Showing posts with label आठवणीतल्या गोष्टी. Show all posts
Showing posts with label आठवणीतल्या गोष्टी. Show all posts

Sunday, 4 August 2019

मैत्री दिनानिमित्त शुभेच्छा

आज सकाळपासून मैत्री दिनानिमित्त शुभेच्छा देतेय-घेतेय परंतु आज इथे खास लिहावेसे वाटले ते वेगळ्या काही लोकांसाठी... त्यांचे फोटो माझ्याकडे नाहीत, फोन नंबर नाहीत किंवा पत्ताही नाही... जिचे बोट धरून शाळेत जायला लागले ती बालमैत्रिण बबली, आमच्या दोन गायी राणी-लाडी (हो, त्याही मैत्रिणीच), प्राथमिक-माध्यमिक शाळेतील सख्या ज्यांनी माझी अखंड बडबड न कंटाळता ऐकून घेतली (काहींचे चेहरेही नीटसे आठवत नाहीत आता), ज्युनिअर कॉलेजची दोन वर्षे कायम माझ्यासोबत होती ती माझी सायकल (सजीव नसली म्हणून काय झाले!), एवढेच नव्हे तर १५ तास रेल्वेमध्ये अडकले तेव्हा माझी काळजी घेणारे काका काकू आणि माझ्या भरवश्यावर निश्चिंत झोपलेल्या आज्जी, दोन तासांच्या प्रवासात भेटलेले फक्त हरवलेल्या मांजरीसाठी पंढरपूर, जोतिबा, जेजुरी, शिर्डी देवदर्शन करणारे काका, २५ मुलांना स्पर्धेसाठी घेऊन जाताना जगभरच्या भ्रमंतीचे किस्से सांगणारे गुरुजी, महत्वाच्या दिवशी नर्व्हस असताना स्मितहास्य आणि आत्मविश्वास वाढवणारे दोन शब्द बोलणारी अनोळखी मुलगी, पुढचे मागचे काहीही माहीत नसताना माझ्या प्रोजेक्ट मध्ये नवनवीन कल्पना सुचवणारे सहप्रवासी... या आणि अशा सर्वांसाठी मैत्री दिनानिमित्त खूप शुभेच्छा! त्या त्या क्षणापूरते का असेना तुम्ही माझ्या सोबत होतात आणि खऱ्या मित्राची भूमिका तुम्ही उत्तम निभावली, मला घडवले आणि माझा प्रवास (आयुष्याचा असो की गाडीतून) सुखकर केलात! तुम्ही सर्वजण माझ्या कायम स्मरणात राहाल.... Happy Friendship Day!

Friday, 10 May 2019

कर्ण-वृषाली भेट



काही दिवसांपूर्वी कर्ण-वृषाली भेटीची काल्पनिक गोष्ट वाचलेली... त्यावर आधारित मी रचलेली छोटीशी कविता

अश्व दौडे चंपानगरी, आनंदी आज स्वारी
कित्येक वर्षांनी जाऊ घरी, दोन क्षण घुटमळे गंगातीरी
तांबूस रंग पसरुनी चौफेर, सूर्यनारायण क्षितिजावर
तीच लालिमा नभावर, चित्र जुनेच मनावर
गंगामाईच्या कुशीत बालपण, खेळगडी-सोबती-बंधू शोण
शंख शिंपले आणि पोहणं, मध्यान्हाचे राही भान
राधाईची साद कानी, वृषालीची आठवण मनी
कर्ण थबकला एका क्षणी, हाती लगाम आवरुनी
जाता परिचित मार्गांनी, काठावर दिसे एक तरुणी
जलकुंभ डोईवर धरुनी, पाहता नजर रोखुनी
कानी पडला मधुर स्वर, वाट चुकला का धनुर्धर?
हसून मनोमन दिले उत्तर, स्वगृहाचा कधी पडतो विसर?
उत्तरे-प्रत्युत्तरे चालली, एकमेका ओळख पटली
डोळ्यांची भाषा कळली, बालपणीची वसु भेटली
लटका राग नाकावर, चालू लागली वाटेवर
पत्र धाडले आजवर, माझी नाही अगदी फिकीर
काय बोलतो कुमार, स्नेह जडलेलातीवर
करुनी हलके स्मित, अंगराज प्रवेशला नगरीत

Thursday, 8 March 2018

मुलगी नाही ना मला...



ऑफिस शिफ्ट करणार आहेत वाटतं दुसरीकडे.. जास्त दूर जाऊ नये नाहीतर माझे काम जाईल" ऑफिस मध्ये चहा-नाश्ता बनवणाऱ्या मावशी बोलत होत्या.

"आत्ता घराजवळ आहे म्हणून चालत येता जाता येते. दूर गेले तर रिक्षाचे पैसे कोण देणार? सगळा पगार त्यात च जाईल."

"हात पाय धड आहेत तोवर काम करेन. भविष्याची तजवीज करून ठेवते थोडी" म्हणाल्या...

नंतर त्या जे काही बोलल्या त्यावर पहिल्यांदा माझ्याच कानांवर माझा विश्वास बसला नाही. पण खरे होते ते...माझी ऐकण्यात चूक नव्हती झाली.

"नवरा दोन वर्षापूर्वी गेला आणि मला तिन्ही मुलेच आहेत. मुलगी नाही ना मला!
म्हातारपणाची सोय माझी मी करून ठेवलेली बरी" असं म्हणाल्या मावशी...

Friday, 29 September 2017

झाशीची राणी


साऊच्या दोन दिवसांच्या अभ्यास सहलीसाठी आप्पांची परवानगी घ्यायला माई माजघरात गेली. स्वयंपाक खोलीच्या दारातून साऊ पाहत होती. 
"काय करायची पोरीच्या जातीला अभ्यास सहल? स्पष्ट 'नाही' म्हणून सांगा"
आप्पांचा साफ नकार ऐकून साऊला कालची संध्याकाळ आठवली.
वेशभूषा स्पर्धेत 'झाशीची राणी' बनलेल्या साऊचे आप्पांनी मित्रांच्या घोळक्यात भरभरून कौतुक केले होते.

Saturday, 23 September 2017

विशेष

उच्चवर्णीय, उच्चशिक्षित म्हणवून घेणाऱ्या सोसायटीमध्ये एकटीच राहताना अनेकदा तिला येता जाता पाहणाऱ्या वासनेने वखवखलेल्या नजरा दिसत होत्या. महिनाभरासाठी त्या गावात शैक्षणिक प्रकल्पासाठी राहणे गरजेचे असल्याने ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने तिला एक रिकामी खोली देण्यात आली होती. काम संपवून संध्याकाळी त्या सोसायटीमध्ये जाताना तिला ब्रम्हांड आठवायचे. परक्या गावात स्थानिक अन् त्यात 'पुढारी' लोकांविरुद्ध आवाज उठवणे सोप्पी गोष्ट नव्हती.  त्यामुळे तिला आता दुसरा आसरा शोधणे भाग होते.
गावातील दुसऱ्या भागात राहणारे मजूर लोक, सगळे रोज रात्री दारू पिऊन तर्र असायचे. नशेत असतील तर कोणाही स्त्री वर हात टाकतील अन् भांडण झाले तर कुऱ्हाडीने समोरच्याचा जीव घेतील अशा गोष्टी ऐकून होती ती. बरं, तिचे काम पण याच मजूर लोकांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे होते. म्हणून मुलांकरवी तिने आसरा मिळवण्यासाठी शोध सुरु केला. चार दिवसांची ओळख असलेल्या मुलीला घरात ठेवण्याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार होईना. तर कोणी आपल्या नवऱ्याचे नाहीतर मुलाचे 'गुण' ओळखून असल्याने 'आमच्याकडे नको' म्हणाले.
....शेवटी एका आजी-नातवाच्या घरी ती पंधरा दिवस 'सुरक्षित आणि निर्धास्त' राहिली.
आजीचा बावीस वर्षाचा नातू "विशेष" मुलगा होता, ज्याला गावातील इतर जाणते लोक "ऍबनॉर्मल" म्हणून ओळखत.

Thursday, 14 September 2017

शाळा

सकाळी ९ ची वेळ..
५-६ वर्षाची पोर  फाटक्या अन् मळक्या कपड्यात पाठीवर दप्तर अडकवून रडत रडत शाळेत येताना दिसली.
"काय झालं?"
"....."
"काय झालं, बाळा?"
"....."
"ती शाळेत जाणार नाही बोलली तर तिच्या आईने मारले" दुसरीने उत्तर दिले.

