Wednesday, 22 August 2018

आठवणींचा कप्पा

कधीतरी वर्ष दोन वर्षातून एखादा दिवस मोकळा मिळावा,
मुद्दामहून सगळा पसारा बाहेर काढावा,
एकेका फायलीमध्ये ठेवलेले एवढाले चिटोरे आणि त्यावरील तारखा,
एकटीनेच जाऊन पाहिलेल्या त्या नाटकाचे हे तिकीट..
अरेच्चा..! ७ वर्षे झाली का या सहलीला,
बापरे! गेल्यावर्षी याच दिवशी केवढा पाऊस झालेला आणि आपण अडकलेलो रेल्वेमध्ये १५ तास,
आणि ही दंड म्हणून भरलेल्या ज्यादा फी ची पावती, हे स्वतःच्या पहिल्या कमाईतून घेतलेल्या कॅमेराचे बिल....
नको असलेले कागद बाजूला काढून काही आठवणी जपून
फायली जाव्या पुन्हा कपाटाच्या एका खणात,
हाती लागावी एक छोटी बाहुली दुसऱ्या क्षणात,
बाहुलीच्या गोष्टी आठवत मांडला जावा चहा,
चहाच्या उकळीसोबत अनेक क्षण मनात दाटतील पहा,
पाचवीमध्ये रंगवलेले मोराचे चित्र आणि रंगपेटी,
मैत्रिणीने दिलेल्या रंगीत पेन्सिली,
तिच्याकडूनच काढून घेतलेले गणपतीचे चित्र,
बचतपेटी बनवून त्यात साठवलेली नाणी आणि बरेच काही!
आणि चिंचा बोरे आवळे आणून देणाऱ्या सख्या,
शाळेतल्या मैत्रिणींना भेटलेच नाही ना किती दिवस,
विचार मनात यावा,
दिवस कसले वर्षे निघून गेली भराभर....
चहाचे घोट घेत घेत कपड्यांचा कप्पा रिकामा करावा,
सणावाराला, वाढदिवसाला घेतलेला तर कधी हट्टाने मागितलेला ड्रेस आणि मग त्यावेळी केलेली रडारड,
सगळं सगळं आठवून खुदकन हसावं..
घराच्या वास्तुशांतीला घातलेला तो घागरा..
आणि ताईच्या लग्नात नेसलेली साडी,
लोकांनी केलेले कौतुक आणि आजीने काढलेली दृष्ट ...
आता पुस्तकांच्या कपाटाकडे वळावे,
फक्त वयानेच नाही तर मनाने, विचारांनीही
आपण कसकसे मोठे झालो ते या पुस्तकांकडे पाहून समजावे,
मग हळूहळू चंपक, इसापनीती, तेनालीरामच्या गोष्टी
आणि पु.ल., वपु, जीएंच्या पुस्तकांवरून हात फिरवावा,
नव्या जुन्या पुस्तकांची पाने उलगडून त्याच्या सुगंधात रमावे,
आणि एखाद्या पुस्तकात ठेवलेले आजीला बाबांनी लिहलेले पत्र मिळावे,
तेवढ्यात तिकडून मोबाईल खणखणावा,
आणि यावेळी फक्त आईचाच आवाज यावा,
तिच्यासोबत बोलता बोलता थंड झालेल्या अर्धा कप चहाचा आठव व्हावा आणि
तिन्हीसांजेला पश्चिमेवर झालेली रंगाची उधळण पाहून आठवणींचा कप्पा
काही महिने अथवा वर्षभरासाठी पुन्हा बंद करावा...
~ मेघा निकम

