Thursday, 26 March 2015

ओळख

                    Tell me about yourself  असं आपल्याला जेव्हा कोणी विचारतं ना, तेव्हा आपण खूप मोकळे  नाही बोलत अनेकदा. मुलाखत असो वा सभा-समारंभातील भेटीगाठी, समोरच्याला जे अपेक्षित आहे ते सांगतो. किंवा कुठेतरी आपली ओळख करून दिली जाते तेव्हा ती अगदी सोयीस्कररित्या पाहिजे तेवढीच केली जाते. करून दिलेल्या ओळखीतून आपण मग एकमेकांना तोलतो. मिळालेला पुरस्कार, दहावी-बारावीचे मार्क्स , आपला व्यवसाय, आपण घेतलेली शैक्षणिक पदवी हीच आपली ओळख असते का? त्याच्याही पलीकडे आपण व्यक्ती म्हणून असतो ना ! आपली आवड, छंद , स्वभाव याची फारशी माहिती दिली जात नाही. 
                             मला कधीकधी वाटतं, आपण चुकीची गाडी तर नाही ना पकडली ? की गाडी बरोबर आहे पण रस्ता चुकलोय? शिक्षण , नोकरी  किंवा व्यवसाय हे सर्व म्हणजे जगण्याची फक्त साधने होती ना! ती साध्य केव्हा बनली तेच बहुतेक आपल्याला कळलं नसावं. ध्येय गाठायचं आहे म्हणताना प्रवासात येणाऱ्या सुंदर गोष्टी अनुभवायच्या राहून तर नाही ना जात आपल्याकडून ? आजचा दिवस सुंदर आहे, हे जग सुंदर आहे, इथली माणसे खूप मस्त आहेत, छान छान पुस्तके आहेत, मंजुळ संगीत आहे, सूर्योदय आशादायी आहे मग अनेकांचं जीवन का निराशावादी बनत चाललंय? कुठेतरी चुकतंय काहीतरी!
                                इथे कोणी मृगजळाच्या मागे धावतो, कोणी ओअसिस शोधत फिरतो  आणि कितीतरी लोक एकाच पाणवठयावर आयुष्यभर जगतात. पण समाधानाने मरणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच सापडतील. आयुष्य संपत आल्यावर "अरे जगायचं राहूनच गेलं" असं वाटून घेण्यापेक्षा आजच जगून घेऊया… 
                                    आपली ओळख हे आपलं जगणं असावं, आपलं हसणं आणि बोलणं असावं ! 


Tuesday, 17 March 2015

लपवलेल्या काचा


लपवलेल्या काचा वाचायला घेतलं आणि माझा माझ्याच माणसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला; त्याहीपेक्षा महत्वाचं  म्हणजे आपल्या जगण्याकडे पाहण्याचा कोन काही अंशाने वळला. सलिल कुलकर्णी गायक म्हणून आवडले  त्यापेक्षा ते लेखक म्हणून खूप भावले . गाणं मला कळत नाही आणि वाचन मी करते अधूनमधून म्हणून मी असं म्हणते. ते  गायक म्हणून खूप ग्रेट आहेतच पण खरंच मला गाण्यातील काही कळत नाही. आपल्या मनात जे जे काही येत असतं ना , ते ते त्यांनी खूप सहज मांडलं आहे त्यांच्या पुस्तकात. इतकं साधं, सरळ, नेमकं, स्पष्ट आणि निरागस कोणी लिहू शकतं का? असा प्रश्न कोणाला पडत असेल तर त्याने हे पुस्तक वाचावं.