दुपारची वेळ...
 तीच सकळची पोर गुडघ्यात तोंड खुपसून मुसमुसत होती. मी जवळ जाताच डोळे वर करून तिने माझ्याकडे पाहिले.
"का रडते गं बाई तू?"
पालथ्या हाताने डोळे पुसत चिमुरडी उत्तरली
"बेन, साहेब मारता हतू"
"केम?"
"....."
"बोल नी"
"खबर नथी"
"तिला ग, , , न वाचता आले नाही म्हणून" असेच कोणीतरी तिसऱ्याने उत्तर दिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पोरगी रडतच शाळेत दाखल...शाळेत जाण्याचा किंवा न जाण्याचा, दोन्ही पर्याय भीतीदायक..

Thursday, 18 August 2016

सहजीवन

१५-२० दिवसांपूर्वी आमच्या शेजारचे एक आजोबा गेले. तसे आजारीच असायचे आणि बरेच थकलेलेही होते. घरी फोन व्हायचा तेव्हा मी कधीच त्यांची चौकशी केली नव्हती. नेमकं त्या दिवशी आई सांगत होती की नारळपाणी पिऊनच त्यांची तब्येत सुधारली होती वगैरे...आणि आमचे एवढे बोलणे झाले त्याचदिवशी दुपारी ते निर्वतले. तसे त्यांच्याबद्दल लिहावे अशी त्यांची माझी ओळखही नाही, किंवा त्यांची ख्यातीही नाही. पण आज सहज विचार आला तो त्यांच्या बायकोचा. त्यांच्या दुसऱ्या बायकोचा.
आजोबांना दोन बायका. पहिलीला सहा मुली झाल्या, मुलगा होईना म्हणून दुसरीशी लग्न केले. त्यानंतर मुलगा झाला पण तो पहिल्याच बायकोला. दुसरी आजोबांची लाडकी होती, पण तिला मूल झालेच नाही. मुलींची लग्न झाली, मुलगा आपल्या आईला घेऊन वेगळा राहायला लागला, कारण वेगळे काय असणार? कौटुंबिक कलह! पण कसल्याशा तडजोडीने ते मिटले असावेत.  काही दिवसांनी आजोबाही आले दुसऱ्या बायकोसोबत  यांच्याकडेच राहायला. मुलाचे लग्न झाले पण सुनेचे दोघींशीही फार काही पटले नाही कधीच. पण आम्हाला दया यायची ती पहिल्याच बायकोची. बिचारी थकलेली पण स्वभावाने गरीब, दिवसभर राबायची. तिचे दुखनेखुपणे कोणी पाहत नव्हते. आमच्याघरी येऊन कधीमधी आईकडे मन मोकळे करायची. आमच्या घरी येणे जाणे असायचे, विचारपूस व्हायची.
दुसऱ्या बायकोशी मात्र आमचा संवाद कमीच. कामापुरते काम. आपल्याकडे आधीच दोन लग्ने झालेल्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि त्यातून दुसऱ्या बायकोचा तर दुस्वासच जास्त. पण का कुणास ठावूक.. आजोबा गेले आणि दुसऱ्या बायकोबद्दलच मला जास्त वाईट वाटू लागले. पहिली थकलेली आहे, वृद्ध आहे. तिचेही आयुष्य आता फार नाही राहिले शिवाय तिला स्वत:च्या पोटच्या मुली, मुलगा नातवंडे आहेत. उरलेसुरले आयुष्य काढेल ती कसेही. पण नवरा गेल्याचे दु:ख दुसरीला किती झाले असेल कल्पना करता येणार नाही. एकतर घरात जिवाभावाचा माणूस तेवढाच आणि अर्धे आयुष्य सरले असले तरी उरलेलेही खूप आहे. पोटचे एखादे मूल असते तर त्याच्याकडे पाहत दिवस काढले असते. पण आता किती म्हटले तरी थोरलीच्या पोरी लावतील का जीव आपल्याला? नवऱ्याचा धाक घरात नसला तरी अस्तितवानेही फरक पडतो. तो असताना जो मान होता तो राहील का पुढे? आपल्या जन्माचे प्रयोजन काय हा प्रश्न सतावत असेल ना तिला आता!  

Monday, 18 July 2016

Code मंत्र

परवा "CODE  मंत्र" हे मराठी नाटक पाहिले. code मंत्र पाहिल्यावर मी काही वेळ सुन्न झाले होते. काही नाटके नाट्यमंदिरात पाहिल्यानंतरही त्यांचा प्रभाव पुढे अनेक दिवस टिकून राहतो त्यापैकीच हे एक नाटक. मला विलक्षण आवडलेले.. आणि अस्वस्थ करणारे तरीही विचार करायला लावणारे....
"A few good men" या मूळ इंग्रजी नाटकाची प्रेरणा घेऊन सध्या गुजराती भाषेत चालू असलेल्या नाटकाचे हे मराठी रूपांतर... नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, दिग्दर्शन, अभिनय,संवाद, पार्श्वसंगीत, कथा अशा सर्व बाजूंनी परिपूर्ण असलेली विलक्षण अद्भुत कलाकृती... मी काही चित्रपट-नाटकांची समीक्षक नाही पण मला नाटक पाहायला आवडते आणि आवडलेलं नाटक इतरांनीही पाहावं असं मला नेहमी वाटतं. म्हणून हा लेखप्रपंच...
(छायाचित्र सौजन्य: Code Mantra-Marathi च्या फेसबुक पेजवरून )

सैनिकांची शिस्त, शौर्य, देशभक्ती, त्याग आणि सर्वस्व वाहून केलेली देशसेवा आपल्याला परिचित असते. किमान आपण त्याबद्दल ऐकून असतो. त्यांची कर्तव्यनिष्ठा वाखाणण्यासारखी असते पण कर्तव्याचा अतिरेक झाल्यावर काय घडू शकतं याची ही एक कथा... कर्तव्यपूर्तीमध्ये नाती बाजूला ठेवून नियमांचे पालन करताना व्यक्तीला कोणत्या दिव्यातून जावे लागते हे या कथेत पाहायला मिळते. नाटक पाहायला सुरुवात होण्याआधीच पार्श्वसंगीतामुळे आपण थेट मराठा रेजिमेंटच्या तळावर दाखल होतो आणि पडदा उघडताक्षणीच समोर दिसतो तो भव्य सेट. प्रसंगांची गुंफण इतकी सुंदर आणि अंधार न करता सेटची प्रसंगानुरूप अलगद आणि तितक्याच शिस्तीत आखणी केली आहे की एक क्षणही आपण कथेपासून विचलित होत नाही. कथेतील वकील अहिल्या देशमुख (मुक्ता बर्वे) एका सैनिकाच्या खुनाची केस उलगडून आरोपीला सोडवू पाहत असताना एकेक धागादोरा असा पकडतात, त्यातून प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाते.


(छायाचित्र सौजन्य: Code Mantra-Marathi च्या फेसबुक पेजवरून )
एकामागोमाग एक नवनवीन धक्के आपण पचवत जातो आणि शेवटी मिलिटरी लॉ एक्स्पर्ट अहिल्या देशमुख आणि कर्नल प्रतापराव निंबाळकर यांच्या जुगलबंदीतून सत्य बाहेर येते. कोर्टमार्शल होताक्षणीच एक शेवटचा जबरदस्त धक्का बसतो आणि आपण सुन्न होतो. कथा आणि कथेचा शेवट सांगितला तर पाहण्याची मजा नवीन प्रेक्षकांना अनुभवता येणार नाही म्हणून सांगण्याचा मोह आवर्जून टाळतेय; पण या वर्षातील आणि आत्तापर्यंतचे मी पाहिलेले हे सर्वोत्तम नाटक आहे हेही खरे.   नाटकातील प्रत्येक पात्राची भूमिका महत्वाची आहे आणि ती सर्व पात्रे तितकीच खरी वाटतात. अजय पुरकर आणि मुक्ता बर्वे यांची कामे तर लाजवाब आणि बिनतोड...
एक थरार नाट्य आणि नाट्यकलेची उत्कृष्ठ कार्यशाळा म्हणून हे नाटक प्रत्येक रसिक प्रेक्षकाने आणि अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक सर्वांनी आवर्जून पाहावे असेच आहे.     

Friday, 10 June 2016

एक छोटीशीच भेट...

