काल गडकरी रंगायतन ला "आयुष्यावर बोलू काही" ची मैफिल होती. हा कार्यक्रम सुरु होऊन ऑगस्ट मध्ये १२ वर्षे पूर्ण झाली. तपपूर्ती विशेष कार्यक्रम म्हणून सध्या याचे आणखी काही कार्यक्रम सुरु आहेत. त्यातील एकातरी कार्यक्रमाला आपण जायचेच अशी माझी इच्छा होती. गेली ५-६ वर्षे मी या कार्यक्रमाला जाता येईल अशी संधी शोधत होते. पण सध्या मुंबईत राहत असल्याने हे सहज साध्य झाले. कार्यक्रम खूपच सुंदर आहे, असतो आणि कालही तेवढाच सुंदर झाला. मैफिल संपूच नये असा वाटत असतं पण ती संपते. एक अगदी नवं, आधी न ऐकलेलं गाणं ऐकवून सलीलसरांनी कार्यक्रमाची सांगता केली. या संपूर्ण कार्यक्रमातील एक मला भावलेली कविता…
दौरा-- संदीप खरे
कसले झाले आहे जिणे उनाड दुनियाभर
वारा बांधून देत नाही एका जागी घर
बैठक मारून बसत नाही एका जागी जीव
गावालाही उरलीच नाही आता कुठली शीव
सरकत येतात डोक्यावरती रोज नवे ढग
डोळे मिटून उघडेस्तोवर बदलून जाते जग
गाठण्यासाठी ठरल्या वेळी ठरलेला टप्पा
मैलांच्या या अटळ ठोंब्या दगडांशी गप्पा
जेव्हा मिळेल तेव्हा घास, जो जो मिळेल तो
सवयीनेच हात ओंजळ ओठांशी नेतो
असोशीने होत नाही क्षुधेचा उत्सव,
पाण्यालाही उरली नाही तहानेची चव
डोळे लाल, कोरडे ओठ आणि केस राठ
एक तुकडा जमिनीचा मागत राहते पाठ
कट कट हालचालींच्या हाडांचा आवाज
दुखरा मणका, माथी ठणका अन निद्रा नाराज
कसले सूर, कसले शब्द, कसली कलासक्ती
अहो गाढवासारखी वाटू लागते जगण्यावरची भक्ती
वर्ष काय विरून जाते क्षणाचीही खात्री
दर मैलावर दिसत राहतात चिरडलेली कुत्री
जड मन, जड जीभ, जड जड अंग
तसाच घ्यायचा चेहऱ्यावरती लावून थोडा रंग
ढवळून येतात सत्य, स्वप्न, दिवस आणि रात
दिसत राहतात फक्त टाळ्या वाजवणारे हात
ही कविता स्वत:च सर्व काही सांगून जाते. खुपदा आपल्याला या कविता का आवडतात तर त्या आपल्या मनातील भाव हळुवार प्रकट करत असतात म्हणून. आपल्याला जे खूप आर्ततेने सांगायचे असते ते अगदी मोजक्या शब्दात त्या सांगून जातात म्हणून..
No comments:
Post a Comment