काही दिवसांपूर्वी कर्ण-वृषाली भेटीची काल्पनिक गोष्ट वाचलेली... त्यावर आधारित मी रचलेली छोटीशी कविता
अश्व दौडे चंपानगरी, आनंदी आज स्वारी
कित्येक वर्षांनी जाऊ घरी, दोन क्षण घुटमळे गंगातीरी
तांबूस रंग पसरुनी चौफेर, सूर्यनारायण क्षितिजावर
तीच लालिमा नभावर, चित्र जुनेच मनावर
गंगामाईच्या कुशीत बालपण, खेळगडी-सोबती-बंधू शोण
शंख शिंपले आणि पोहणं, मध्यान्हाचे न राही भान
राधाईची साद कानी, वृषालीची आठवण मनी
कर्ण थबकला एका क्षणी, हाती लगाम आवरुनी
जाता परिचित मार्गांनी, काठावर दिसे एक तरुणी
जलकुंभ डोईवर धरुनी, पाहता नजर रोखुनी
कानी पडला मधुर स्वर, वाट चुकला का धनुर्धर?
हसून मनोमन दिले उत्तर, स्वगृहाचा कधी पडतो विसर?
उत्तरे-प्रत्युत्तरे चालली, एकमेका ओळख पटली
डोळ्यांची भाषा कळली, बालपणीची वसु भेटली
लटका राग नाकावर, चालू लागली वाटेवर
पत्र न धाडले आजवर, माझी नाही अगदी फिकीर
काय बोलतो कुमार, स्नेह जडलेला ‘ती’वर
करुनी हलके स्मित, अंगराज प्रवेशला नगरीत