आज पहाटे डेहराडून एक्स्प्रेसमधून बोरीवली स्टेशनला उतरले. ३:५० ची चर्चगेट लोकल उभीच होती. पाठीवरील मोठे ओझे पाहून मागे लागलेल्या रिक्षावाल्यांना चुकवून लोकलचे तिकीट काढून मी महिलांच्या डब्यात चढले. डब्यात तीन बायका, सुरक्षा पोलीस आणि मी एवढीच माणसे. त्यातील एक 'म्हातारी बाई' आधीच झोपलेली होती. दुसऱ्या दोघी कुठूनतरी लांबून प्रवास करून आलेल्या आणि आता अंधेरीला उतरणार होत्या.
मला हे माहित झाले कारण त्या दोघींपैकी एक साधारण ६०-६५ वर्षांची असेल माझ्याकडे येऊन विचारत होती की "ही ट्रेन अंधेरीला जाईल ना?"
  मी 'हो' म्हटले तरी ती माझ्यासमोरच बसून राहिली.
काहीतरी बोलायचे म्हणून मी विचारले, "एकट्याच कुठे गेला होता?"
त्यांना बहुतेक ऐकू कमी येत असावे. त्यांचे असंदिग्ध उत्तर ऐकून मी पुन्हा दोनदा विचारले. शेवटी त्या म्हणाल्या "एकटी नाही, आईला घेऊन चालले." एवढे बोलून ती उठली आणि तिच्या आईजवळ गेली.
 मी क्षणभर विचारत पडले. ज्या बाईला स्वत:लाच आता प्रवासात तिच्या मुलांनी किंवा कोणीतरी सोबत करायची गरज आहे, ती आईला सांभाळत आहे. तिची आई अतिशय वृद्ध आणि कृश दिसत होती.

मी पुन्हा काही क्षण डब्यात नजर फिरवली. झोपलेल्या 'त्या' म्हातारीकडे पाहिले. ती शेवटच्या स्टेशनवर उतरणार असेल असा अंदाज बांधला. ट्रेन निघायला आणि मग दादरला पोहचायला वेळ लागणार होता. पहाटेच्या शांततेत रेल्वेच्या सूचनांचा आवाज जरा जास्तच मोठा वाटत होता. मग मीही रिकाम्या बाकावर आडवी झाले. दिल्लीपासून ३० तास सलग केलेल्या प्रवासाने थोडा थकवा आलेला होताच आणि पहाटे साडेतीनला उतरायचे असल्यामुळे आणि सोबत कुणीही नसल्याने अर्थातच रात्रभर नीट झोपू शकले नव्हते. ट्रेन निघाली, मी आडवी होऊनही सावध झोपले होते. पुढील स्टेशन कांदिवली, मालाड, गोरेगाव अशा सूचना कानावर पडतच होत्या. अंधेरी स्टेशन आले तेव्हा एकदा उठून बसले. त्या दोन आज्जी त्यांच्या पिशव्या घेऊन उतरल्या. ते पाहिले आणि मी पुन्हा आडवी झाले. डोळा केव्हा आणि कसा लागला ते अजूनही आठवत नाहीये. पण "पुढील स्टेशन एल्फिन्स्टन रोड' कानावर आदळले आणि मी खाडकन जागी झाले. 'छे! आधीच वैतागले आहे आणि पुन्हा दादरसाठी दुसरी ट्रेन पकडून मागे जावे लागणार.' पटकन सामान उचलले आणि उतरले. तेव्हा माझ्यासोबत ती झोपलेली आज्जीही उतरली होती. 'मी चुकून जरी या स्टेशनवर आले असले तरी माघारी जाण्यासाठी एक तिकीट घ्यावे लागणार' हा विचार चारदा आला पण कंटाळा, आळस आणि बेपर्वाई या गोष्टींनी त्यावर मात केली. माझ्यासारखेच असे किती विनातिकीट प्रवास झाले असतील ज्याची कुठेच नोंद नाही. तिकीट न घेताच मी उलट दिशेने जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत एका बाकावर बसले.

तेवढ्यात गोड आवाजात आणि मिश्किल हसत ती आज्जी म्हणाली, "मला दादरला उतरायचे होते पण जागच आली नाही."

मी तिच्याकडे पाहिले, ती स्मितहास्य करत होती, मीही हसले, म्हटलं "अहो, मलाही तिथेच उतरायचे होते."
दोघी एकमेकींकडे पाहून हसलो. त्यांच्या हातातल्या पिशवीकडे मी नकळत पाहत होते.
मी काही विचारण्याआधी त्या स्वत:च म्हणाल्या "भाजी घेऊन जायचंय."
पिशवीचा आकार लक्षात घेऊन मी म्हटलं "विकण्यासाठी का?"
त्यांनी होकारार्थी मान डोलावली. मी पुढे विचारलं "कुठे विकता?"
म्हणाल्या "दादरला घेते आणि बोरिवलीला नेऊन विकते."
मी पाहत राहिले. ६०-७० वर्षाची बाई. चेहऱ्यावरील सुरकुत्याच तेवढे वय दर्शवत होत्या. गळाबंद आणि कोपरापर्यंत लांब बाह्या असलेला ब्लाउज, साडीसारखे काहीतरी (पण साडी नक्कीच नाही) कापड अंगभर गुंडाळलेले, मान मागे पुढे डुलते आहे. साधारण साडेचार फूट उंची, पाठीला थोडासा बाक, आवाज अतिशय गोड आणि चेहऱ्यावर सुंदर हास्य, प्रसन्न आणि तेजस्वी मुद्रा.  पहाटे चारच्या ट्रेनने प्रवास करून रोज भाजी विकते. दिवसाला ७०-८०रु.ची कमाई होत असेल की नाही कोणास ठाऊक! या वयात त्या करत असलेल्या कष्टांचे कौतुक वाटले तसेच थोडे दु:खही वाटले. घरी कोण असते विचारावे वाटले, तुम्ही या वयात ही धडपड का करता विचारावे वाटले, कधीपासून हे काम करता विचारावे वाटले, दिवसाला किती पैसे सुटतात विचारावे वाटले. पण मी विचारले काहीच नाही. त्या प्रसन्न चेहऱ्यावर चुकुनही दु:खाची छटा नको दिसायला असे वाटले. जी काही परिस्थिती असेल त्यांची, त्यातही त्या आनंदी आहेत हे पाहून समाधान वाटले. ट्रेन आली, आम्ही दोघी चढलो आणि दोघीही दादरला उतरलो. त्या त्यांच्या मार्गे गेल्या, मी पुढे आले.
काही मिनिटांची आणि चार-पाच वाक्यांची ही भेट. पण आजीची ती हसतमुख मुद्रा अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून हटत नाहीये.

Friday, 3 June 2016

जून, मुंबई, पाऊस आणि मी...(भाग १)

जून महिना उजाडला की बऱ्याच जुन्या आठवणी डोके वर काढतात. मागच्या जून मध्ये या आठवणींची आठवण काढायला उसंतच नव्हती. मागच्या वर्षी मी मे ते जुलै गुजरातमध्ये होते तरीही दोन दिवस का असेना मुंबईला येणे झालेच आणि ते दोन दिवसही कधीच विसरले जाणार नाहीत असेच.. जूनच्या जुन्या आठवणींमध्ये तीही एक आठवण जमा झाली.


  • जून २०११
चुलतभावाला इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा होता. त्या प्रवेशफेरीचे निमित्त झाले आणि मी पहिल्यांदा मुंबईत दाखल झाले. सकाळी लवकर प्रवेश फेरीचे काम झाले की दिवसभर मग आम्ही मुंबईत कुठे कुठे फिरायचो. ४ दिवस दादर-वरळी-बांद्रा-महालक्ष्मी-छत्रपती शिवाजी टर्मिनस खूप ठिकाणी फिरलो. काका तेव्हा आमच्यासोबत असायचे. बेस्ट बसचा २५ रू. चा दैनिक मैजिक पास… दिवसभर मुंबईत कुठेही बस मध्ये बसा आणि कुठेही उतरा. काका इतकी वर्ष मुंबईत राहिलेले असल्यामुळे त्यांना सगळ्या बसेस, मार्ग माहित. कसलाही विचार न करता आम्ही दोघे त्यांच्या पाठी चालायचो, ते चढतील त्या बस मध्ये चढायचे, ते उतरतील तिथे उतरायचे.
वरळीचे नेहरू तारांगण मला पहायचे होते पण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा शो सुरु व्हायला बराच अवकाश होता म्हणून मग तेथील सिक्युरिटी गार्ड ने आम्हाला सायन्स सेंटर पाहून यायला सुचवले. मधल्या शॉर्टकटने आम्ही नेहरू सायन्स सेंटरला पोहोचलो.  बाप रे! एवढी मोठी इमारत आणि कित्ती सारे ज्ञानामृत… एका दिवसात फक्त चालून सगळे पाहता येते. शिकायचे समजून घ्यायचे असेल तर आठवडाच काय, महिनाही अपुरा पडेल. चालून चालून आणि उभ्यानेच सगळे पाहून पाय थकले. मग आम्ही तिथेच बाहेर येउन, बागेत बसून काकींनी डब्यात दिलेली बटाट्याची भाजी अन चपाती खाल्ली. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा आत पाहायला गेलो. तेव्हा ठरवले होते की पुन्हा मुंबईला आल्यावर इथे यायचे नक्की. पण अजून ते राहिलेच आहे. पण आत्ता आठवले आहे तर आता लवकरच जाईन पुन्हा.…
४ दिवसात जमेल ती ठिकाणे पाहिली आणि गेले घरी माघारी.


