहे.

              हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी आहे. हे पक्षी युरेशियात पसरलेला आहे तो बहुतांश बल्गेरिया, तुर्की, पश्चिम आशिया, भारतीय उपखंडापासून फिलिपिन्सपर्यंत आढळतो. लहान आकार, अत्यंत आकर्षक रंग, हे याचे वैशिष्ट्य आहे. छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक इत्यादी मुख्य खाद्य आहे. पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करून अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे.
            खंड्या हे सामान्य नाम असून या पक्षाच्या विविध जातींपैकी पांढर्‍या छातीच्या खंड्याला नुसते खंड्या या नावाने ओळखतात. याच्या इतर जातभाईंची नावे लहान खंड्याकवडा खंड्या , काळ्या डोक्याचा खंड्यातिबोटी खंड्याघोंगी खंड्या , मलबारी खंड्या अशी आहेत.
        स्थानिक राठवी भाषेत त्याला लक्कडखोद म्हणत होते. मलाजामध्ये राहायला गेल्यानंतर ५-६ दिवसांनीच पहिल्यांदा मी तिथे खंड्याला पाहिलं. त्या आधी एकदा मी पडवळपाड्याला एक खंड्या पाहिला होता. एका घरी household survey करण्यासाठी म्हणून मी गेले असता जवळील विहिरीतून तो उडून एका झाडावर बसलेला मी पाहिला. जसा तो मला पहिल्यांदा दिसला तसा तो अनेकदा दिसला. दिसला म्हणण्यापेक्षा माझी नजर त्याच्याच शोधात असायची असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हातात कॅमेरा असेल तेव्हा मी जेवढे जमतील तेवढे त्याचे फोटो काढले. पण जवळ जाताच तो उडून जायचा. आणि उडणाऱ्या खंड्याचे फोटो घेणे मला जमलेच नाही. पण उडताना त्याने पसरलेल्या पंखावर दिसणारा शांत निळा रंग पाहून मी भारावून जायचे, हरखून जायचे आणि पाहतच राहायचे. 

          
            या खंड्याची गंमत अशी होती की ज्यादिवशी आम्ही काम करेल त्याचदिवशी तो दिसायचा. इतर वेळी फक्त फिरायला म्हणून आम्ही बाहेर पडलो तर त्याचं दर्शन दुर्मिळ… नाहीतर असं व्हायचं जेव्हा आम्ही कामासाठी सकाळी बाहेर पडू आणि तो दिसला कि समजायचं आज आपलं काम नक्की होणार.
            एके दिवशी सकाळी सकाळीच शिवारफेरी साठी घराबाहेर पडलो. रस्त्यात अचानक दोन पक्षी दिसले. एवढे दिवस मला वाटायचं की या भागात एकच खंड्या आहे. तोच इकडे तिकडे फिरताना दिसतो. पण आज एकदम दोन दिसले आणि थोडा पुढे गेल्यावर त्याहून आकाराने थोडे मोठे असलेले आणखी दोन. आज माझी दिवाळीच होती. पण ते थोडे दूर असल्याने नीटसे टिपता आले नाहीत. पण त्यांना उडताना पाहण्याचा मात्र मी मनमुराद आनंद घेतला. ती लांब चोच, तो निळा आणि पिंगट रंग आणि कंठाचा शुभ्र पांढरा रंग… वा !! निसर्गाची किमयाच भारी… त्याच्यासारखी रंगसंगती दुसऱ्या कोणाला जमणार! 
             एके दिवशी छोटा उदेपूरला गेलो आणि दिवसभर कामासाठी फिरत राहिलो. छोटाउदेपूर हे जिल्ह्याचं ठिकाण असूनही तिथे हॉटेल किंवा रेस्टोरंटचा पत्ताच नव्हता. तिथला एका खमण स्पेशल दुकानातून घेतलेल्या एक प्लेट ढोकळ्यावर दिवसभर हिंडलो. घरी परत आलो तर येता येता माझ्या डोक्यात विचार चालू होते कामे तर चांगली झाली पण आज गावात फिरलो नाही त्यामुळे खंड्या काही दिसला नाही.. असं म्हणत म्हणतच मी घराचं ते लाकडी फाटक उघडलं आणि पाहते तर काय! खंड्या चक्क घरी…!!! घरासमोरील झाडांमध्येच उभ्या तिरप्या एका कळकावर तो बहुदा माझीच वाट पाहत बसलेला असावा.



