Thursday, 30 April 2015

सत्तावीस उणे नऊ


अकबर बिरबलाची एक गोष्ट लहानपणी वाचली होती. त्यात कोणीतरी विद्वानाने अकबराच्या दरबारातील सर्वांना पेचात टाकलेले असते. एक साधा प्रश्न विचारून त्यांना कोड्यात टाकलेले असते. प्रश्न असा होता की सत्तावीस उणे नऊ म्हणजे किती ? तर 'अठरा' या उत्तरावर समाधानी होतो तो विद्वान कसला!!

मग प्रश्नाचं उत्तर द्यायला बिरबल पुढे सरसावला आणि म्हणाला. "सत्तावीस उणे नऊ म्हणजे शून्य." आता हे शून्य कसं ? तर वर्षात एकूण नक्षत्रे असतात सत्तावीस, त्यातील नऊ नक्षत्रे पावसाची असतात आणि तीच वजा केली तर हाती काहीच उरत नाही. हे एका शेतकऱ्याच्या दृष्टीकोनातून किंवा इतर व्यावसायिक दृष्टीने पाहिले की पटते. हंगाम किंवा ऐन उमेदीचा काळ हातातून निसटला तर बाकी शून्यच , नाही का?

मला हीच गोष्ट आपल्या आयुष्याशी निगडित वाटते. तारुण्य आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा उमेदीचा काळ. सत्तावीस नक्षत्रांपैकी नऊ प्रमाणेच आयुष्याचा एक तृतीयांश भाग हा तारुण्याचा असतो.  हा कालावधी हातून निसटता कामा नये. या वयात नवीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते.  एकदा तो उत्साह गेला कि मग जगाच्या रहाटगाडग्यात तो ही गुंतून पडतो.  मी असंही वाचलंय कुठेतरी की माणूस त्याच्या वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत हाती घेतलेली कोणतीही गोष्ट, कृती, काम तडीस नेवू शकतो. किंबहुना निसर्ग त्याला हे काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी ऊर्जा देत राहतो. अर्थात त्यानंतर तो करू शकत नाही असं माझं म्हणणं नाहीये. आपलं तारुण्य टिकवणंसुद्धा आपल्याच हाती आहे. ती जिद्द, तो उत्साह आयुष्यभर टिकवणारे लोक पुढे महान झालेली कित्येक उदाहरणे आहेत जगात.

पण या पावसाळ्याच्या नऊ नक्षत्रांचा हवा तसा लाभ करून घेता आला तर उरलेल्या १८ नक्षत्रांमध्ये विविध प्रयोग करून वर्षाचं उत्पन्न दुप्पट तिप्पट करायलाही मजा येईल ना! नाहीतर पावसाळा वाया गेला म्हणून दु:ख करत बसणारे अन पुढचा पावसाळा येईपर्यंत हातावर हात धरून खंत करणारेही 'जगतात'च त्याचं आयुष्य, खरंतर ते रेटत असतात आयुष्य.… 

Friday, 3 April 2015

करामती

एक कॅमेरा किती साऱ्या गोष्टी सोप्या करून ठेवतो ना ! काल पुन्हा पडवळ पाड्याला गेले होते. जाताना बसमधून Sunset mode मध्ये सूर्योदयाचे फोटो काढले. मजा येते खूप… कॅमेरा हातात घेऊन फक्त camera owner न राहता चांगला photographer व्हायला शिकलं पाहिजे. मग ते करताना अशा  मजेशीर फोटोचा आनंद वेगळाच असतो.


गावात गेले आणि खंड्या पक्ष्याने दर्शन दिले. पण समोरूनच सूर्याचा तीव्र प्रकाश येत असल्याने त्याचा सुंदर निळा रंग दिसला नाही फोटोमध्ये.

गावामध्ये गावकरी लोकांकडूनच त्यांच्या गावाचा नकाशा काढून घेण्याची Activity आम्हाला दिवसभरात करून घ्यायची होती. जास्तीत जास्त लोकांना त्यात सहभागी करून घेणे हे आमचे काम होते. आपल्या कामासाठी कोण त्यांचे हातातले काम सोडून येणार ? पण गावचे पोलिस पाटील आमच्या सोबत असल्याने हे काम आम्हाला फार कठीण गेले नाही. 

गावातल्या तरुण मुलांनी मिळून हा नकाशा काढला. मुलीही नंतर यात रस घेऊ लागल्या. त्यांनी रंगभरणाचे काम उत्साहाने केले. आता या फोटोमुळे आमचे पुढचे काम सोप्पे झाले. आम्हाला आता कागदावर नकाशा काढायचा आहे. हा फोटो पाहून ते सहज शक्य आहे. 
selective colour mode मध्येही मी काही फोटो try केले. त्यानंतर कोंबडीच्या पिलांमागे लागले मी फोटोसाठी
खूप छोटी मस्त पिले होती. आईमागे फिरत होती. 



त्यातल्या एकाला मी पकडलं आणि हातात घेऊन फोटो काढला. आमचं ठरलेलं काम वेळेआधी झालं होतं. मग वर्गातील मुले गावातल्या मुलांसोबत क्रिकेट खेळली. मी थोडा वेळ त्यांच्या खेळाचेही फोटो काढले. आणि परतीचा मार्ग धरला.
                               परत येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. मी दमले होते. आदल्या दिवशी पुरेशी झोप न झाल्यानेही डोळे  झाकत होते. कॅमेरा बंद करून पिशवीत ठेवून दिला आणि खिडकीतून बाहेर बघत राहिले. माझी डुलकी लागत होती तेवढ्यात हातातील कागदाची गुंडाळी निसटल्याने खाडकन जागी झाले मी… सहज बाहेर पहिले तर आकाशात क्षितिजावर तांबूस लाल रंग पसरला होता. खूप सुंदर दृश्य होतं. कॅमेरा पिशवीतून काढण्याचे कष्ट नाही घेतले मी. ते सुंदर दृश्य डोळ्यात साठवून ठेवू म्हटलं. मन खूप शांत वाटलं त्या वेळी… केलेल्या कामाचं मनाला समाधान आणि निसर्गाच्या अशा अविष्काराचं नेत्रसुख… या उपरी अजून काय पाहिजे असतं माणसाला ?