  • जून २०१२
सुट्टीचा उपयोग करून घ्यायचा. कुठेतरी इंटर्नशिप करायची आणि त्यासोबत भरपूर फिरायचं, मजा करायची असं मी, चंचल आणि अपर्णाने ठरवलं. अभ्यासक्रमात ही इंटर्नशिप समाविष्ट नव्हती तरीही आम्ही ती करायची ठरवलं होतं. १५ दिवस मस्तपैकी अपर्णाच्या डोंबिवलीच्या घरी राहिलो. लोकलने डोंबिवली ते ठाणे प्रवास म्हणजे डेंजर!!! तुफान गर्दी…  बऱ्याचदा आम्हाला ट्रेन पकडताच यायची नाही गर्दीत. दोनवेळा तर असे झाले की एकजण एका ट्रेन मध्ये चढायची. दुसऱ्या दोघींना काय ते जमायचे नाही मग त्यामागून येणाऱ्या ट्रेन मध्ये कसेबसे चढायचो. पण खुशीखुशीने निवडलं होतं ते, झालो त्यातून पार. NDT (Non Destructive Testing)मध्ये ट्रेनिंग घेत होतो. आम्हाला मार्गदर्शन करणारी मुलगी मस्त chill असायची. सुरुवातीला बरंच काही वाचायला सांगायची. ते नीट कळत नव्हते तेव्हा आम्ही दुपारपर्यंत कंटाळून जायचो, आणि तिच्या ते लक्षात आले की ती आम्हाला जा म्हणून सांगायची, नाहीतर आम्हीच काहीतरी बहाणा सांगून सटकायचो. ऑफिसमध्ये असताना अनेकदा कोणाचे लक्ष नाही पाहून कंप्युटरवर गेम्स सुद्धा खेळलो. पण जेव्हा ती साईटवर घेऊन जायची तेव्हा छान वाटायचे. जे वाचतो, लिहतो ते प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय नीट समजत नाही. हळूहळू कळायला लागले वाचलेले आणि मग रिपोर्ट्समध्ये पण इंटरेस्ट यायला लागला. 
ट्रेनिंगशिवाय या सुट्टीत बरेच काही केले. एकत्र स्वयंपाक करायला मजा यायची. मला अजूनही नेहमी आठवते. चंचल किंवा अपर्णा काहीतरी बनवत असतील तेव्हा मी ओट्यावर चढून बसायचे. किचनचा ओटा L आकाराचा होता, त्याच्या मोठ्या लांब बाजूला शेगडी होती आणि  छोट्या बाजूवर पाण्याची भांडी असायची. सरकवा-सरकवी करून मी तिथे बसायला थोडी जागा करायचे. आणि मग निवांत बसून मी खूपवेळ बडबड बडबड करत राहायचे. रात्री जेवल्यानंतर कितीही कंटाळा आला असला तरी, झोप येत असली तरी आम्ही पत्ते खेळल्याशिवाय झोपायचो नाही. सुट्टी होती ना ती मग खेळायला नको का?म्हणून फक्त! दरम्यान चंचलचा वाढदिवस आला. केक फुगे वगैरे आणून मस्त साजरा केला. एक दिवस घारापुरीची लेणी (एलिफंटा केव्ह्स) पाहायला गेलो. बोटीतला प्रवास, पाऊस, मक्याचे कणीस, फोटो,खरेदी… मस्त दिवस होता तो!  या सुट्टीतील काही फोटो एकत्र… 

  • जून २०१३
मुंबईतला मुसळधार पाऊस पाहिला तो या जूनमध्ये. फिल्ड ट्रेनिंगसाठी खऱ्या अर्थाने फिल्डवर दाखल झालो होतो. एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ट्रेनिंग घेत होतो. Raw material warehouse आणि finished goods warehouse चे बांधकाम चालू होते तळोजा MIDC मध्ये. इथे ट्रेनिंगला पुन्हा आम्ही त्याच तिघी. पण यावेळी एकत्र राहत नव्हतो. मी माझ्या काकांकडे मानखुर्दला, चंचल तिच्या मामांकडे कल्याणला आणि अपर्णा अर्थातच तिच्या स्वत:च्या घरी डोंबिवलीला (आमच्या शिवाय आणखी तिघीही होत्या, पण त्यांचे NDT मध्ये ट्रेनिंग चालू होते. त्या अपर्णाकडे राहिल्या).  तळोजाला जाण्यासाठी त्या दोघींना कल्याणहून थेट तळोजापर्यंत बस होती. मला मात्र मजल दरमजल करत यावे लागायचे. मानखुर्द ते खांदेश्वर लोकलने. खांदेश्वरला उतरल्यावर कळंबोली हायवेपर्यंत मी ३.५- ४ किमी. चालत जायचे. तिथे रिक्षा होत्या पण त्यांना रोज ७०-८० रु. देणे मला परवडणारे नव्हते. आणि तिथून शेअर रिक्षा नसायच्या. मग हायवेपासून MIDC पर्यंत six seater ने. आमची साईट शेवटच्या टोकाला होती. त्यामुळे त्या गाडीत बसलेला पहिला आणि उतरणारा शेवटचा प्रवासी मीच असायचे. साधारण ११ ते ५ असे ट्रेनिंग झाल्यावर आम्ही निघायचो तेव्हा मात्र मी चंचल आणि अपर्णासोबत कल्याणपर्यंत बसने आणि तिथून लोकलने मानखुर्द असे फिरून जायची. कारण पुन्हा ४ किमी चालण्याचे त्राण असले तरी अंधारात त्या रस्त्याने एकटी चालत जाण्यात धोका होता.
साईटवरील इंजिनिअर चांगले मार्गदर्शक होते, शिवाय ते आमच्याच कॉलेजमधील होते. प्रोजेक्ट व्यवस्थापकांनी सुद्धा खूप मदत केली. नवनवीन गोष्टी आम्हाला शिकवल्या. सर्वेईंग करताना फार मजा आली. फ्लोर लेवल फिक्स करायची होती. आणि आमच्या गाईडनी सेट केलेली ऑटो लेवल थोडी उंच होती. त्यातून पाहायला माझी उंची कमी असल्यामुळे पायाखाली विटा मांडून मला पाहावे लागायचे. साईटवर सुरक्षिततेसाठी आम्ही जेव्हा सेफ्टी शूज, हेल्मेट, जाकेट घालायचो तेव्हा उगाचच स्वत:चा अभिमान वाटायचा.

दरम्यान रविवारी सुट्टी म्हणून आम्ही सर्व मैत्रिणी चंचलच्या मामांकडे गेलो होतो. जेवणे आटोपली आणि बाकीच्या सर्वजणी अपर्णाच्या घरी गेल्या. मी चंचलच्या इथेच राहिले. दुसऱ्या दिवशी आम्ही साईटवर जाऊ आणि मग संध्याकाळी मी पुन्हा माझ्या काकांकडे… असे ठरले हते. पण त्यादिवशीच पाऊस जो सुरु झाला ते सलग ३ दिवस चालूच होता. आम्ही साईटवर ही गेलो नाही, घरातून बाहेरच पडलो नाही. तेव्हाच उत्तर भारतात ढगफुटी झाली होती. आणि दिवसभर त्याच्या बातम्या, मुलाखती टिव्हीवर चालू होत्या. चौथ्या दिवशी पावसाने रजा घेतली आणि मग आमचे काम पूर्ववत झाले. या पावसामुळे मात्र आम्हाला त्या सुट्टीत कुठेही फिरता आले नाही. पण तरीही हा अनुभव बरेच काही शिकवून गेला आणि आम्हाला समृद्ध करून गेला.