   
दोन फोटो क्लिक केले. तो उडून गेला. मी खुश होते, आज तो दिसला याचे समाधान होते तर तो पुन्हा आला आणि लाईटच्या तारेवर येउन बसला. मला राहवले नाही , मी पुन्हा घरात जाऊन कॅमेरा घेऊन आले. भूक लागली होती. आवरून दुसऱ्या कामाच्या तयारीला लागायचं होतं पण मी मात्र खंड्याच्या मागे लागले होते. त्याचा एक सुंदर फोटो मला काढता यावा एवढीच माझी इच्छा होती.


 
           अगदी मलाजातील शेवटच्या दिवशीसुद्धा आम्ही गावात न फिरता तेजगढला अकॅडेमी मध्ये आलो असताना तिथेही आम्हाला खंड्या दिसला. पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी याची आवड मला कधीपासून लागली कोणास ठाऊक… पण हा field stay खंड्यामुळे माझ्यासाठी अविस्मरणीय राहील एवढं मात्र नक्की… 

Sunday, 19 July 2015

पिठोरा चित्र

               गुजरातमधील छोटा उदेपूर जिल्ह्यात एका राठवा आदिवासी कुटुंबासोबत दोन महिने मी राहिले. गावात फिरताना बऱ्याच घरांमध्ये पिठोरा चित्र पाहावयास मिळाले. राठवा आदिवासी संस्कृतीचा हा एक अविभाज्य घटक आहे. आवड म्हणून हे चित्र रेखाटले जात नाही. कोणाची काही मोठी समस्या असेल तर तिच्या निवारणासाठी प्रार्थना केली जाते आणि त्या समस्येतून बाहेर पडल्यावर, आपली इच्छा पूर्ण झाल्यावर हे चित्र घरातील तीन भिंतीवर काढले जाते. या चित्रात घोडे आणि घोडेस्वार हे खूप महत्वाचे. चंद्र, सूर्य, झाडे, प्राणी, पक्षी, घर, घड्याळ  आणि विविध कामे करणारी माणसे यांचं एका ठराविक पद्धतीने केलेलं चित्रण. ही दोन चित्रे प्रातिनिधिक स्वरुपात एका आदिवासी निवासी शाळेतील भिंतीवर काढलेली आहेत. 

             घरात गेल्यावर समोरच्या तुलनेने ज्याची लांबी जास्त असेल अशा भिंतीवर मुख्य चित्र आणि त्याच्या लगतच्या दोन लहान भिंतीवर अर्धी भिंत व्यापेल एवढ्या जागेवर हि चित्रे रंगवण्याची पद्धत असते. ते चित्र पूर्ण झाल्यावर मग 'बाबा पिठोरा'साठी कोंबडा, बकरी अर्पण केले जाते. चित्रासमोर दिवे लावून पूजा केली जाते त्याचबरोबर पारंपारिक गीते आणि नृत्य केले जातात.
          मानसिंगभाई राठवा यांनी रंगवलेली चित्रे आम्ही पाहिली. खूप सराईतपणे ते हि चित्रे रंगवतात. देशात खूप ठिकाणी आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन किंवा इतर कामासाठी त्यांना बोलावले जाते. छोटा उदेपूर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या दर्शनीय भिंतीवरही पिठोरा  चित्र पाहायला मिळाले. सध्या त्यांची दुसरी पिढीसुद्धा त्यांच्यासोबत काम करते. पण चित्रातील बारकावे मात्र मानसिंगभाईंच्या इतके कोणाला अजूनतरी दाखवता येत नसावेत. प्रत्येक लहानसहान वैशिष्ट्य न चुकता ते रेखाटतात. 
             
                 त्यांच्या मोठ्या चित्रातील बारकावे दिसावेत म्हणून एका एका भागाचे काही वेगळे फोटो मी काढले आहेत. खूप सुंदर आणि अनोखी कला मला पहावयास मिळाली हे माझं भाग्यच.