Wednesday, 28 March 2018

बाबांचा वाढदिवस



आज बाबांचा वाढदिवस... इटुकले पिटुकले हात होते आमचे तेव्हा त्यांनी एक एक अक्षर गिरवायला शिकवले. शाळेत गेलो, छोटी मोठी बक्षिसे पटकावली. तेव्हा प्रत्येकवेळी त्यांनी कौतुक केले. अजूनही आयुष्याचे अनेक धडे गिरवले आणि गिरवायचे आहेत. त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि अखंड पाठिंबा असतोच, पण सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही गिरवलेल्या एकेका अक्षराचा त्यांना जेवढा आनंद झाला असेल तसाच आनंद आता आम्ही, त्यांच्या मुली अगदी दररोज अनुभवतोय. सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी स्वत:साठी कधीही मोबाईल घेतला नाही. आणि आता आमचे बाबा स्मार्टफोन वापरतात. whatsapp वापरतातच पण प्रत्येक message मध्ये नवनवीन smileys सुद्धा असतात. त्यांची सतत नवीन गोष्टी शिकण्याची धडपड आणि जिज्ञासा खूप प्रेरणादायी आहे.

बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Co

Thursday, 8 March 2018

मुलगी नाही ना मला...



ऑफिस शिफ्ट करणार आहेत वाटतं दुसरीकडे.. जास्त दूर जाऊ नये नाहीतर माझे काम जाईल" ऑफिस मध्ये चहा-नाश्ता बनवणाऱ्या मावशी बोलत होत्या.

"आत्ता घराजवळ आहे म्हणून चालत येता जाता येते. दूर गेले तर रिक्षाचे पैसे कोण देणार? सगळा पगार त्यात च जाईल."

"हात पाय धड आहेत तोवर काम करेन. भविष्याची तजवीज करून ठेवते थोडी" म्हणाल्या...

नंतर त्या जे काही बोलल्या त्यावर पहिल्यांदा माझ्याच कानांवर माझा विश्वास बसला नाही. पण खरे होते ते...माझी ऐकण्यात चूक नव्हती झाली.

"नवरा दोन वर्षापूर्वी गेला आणि मला तिन्ही मुलेच आहेत. मुलगी नाही ना मला!
म्हातारपणाची सोय माझी मी करून ठेवलेली बरी" असं म्हणाल्या मावशी...

Monday, 26 February 2018

आयुष्याच्या संध्याकाळी

ते आधी खूप रमतात
भरपूर मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांमधे
ओळखीच्या माणसांमध्ये
गप्पा गोष्टी सुख असतं...
आपुलकी असते, विचारपूस असते..
सूख असतं तोवर सगळेच आपले!
आणि मग चोरपावलाने दु:ख येतं
हळूच मागच्या दाराने...
आता तीच "आपली" माणसे
चौकशी करू लागतात!
भेटलो असतो पण आता जरा
"व्यस्त आहे हो" म्हणतात..
आपल्या अपयशाची चवीने चर्चा
मात्र आपल्यापाठी करत असतात!
उबग येतो त्यांना सर्वांचाच
दूरदेशी निघून जातात ती!
तिकडे सगळे अनोळखी
त्यांच्या भूतकाळाबद्दल अनभिज्ञ..
स्वत:ची नवी ओळख जपत
सावरतात अन् विसरतात सारे दु:ख..
मन तिकडेही रमतेच की
स्वच्छंद विहार ,मोकळा श्वास!
वर्षे उलटून जातात मनमुराद जगताना
अन् स्वत:ला 'पदोपदी' सिद्ध करताना..
दमछाक होते आता रोज
दुनियेला ओळख पटवून देताना!
'ओढ' जाणवते आपल्या मातीची
अन् त्या मातीत खेळलेल्या सवंगड्यांची..
आपली माणसे ती आपलीच
आणि "तीच" असतात आपली!
परतायची वेळ होते तेव्हा
आकाश असतं निरभ्र...
अन आता सर्वांचेच
डोईवरील केस शुभ्र...!
हेवेदावे, मत्सर आता कुणी करत नाही...
(आयुष्याच्या)संध्याकाळी पार्कातले हितगुज चुकत नाही...
कारण तोवर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं...
जगायचं जगायचं म्हणताना खरं जगणंच राहून गेलेलं असतं...
- मेघा निकम