त्यानंतरचे अनुभव पुढच्या भागात… 

Wednesday, 1 June 2016

सामान्यांतले असामान्यत्व

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. जगावेगळ्या असणाऱ्या व्यक्तींच्या कार्यावर त्यामार्फत प्रकाश पाडला जात आहे. लेखक अरविंद जगताप यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे की ते अशा व्यक्तींचा शोध घेत आहेत. त्यामध्ये त्यांनी डॉ. हेमा साने आणि शांताबाई यादव या दोन अफलातून स्त्रियांची ओळख करून दिली. 
डॉ. साने यांनी आजवरच्या त्यांच्या आयुष्यात वीज वापरली नाही. ७५ वर्षे वीजेशिवाय त्या कशा राहू शकल्या असतील हा प्रश्न आजकाल मोबाईलशिवाय १० मिनिटे राहू न शकणाऱ्या मुलांना पडलाच पाहिजे. त्या जीवशास्त्र या विषयातील डॉक्टर आहेत आणि त्या विषयातील अनेक पुस्तकांचे  लेखनही त्यांनी केले आहे. वीजच नाही वापरत तर पंखा, टिव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन, कुलर, मोबाईल यासारख्या अनेक गोष्टींमागील पैशाचा आणि वेळेचा किती अपव्यय त्यांनी टाळला आहे, कल्पनाही करता येत नाही. आपल्या गरजा किमान असाव्या असे  मी खूपवेळा वाचले आहे, ऐकले आहे पण  हे प्रत्यक्षात जगणारी ही एकच व्यक्ती आजवर पाहिली.
दुसरी व्यक्ती म्हणजे शांताक्का, पतीच्या निधनानंतर चार मुलींची जबाबदारी एकटीवर पडलेली असताना जिद्दीने परिस्थितीला सामोरी गेलेली ही हिरकणीच. शेतीवाडी नाही, जमीनजुमला नाही मग करायचे काय असा प्रश्न असताना त्या रडत बसल्या नाहीत तर पतीचा दाढी-कटिंग चा व्यवसाय त्यांनी पुढे ३५ वर्षे चालू ठेवला. आजही त्या कोणापुढेही हात पसरत नाहीत, तोच व्यवसाय करून उपजीविका करतात. एका महिलेकडून खेडेगावात दाढी करून घेण्याचे पहिले पाऊल गावच्या सभापतींनी उचलले म्हणून बाकी लोकांनाही त्यात काही गैर नाही हे पटले असावे. याच व्यवसायाच्या मदतीने या माउलीने आपल्या चार मुलींच्या लग्नाचा खर्च पेलला.
Pg_1_2_1S
समाजात काही व्यक्ती थोड्या वेगळ्या असतात, काहीतरी चांगले करत असतात पण त्यांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही , किंबहुना प्रसिद्धीसाठी त्या काम करत नसतातच मुळी. काहीजण जगण्याचे तत्व म्हणून, काहीजण गरज म्हणून तर काही आपल्या आचरणातून जगाला चांगला संदेश द्यायचा म्हणून इतरांहून वेगळे आयुष्य जगत असतात. चाकोरीच्या बाहेर जाऊन वाटा धुंडाळत असतात. तसे पाहायला गेले तर आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण असते. आपल्या आजूबाजूलाही अशा व्यक्ती असतात पण त्यांचे मोठेपण सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही. कारण एकतर त्यांचा तसे वागण्यामागचा विचार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नसू अथवा  डोळ्याला झापडे लावून बसत असू. किंवा अगदीच विचित्र किंवा विक्षिप्त माणूस असेही कधी कधी लेबल देत असू. या व्यक्ती फार मोठे काही काम करत नसतीलही, पण अनेक छोट्या गोष्टीं विशिष्ठ पद्धतीने करताना फार मोठे विचार त्यामागे असू शकतात. या लोकांचे वागणे, त्यांचे विचार आपल्याला समजून घेता आले पाहिजेत.
नाना पवार हे असेच एक व्यक्तिमत्व. कराडला कॉलेजला असताना अनेकदा प्रीतीसंगमावर जाणे व्हायचे. एकदा त्यांची भेट झाली. ते गेली कित्येक वर्षे दररोज पक्षी आणि माशांसाठी खाऊ घेऊन येतात. सुरुवात त्यांनी एकट्याने केली असली तरी आता अनेक हात त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत. दुपारी उन्हे उतरायला लागल्यावर ते सायकलला पिशव्या अडकवून घरातून निघतात आणि दुकाने, हॉटेल, खाऊच्या गाड्यांवरून आणि घराघरांतून लोक देतील ते जमा करून कृष्णा- कोयनेच्या संगमावर येतात. कृष्णामाईची आरती करून, मासे आणि पक्ष्यांसाठी आणलेले अन्न किनाऱ्यावर आणि पाण्यात सोडून ते जातात. पक्ष्यांनाही याची एवढी सवय झालेली आहे की तिन्हीसांजेला संगमावर कोणत्याही निमंत्रणाशिवाय सगळे पक्षी जमा होतात.



खरेच किती सातत्याने त्यांचे हे व्रत अखंड चालू आहे, विशेष कौतुक वाटते मला या माणसांचे.

माझी आजी एकदा मला रागावली होती ते सहज आत्ता या निमित्ताने मला आठवले. मी तांदूळ की गहू काहीतरी निवडत होते आणि खडे काढून टाकताना त्यातील साळी(टरफल न निघालेले धान्य) फेकून देत होते. आजी मला रागावताना म्हणाली "अग जे तू कचऱ्यात टाकून देतेयस तेवढ्यावर लहान मोठ्या किमान २५ जीवांची भूक भागली असती", एका छोट्या प्रसंगातून तिने मला केवढी महत्वाची गोष्ट शिकवली होती ते आज लक्षात येते. तो बालमनावर केलेला संस्कार होता, तो रुजला. त्यामुळेच आजकाल जेव्हा होस्टेलमध्ये रोज मुलींनी ताटातून खरकटे टाकलेले अन्न  शेकडो किलोने वाया जाताना पाहते तेव्हा जीव तुटतो.
आदर्श ठेवण्यासाठी, धडे गिरवण्यासाठी आणि चांगले काम करण्यासाठी प्रत्येक वेळी झाशीची राणी, छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी, डॉ. कलाम, इंदिरा गांधी किंवा अल्बर्ट आईनस्टाईन यांचीच चरित्रे वाचली पाहिजेत असे काही नाही. ही मोठी माणसे आपल्याला खूप काही शिकवून गेली आहेतच पण आपल्याच घरात आपली आई किंवा शेजारी राहणारे काका, शेवटच्या बाकावर बसलेला आपलाच मित्र हेही तितकंच मोलाचं काही आपल्याला सांगू पाहात असतात. आपल्याला ते डोळसपणे पाहता आले पाहिजे आणि नम्रपणे ऐकता आले पाहिजे. भल्या  माणसांच्या अशा छोट्या छोट्या कृतींमधून आपल्याला काही शिकता आले, प्रेरणा घेता आली तर आणखी काय हवे, नाही का?  

Monday, 18 April 2016

जलसा

हातात कोणीतरी दिलेला लाडू चिवडा.. थोडी जीर्ण झालेली, थोडी कसली! बरीच जीर्ण झालेली एक हिरवी नऊवार.. डोक्यावरून पदर, कपाळी भला मोठा कुंकवाचा टीळा, एका पायात निळी-पांढरी थोडी अपुरी चप्पल तर दुसऱ्या पायात लाल चप्पल, अंगठ्याच्या पुढे आणि टाचेच्या मागे इंच-इंच जागा उरेल अशी एक! अनुभवाने आलेले शहाणपण डोळ्यांत दिसत होते..
काटक अन सडपातळ देहयष्टी, चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहून तर्क केला, सहज पन्नासेक वर्षाचा संसार झाला असेल या आजीचा.. हरीसप्ताहात विठूरायाची भजने, अभंग गायला ती आली नाही तर गावालाच चुकल्यासारखे वाटेल. गोड गळा आणि मुखात हरीनाम..ही जलसा आजी साऱ्या गावाची..आणि ती स्वत:साठी मात्र तिच्या बाप्पुरावची! उठता बसता बाप्पुरावचे नाव ओठी.. आणि नाव घेतले की एक खळखळून हास्य! कोणालाही तिचा हेवा वाटावा असे. गावातील कोणत्याही लग्नकार्यात, मंगलप्रसंगी उखाणा घ्यायचा म्हटलं तर जलसाआजी सर्वात पुढे.. प्रसंग कोणताही असो, शब्दांची गुंफण क्षणार्धात.. चहा पिताना बाप्पुराव, चिवडा खाताना बाप्पुराव,
“एकदा केला निवून गेला, चिवडा करीन ताजा,
बाप्पुरावचं नाव घ्याया पहिला नंबर माझा”
महादेवाच्या पिंडीवर बेल वाहताना बाप्पुराव, नवी नवरी पाहिली त्यावरून उखाणा त्यातही तिचा बाप्पुराव, कांदे लसणाच्या पिशव्या भरताना दिसले तर त्यावरून हा
“भरले कांदे, भरला लसूण, पिशव्या झाल्या दोन,
बाप्पुरावचं नाव घेते, पोहोचल्यावर करा फोन”
वटसावित्रीच्या पूजेपासून बेंदूर, पंचमी, गौरी गणपती, दसरा-दिवाळी, संक्रांत, गुढीपाडवा करत आषाढी एकादशीपर्यंत वर्षाच्या साऱ्या सणांना एका उखाण्यात बाप्पुरावच्या नावासाठी, माळेचे मणी ओवल्याप्रमाणे सुंदर ओवणारी ही साऱ्या गावाची जलसा...आणि एक कटू सत्य!
बाप्पुरावनं हिला कधी नांदवलीच नाही, दुसरे लग्न करून संसार थाटला!
आणि हीचं सारं आयुष्य त्याचं उखाण्यात नाव घेण्यात..
माहेरी कोणीतरी दिलेल्या भाकरतुकड्यावर जगून शेळ्या-मेंढ्यापाठी रानावनात!