वाचताना कुठेतरी मध्येच असं वाटतं की अरे मीपण हाच विचार केला होता पण इतकं छान मांडायला कधीच जमलं नसतं मला. असं वाटतं  की माझ्या मनात नेमकं हेच चालू आहे ते यांना कसं  सुचलं.  "पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरवात करावी म्हणतोय" असं ते जेव्हा म्हणतात तेव्हा  खरंच असं करता आलं तर आयुष्य किती सुंदर होईल याची जाणीव होते. "तीन डोक्यांचा नाटककार" आणि "मी म्हणालो बरं!!" यातील नावाडी संकल्पनाच खूप सुंदर. सगळंच पटतं. 'ओळखा , तुम्ही कोण आहात' मध्ये व्यक्तीव्यक्तीमध्ये जे वर्गीकरण केलंय ते मजेशीर आणि रंजक आहे. आपण आपोआप ते वाचताना आपल्याला कोणत्यातरी category मध्ये बसवून टाकतो. आईवर,संगीतावर, मराठी भाषेवर, कवी आणि कवितांवर, निसर्गावर आणि सभोवतालच्या माणसांवर असलेलं त्यांचं प्रेम क्षणोक्षणी जाणवतं.  मी हे पुस्तक अजून वाचतेच आहे जितक्या वेळा वाचेल तितक्या वेळा ते आणखी सुंदर वाटतं. आपलं  वाटतं .
इतरांनीही ते वाचावं  म्हणून हा ब्लॉग. 

Saturday, 7 March 2015

पडवळपाडा


प्रवासाला निघालो की गाडीतून दिसणाऱ्या सूर्योदयाचा एक फोटो  असणारच…


उन्नत भारत अभियानाअंतर्गत  एक सर्वेक्षण करायला मी खराडे ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या पडवळपाडा या पाड्यावर गेले.  गावात सगळेच शेतकरी पण जिरायती शेतीवर पोट भरत नसल्यामुळे कुठेतरी मजुरी करून घरसंसार चालवणारी कुटुंबे . मुंबईपासून फक्त ६०-७० कि.मी. अंतरावर असणारे हे पाडे; पण जीवनशैलीमध्ये किती विरोधाभास!!
 ही आमची पडवळपाडा टीम…

गावचे पोलिस पाटील यांनी आमचं  स्वागत केल्यानंतर आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली

इथे एकमेव कुटूंब दिसले ज्यांच्या घरातील सुनादेखील किमान दहावी शिकलेल्या आहेत. मोठं सधन कुटूंब म्हटलं तर हेच. गावात कोणाचाही पूर्वीपासून बँक खाते नाहीच आणि असले तरी कधीतरी काही कारणामुळे पतसंस्थेतून कर्ज घ्यावे लागल्यामुळे तिथे असलेले खाते.
क्वचित कोणाच्यातरी घरी TV set, बाकीच्यांकडे साधा रेडीओसुद्धा नाही. टेलिफोन, मोबाईल चा गंध ही नसलेला हा जिवंत पाडा… पण तरीही कुणाच्या चेहऱ्यावर एवढे दु:ख दिसले नाही जेवढे आमच्याकडे internet pack संपल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर लगेच दिसून येते.
वर्षातून एक भाताचं पिक घेणारी ही मंडळी,   फळे सणवाराला केव्हातरी खातील तेपण खिशाला परवडलं तरच. मेस मध्ये जी फळे दररोज न चुकता मिळतात त्यांना हमखास नावे ठेऊन त्यातल्या त्यात "बरं दिसणारं" फळ आपण थोडं नाक मुरडूनच उचलतो त्यावेळी आपल्याला ही जाणीवच नसते की आपल्यासारखे फार थोडे लोक एवढे नशीबवान असतात.

 दुपारी जेवणानंतर जेव्हा आम्ही पुन्हा गावात गेलो तेव्हा या आजी आमच्यासोबत  प्रत्येक घरी आल्या. कारण त्यांची इच्छा होती की आम्ही त्यांच्याही घरी यावं; पण त्यांचं घर कदाचित आम्हाला सापडणार नाही. मग त्यांच्यासोबत गेलो त्यांच्या घरी. कौतुकाने आम्हाला हवी ती सर्व माहिती त्यांनी दिली. 


खूप प्रेमळ असतात गावातील लोक . प्रत्येक घरी आम्हाला जेवण किंवा चहाचा आग्रह होत होता.
 हिमांशू हा या कामात माझा सहकारी होता. 
मराठी बोलता येत नसल्याने तो फक्त नोंदी टिपण्याचे काम करत होता.चांग्याचापाडा  ते पडवळपाडा हा प्रवासपण मजेशीर  होता. दोन्ही बाजूने तवेरा ला दोन मुले लटकून आली.

 आमचं काम संपल्यावर आम्ही निघालो. त्या दिवशीचा हा सूर्यास्त.