-    मेघा निकम 

Sunday, 8 November 2015

माझा मोबाईल

माझा मोबाईल…
काही गोष्टी आपल्यासोबत खूप दिवस राहतात. माझा मोबाईल त्यापैकीच एक. Sony Ericsson Live with Walkman चा एक सुंदर फोन गेली तीन साडेतीन वर्षे माझ्याकडे आहे. माझ्या बहिणीने तो मला घेऊन दिलेला. आकर्षक शुभ्र देहयष्टी, खणखणीत आवाज आणि आणखी बऱ्याच उपयुक्त गुणांमुळे तो सदैव माझा प्रिय आहे. तो तसाच सुंदर शुभ्र राहावा म्हणून मी त्याला खूप जपला.

 तो अनेकदा माझ्या हातातून पडलादेखील, पण कव्हर आणि स्क्रीनगार्ड  असल्यामुळे त्याला अजूनही कुठे इजा किंवा दुखापत झालेली नाहीये.  आज मात्र तो फोन अगदीच निकामी झाल्यासारखा वाटतोय. सकाळी बसमधून येताना तो रेंज पकडत नव्हता. किमान २५ वेळा तो बेशुद्ध होऊन थोड्या वेळात शुद्धीवर यायचा. मला वाटलं वयोमानामुळे त्याला आता प्रवास झेपत नसावा. प्रवासात असताना कदाचित त्याला प्रत्येक ठिकाणी वेगळ्या tower चे नेटवर्क पकडावे लागत असेल.  मी त्याची बैटरी काढून ठेवली. लोणावळ्यात बस थांबल्यावर मी पुन्हा त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण त्याची परिस्थिती काही सुधारली नाही. आता होस्टेलवर पोहचल्यावर त्याला खाऊ पिऊ  घातले (फुल चार्ज केला ) पण अजूनही त्याची गत तशीच आहे. मला वाटते हा आता थोड्या दिवसांचा सोबती आहे. त्याला जास्त मेहनत करावी लागू नये अशी काळजी मला आता घ्यावी लागेल. मोबाईल सारख्या वस्तू replace करता येतात, त्यामुळे काही दिवसांनी याची जागा दुसरा कोणतातरी फोन घेईल. मी याला हळूहळू विसरूनही जाईन. पण त्याने वेळोवेळी मला केलेली मदत लाखमोलाची आहे. त्याची नोंद घ्यावीच लागेल म्हणून हा छोटासा लेख…  

Friday, 30 October 2015

यू टर्न

"यू टर्न" 
खूप दिवसांची इच्छा होती हे नाटक पाहण्याची… पण प्रयोग असेल तेव्हा नेमकं काहीतरी असायचं submission, exam वगैरे. आज सहज लोकसत्ता मधील प्रयोगाची जाहिरात पाहिली आणि ठरवलं, आज पाहायचाच.. आजचा नाटकाचा ५८० वा प्रयोग होता.  नाटक म्हटलं की आधीच मी खूप उत्साही असते. कोणत्याही movie पेक्षा हे वेगळं असतं. वेळ पाहिला, bag उचलली आणि निघाले.

डॉ. गिरीश ओक आणि ईला भाटे यांचा अभिनय म्हणजे उत्तमच… एवढ्या मोठ्या कलाकारांबद्दल किंवा मोठ्या लेखनाबद्दल मी पामराने काय बोलावे! पण मला जे अगदी मनापासून वाटलं ते सांगते. घटस्फोटीत मेजर सुधीर वैद्य आणि विधवा रमाबाई गोखले यांची ही कथा…एकाकीपणा घालवण्यासाठी companion म्हणून राहण्याचा ते निर्णय घेतात. दोन व्यक्ती भेटतात, प्रेमात पडतात, घरच्यांचा (मुलांचा ) विरोध, मग समजावणे आणि नंतर लग्न अशी typical story नाहीये ही किंवा दोन एकाकी माणसांचे रडगाणेही नाहीये … संवाद खूप सुंदर लिहले आहेत याचे.  त्यातून हा विषय अगदी  मनाला जाऊन भिडतो. या नाटकातील मला आवडलेली काही वाक्ये 
"अपेक्षाभंगाचे दुःख वाटून घेण्याचा अधिकार कोणालाच नसतो, कारण आपण अपेक्षा ठेवतो म्हणून अपेक्षाभंग होतो . रोप लावतानाच आपण अशी अपेक्षा ठेवतो की उद्या त्याला फुलं-फळं येतील आणि आपल्याला सुख आणि आनंद देतील, असं करणं म्हणजे त्या रोपाच्या मुळाशी दुःखाचं बीज पेरणं… "
मेजर आणि गोखलेबाईनी मुलांकडून ठेवलेल्या अपेक्षा फार मोठ्या नव्हत्या… पण  मुलांना आपला निर्णय पटला नाही आणि म्हणून ते आपल्याशी तुटक वागायला लागले याचे दुःख फार मोठे… 
सगळं आयुष्य मुलाबाळांसाठी वेचलेल्या पालकांनी आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आल्यावर सोबतीचे सुख मिळावे म्हणून केलेला प्रयत्न, याला मुलांची नापसंती आहे हे कळल्यावर पुन्हा एकटे राहण्याचा निर्णय घेताना एकमेकांशी किंवा कदाचित स्वतः च्या मनाशीच केलेला वाद… 
मुलांच्या हौसेमौजेखातर आणि त्यांना पाहिजे ते मिळावे म्हणून झटणारे, त्यांचे  हट्ट पुरवणारे आपण, आपल्या आयुष्याच्या उतरार्धात किमान त्यांनी आपल्या गरजांचा तरी विचार केला पाहिजे. आपल्या एकटेपणाबद्दल केवळ कोरडी सहानुभूती दाखवण्यात काय अर्थ ? एवढीच त्यांची मुलांकडून अपेक्षा !
आणखी एक असेच वाक्य,  
"आता सुख दुःखाकडे जर वेगळ्या दृष्टीने पाहता आले पाहिजे नाहीतर प्रत्येक पावसाळ्यात आभाळातून अंगावर पाणी पडलं आणि वाहून गेलं, एवढाच आयुष्याला अर्थ उरायचा… " 
नाटकात वेळोवेळी बोलल्या गेलेल्या संवादांना तत्वज्ञानाची एक किनार आहे. मानवी नात्यांबद्दल आपल्या  ज्या संकल्पना आहेत त्याबद्दल पुन्हा विचार करायला या नाटकाने मला भाग पाडले. नाटकाला बव्हंशी ज्येष्ठ नागरिक मंडळी होती पण मी २२ वर्षांची म्हातारी हे नाटक पाहून त्यातील विचारांनी समृद्ध झाले  आणि पुन्हा तरुण झाले एवढं नक्की… 

Monday, 28 September 2015

बदलतंय काहीतरी...

आज सहजच जुनी डायरी काढली… मीच ४-५ वर्षांपूर्वी लिहलेल्या दोन ओळी… 

"सहा महिन्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या, परिस्थिती बदलली, स्वभाव बदलले, group बदलले.  थोडक्यात काय तर हे सगळं नेहमीच बदलत असतं, बदलत राहणार आणि जरी ते नाही बदललं तरी मला ते बदलल्यासारखं वाटणार कारण मीच बदलतेय, माझा दृष्टीकोन बदलतोय… "

बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. रोज कानावर शब्द पडतातच ना " सगळं जग बदलतंय, काळाबरोबर बदलायला नको?" असे काहीसे . गंमत वाटते कधीकधी मला ही सगळी. आज माझी डायरी वाचून मला जाणवले मी स्वत:पण त्या गमतीचाच एक भाग आहे. 

Saturday, 25 July 2015

भूरीबेन विरीयाभाई राठवा ऊर्फ "आमची दादी"

                    आमची दादी… मलाजा मुक्कामात पूर्ण दोन महिने आमची काळजी घेणारी आणि निरपेक्ष प्रेम करणारी ही एकमेव व्यक्ती… पहिल्या दिवशी मात्र तिला घरी पाहिलेले मला आठवत नाही. कुठे गेली होती कोणास ठाऊक? दादीचे जावई रामसिंगभाई भाषा केंद्रात काम करतात. त्यांच्या घरी आमची राहण्याची व्यवस्था केलेली होती. ते घरजावई असल्याने अर्थातच त्यांचे सासू सासरे म्हणजे विरीयाभाई आणि भूरीबेन यांच्या राहत्या घरी आम्ही  गेलो. विरीयाभाई सरकारी वन संशोधन केंद्रात काम करतात. आम्ही त्यांना दादाजी म्हणू लागलो. आणि भूरीबेन झाली आमची हक्काची दादीमा… 

              त्यांच्या भाषेत लहानांसाठी  तू आणि मोठ्यांसाठी तुम्ही असे वेगवेगळे संबोधन नसल्यामुळे बोलताना सर्वांशी एकेरी बोलतोय असं वाटायचं. पण हळूहळू त्याची सवय झाली. आणि दादीला हिंदी येत नसल्यामुळे तिच्याशी राठवी बोलताना तीचे एकेरी संबोधन होऊ लागले. पण त्यामुळे तिच्याबद्दल आपसूक जवळीक वाटू लागली. आमच्यासाठी दादी 'मकईनू रोटला' म्हणजेच मक्याची भाकरी करायची. रोटला एवढा मोठा असायचा की एकावेळी अर्ध्याच रोटल्यात पोट भरायचे.  पण अगदी चवदार… रुचकर आणि खमंग भाजलेला तो रोटला खाल्ला की अगदी तृप्त व्हायचो आम्ही. भाजी शक्यतो दारात लावलेल्या गवार, वांगे, दुधी भोपळा, कोबी किंवा बटाट्याची असायची. भरपूर तेल आणि हळद, चवीला थोडंसं मीठ आणि मिरची एवढाच काय तो भाजीचा मसाला! पाणी न घालता फक्त तेलावर शिजवलेली तिने केलेली भाजी विशेषत: वांग्याची भाजी खूपच छान व्हायची.
                  गव्हाच्या रोटीला ती 'गमनी रोटली' म्हणायची… तिने केलेली ती रोटली खाणे मात्र जिवावर यायचे. शक्यतो दुपारी कधी चपाती करायची असेल तर मीच करायचे. एकदा ती मला मदत करायची म्हणून आली. मी तिला म्हटलं "मी लाटून देते, तू भाजून घे." तिच्या पद्धतीने चपाती भाजताना चपातीला तेल लावत नसत. मी तेलाची किटली जवळ घेऊन बसले होते. दोन तीन वेळा चपाती उलटल्यावर तिला म्हटलं "तेल लाव थोडं" तिने पळीभर तेल ओतलं आणि चपाती जणू तळून काढली! नंतर माझ्या लक्षात आलं की तिला सांगण्याआधी मी करून दाखवायला हवं होतं. मग ती शिकली आणि नंतर बरोबर करायला लागली. पण तरीही तिने मक्याची भाकरीच करावी असा आमचा आग्रह असायचा. रात्री मक्याची भाकरी करून ठेवायची आणि आम्ही जेवायला उशीर करत असू तर "बेन, रोटला थी जो !" म्हणून आवाज द्यायची. 
                     चुलीवर स्वयंपाक करायला मला तिनेच शिकवले. याआधी कधी मी चुलीवर स्वयंपाक नव्हता केला. (एकदा आई कुठेतरी गेलेली असताना चुलीवर वांग्याचं भरीत तेवढं केलं होतं. मस्त झालं होतं कारण माझ्यासोबत ते खाल्ल्यावर शेजारच्या छोट्या मुलाने त्याच्या आईला हट्टाने ते शिकून घ्यायला सांगितलं होतं. आणि त्यादिवशी आम्हाला जेवण पुरलं नव्हतं.)



               तर ही माझी दादी रोज सकाळी सकाळी मला उठवायची चहा प्यायला.  बिनदुधाचा चहा मी तिच्या प्रेमाखातर दोन महिने दररोज घेतला. कधीकधी तर सकाळी लवकर केलेला चहा ग्लासमध्ये भरून गरम राहावा म्हणून ती चुलीत निखाऱ्यांवर ठेवायची. आणि मी उठल्यावर तो ग्लासभर चहा प्यायचे. नंतर नंतर तिने चहा बनवून ठेवण्याऐवजी सगळे साहित्य काढून ठेवायची. पातेले, गाळणी, पाणी आणि चहापत्ती (वाघबकरी मसाला चहा ) सगळं बाजूला काढून ठेवून मला हाक मारून मग तिच्या कामाला जायची. "बेन चा पिवो" असं दटावायची… साखरेला मोरुस, पातेल्याला तपेली, आणि चहाला चा म्हणायची तर गवतीचहाला लिली चा… कधी आले, पुदिना, गवतीचहाचा चहा प्यायची मला लहर यायची. मग मी स्वत: बनवून प्यायचे.

                    घरात नेहमी एकटीच असल्याने सतत कोणत्यातरी कामात ती स्वत:ला गुंतवून ठेवायची. घरातली सर्व कामे तीच करायची पण तरी ती तिच्या मर्जीची मालकीण होती. कसलीही तक्रार नाही. एखाद्या दिवशी खाटेवर पडून राहायची आणि मला म्हणायची "आज खूप काम आहे पण मी नाही करणार." तिच्यासोबत एकदोनदा मी शेतात गेले. तिला काम करताना पाहून माझ्या आईची आठवण झाली मला. माझी आईसुद्धा असंच काम करत असते दिवसभर. अखंड…
                           दादीने दारात अळू लावलेली होती. दर ४-८ दिवसांनी ती काही पाने काढून विकायला जायची. सोबत पुदिना आणि लिंबे पण विकायची. बाजारात गेल्यावर तिकडचे रस्ते पाहून तिचा गोंधळ व्हायचा म्हणून शक्यतो बाजारात न जाता बाजारपेठेच्या अलीकडेच दारोदार जाऊन ती ते विकायची. 


               
              एरवी घरात ओढणीच गुंडाळलेली असायची पण बाजारात जाताना मात्र छान साडी घालून जायची. निरोप घेताना तिला एक साडी दिली. ती स्वीकारताना बरेच आढेवेढे घेतले तिने पण "ती तुझ्याचसाठी आहे आणि तूच ठेव" म्हटल्यावर तिच्या डोळ्यातील जो आनंद होता तो लाखमोलाचा… 
              घरात तिचा दरारा होता, मनमानी होती, आपलं मत विचारणार पण स्वत:च्या मनाचंच करणार अशी तिची ख्याती होती. तिला मी काम करताना पाहिलं, ओरडताना पाहिलं, हसताना पाहिलं, रडताना पाहिलं तर कधी पदराआड अश्रू लपवतानाही पाहिलं. तिची जगण्याची उर्मी पाहिली.
              एकदा शेतात गेले असता मी तिला म्हटलं "मी तुला शिकवते, माझा फोटो काढ".  मला नाही जमणार मला नाही जमणार असं ती म्हणत असतानाही उगीचच तिच्या हाती कॅमेरा सोपवून दिला. आधी दोन - चार फोटो काढताना कॅमेरा हलला पण नंतर तिला जमलं. तिने काढलेला माझा हा फोटो.

तिला फोटो काढायला जमले याच्या आनंदाने फुललेला तिचा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही. त्याक्षणी ती जगातील सर्वात आनंदी व्यक्ती होती…. 



Friday, 8 May 2015

आणखी एक वर्ष सरलं ...

                        नवीन वर्ष, नवीन हर्ष … प्रत्येक नवीन वर्ष असंच एक उत्साह घेऊन येत असतं. आपल्यासाठी नवीन वर्ष हे एकाच वर्षात किमान ४ वेळा सुरु होत असतं. इंग्रजी कॅलेंडरनुसार १ जानेवारीला, दुसरं गुढीपाडव्याला, तिसरं म्हणजे आपला आपला वाढदिवस आणि चौथं नवीन वर्ष म्हणजे आपण एक इयत्ता पास होऊन पुढच्या वर्गात जातो ते नवीन शैक्षणिक वर्ष. किमान ४ वेळा यासाठी म्हटलं की काहीजणांसाठी आर्थिक वर्ष एप्रिल मध्ये सुरु होऊन मार्च मध्येही संपतं. आणखी वेगळा दिवस असेल जेव्हा कोणाचंतरी नवीन वर्ष 'तेव्हा' सुरु होत असेल. संस्थेचा वर्धापनदिन, लग्नाचा वाढदिवस वगैरे… 
                    माझंही एक शैक्षणिक वर्ष आज संपलं; आणि उद्यापासून नवीन सुरु. हल्ली भली मोठी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे उंबराचं फूल. गेली तीन वर्षं मी या उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीतरी training, project वगैरे करायचं ठरवलं आणि त्यामुळे पाहिजे तशी सुट्टी काही मिळाली नाही.
                              एकेक वर्ष किती पटापट निघून जात आहे. शाळेचा पहिला दिवस काही मला आठवत नाही पण हायस्कूलचा पहिला दिवस चांगलाच आठवतोय. सकाळी बाबा गाडीवर सोडायला आले होते शाळेत. दुपारी पाऊस सुरु झाला आणि ३:०० वाजता शाळा सुटली. आईने डब्यात तोंडल्याच्या चकत्या करून त्याची भाजी दिली होती चपातीसोबत. तो पाऊस, ती नवीन शाळा, ती मी… सगळं अजून तसंच चित्र दिसतंय डोळ्यांसमोर.
                             दहावी झाली, बारावी झाली, पाहता पाहता engineering पण झालं पूर्ण. दिवस पाखरासारखे की कापरासारखे कुणास ठाऊक ? पण उडून जातात भुर्रकन, हे मात्र नक्की. मी मुंबईत आले. मुंबई मला खूप आवडते. पण मुंबई जेवढी training च्या १५ दिवसात पाहिली होती तेवढीपण नाही पाहिली गेल्या एक वर्षात. हां, म्हटलं तर मराठी नाटक आणि films पाहिल्या. भरत  जाधवचं पुन्हा सही रे सही, मुक्ता बर्वेचं छापा काटा आणि लव्हबर्डस. खूपच सुंदर नाटके आहेत ही. चांगली कलाकृती पहायची असेल तर अशी नाटके पाहावीच. आणि आणखी एक, तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी मिळत असेल तर अशा कार्यक्रमांना एकदा हजेरी लावाच.  ही सुट्टी कायम स्मरणात राहील.
                                 माझं बोलणं नेहमीच असं भरकटत जातं. तर या येणाऱ्या नवीन वर्षात आणखी काही नवीन करता येईल याचं planning सध्या माझ्या डोक्यात, मनात सुरु आहे. तुमच्याकडे काही नवीन कल्पना असेल तर comment  box मध्ये लिहा. मला जे सुचेल, जे मी करेन ते upcoming article मध्ये पाहालच!


Thursday, 30 April 2015

सत्तावीस उणे नऊ


अकबर बिरबलाची एक गोष्ट लहानपणी वाचली होती. त्यात कोणीतरी विद्वानाने अकबराच्या दरबारातील सर्वांना पेचात टाकलेले असते. एक साधा प्रश्न विचारून त्यांना कोड्यात टाकलेले असते. प्रश्न असा होता की सत्तावीस उणे नऊ म्हणजे किती ? तर 'अठरा' या उत्तरावर समाधानी होतो तो विद्वान कसला!!

मग प्रश्नाचं उत्तर द्यायला बिरबल पुढे सरसावला आणि म्हणाला. "सत्तावीस उणे नऊ म्हणजे शून्य." आता हे शून्य कसं ? तर वर्षात एकूण नक्षत्रे असतात सत्तावीस, त्यातील नऊ नक्षत्रे पावसाची असतात आणि तीच वजा केली तर हाती काहीच उरत नाही. हे एका शेतकऱ्याच्या दृष्टीकोनातून किंवा इतर व्यावसायिक दृष्टीने पाहिले की पटते. हंगाम किंवा ऐन उमेदीचा काळ हातातून निसटला तर बाकी शून्यच , नाही का?

मला हीच गोष्ट आपल्या आयुष्याशी निगडित वाटते. तारुण्य आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा उमेदीचा काळ. सत्तावीस नक्षत्रांपैकी नऊ प्रमाणेच आयुष्याचा एक तृतीयांश भाग हा तारुण्याचा असतो.  हा कालावधी हातून निसटता कामा नये. या वयात नवीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते.  एकदा तो उत्साह गेला कि मग जगाच्या रहाटगाडग्यात तो ही गुंतून पडतो.  मी असंही वाचलंय कुठेतरी की माणूस त्याच्या वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत हाती घेतलेली कोणतीही गोष्ट, कृती, काम तडीस नेवू शकतो. किंबहुना निसर्ग त्याला हे काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी ऊर्जा देत राहतो. अर्थात त्यानंतर तो करू शकत नाही असं माझं म्हणणं नाहीये. आपलं तारुण्य टिकवणंसुद्धा आपल्याच हाती आहे. ती जिद्द, तो उत्साह आयुष्यभर टिकवणारे लोक पुढे महान झालेली कित्येक उदाहरणे आहेत जगात.

पण या पावसाळ्याच्या नऊ नक्षत्रांचा हवा तसा लाभ करून घेता आला तर उरलेल्या १८ नक्षत्रांमध्ये विविध प्रयोग करून वर्षाचं उत्पन्न दुप्पट तिप्पट करायलाही मजा येईल ना! नाहीतर पावसाळा वाया गेला म्हणून दु:ख करत बसणारे अन पुढचा पावसाळा येईपर्यंत हातावर हात धरून खंत करणारेही 'जगतात'च त्याचं आयुष्य, खरंतर ते रेटत असतात आयुष्य.… 

Thursday, 26 March 2015

ओळख

                    Tell me about yourself  असं आपल्याला जेव्हा कोणी विचारतं ना, तेव्हा आपण खूप मोकळे  नाही बोलत अनेकदा. मुलाखत असो वा सभा-समारंभातील भेटीगाठी, समोरच्याला जे अपेक्षित आहे ते सांगतो. किंवा कुठेतरी आपली ओळख करून दिली जाते तेव्हा ती अगदी सोयीस्कररित्या पाहिजे तेवढीच केली जाते. करून दिलेल्या ओळखीतून आपण मग एकमेकांना तोलतो. मिळालेला पुरस्कार, दहावी-बारावीचे मार्क्स , आपला व्यवसाय, आपण घेतलेली शैक्षणिक पदवी हीच आपली ओळख असते का? त्याच्याही पलीकडे आपण व्यक्ती म्हणून असतो ना ! आपली आवड, छंद , स्वभाव याची फारशी माहिती दिली जात नाही. 
                             मला कधीकधी वाटतं, आपण चुकीची गाडी तर नाही ना पकडली ? की गाडी बरोबर आहे पण रस्ता चुकलोय? शिक्षण , नोकरी  किंवा व्यवसाय हे सर्व म्हणजे जगण्याची फक्त साधने होती ना! ती साध्य केव्हा बनली तेच बहुतेक आपल्याला कळलं नसावं. ध्येय गाठायचं आहे म्हणताना प्रवासात येणाऱ्या सुंदर गोष्टी अनुभवायच्या राहून तर नाही ना जात आपल्याकडून ? आजचा दिवस सुंदर आहे, हे जग सुंदर आहे, इथली माणसे खूप मस्त आहेत, छान छान पुस्तके आहेत, मंजुळ संगीत आहे, सूर्योदय आशादायी आहे मग अनेकांचं जीवन का निराशावादी बनत चाललंय? कुठेतरी चुकतंय काहीतरी!
                                इथे कोणी मृगजळाच्या मागे धावतो, कोणी ओअसिस शोधत फिरतो  आणि कितीतरी लोक एकाच पाणवठयावर आयुष्यभर जगतात. पण समाधानाने मरणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच सापडतील. आयुष्य संपत आल्यावर "अरे जगायचं राहूनच गेलं" असं वाटून घेण्यापेक्षा आजच जगून घेऊया… 
                                    आपली ओळख हे आपलं जगणं असावं, आपलं हसणं आणि बोलणं असावं ! 


Tuesday, 7 October 2014

आज कोजागिरी पोर्णिमा.......
मागच्या  वर्षी केलेली कविता आज पुनः आठवली.

"पोर्णिमेच्या चंद्राची सोबत , चांदण्यांची साथ संगत
रात्रीचा थंड वारा ,अन  मित्रांसोबत  गीत मैफिलीची  रंगत
कोजागिरीची स्मरणीय रात्र , त्यात दुग्धशर्करा केशरसोबत ...."

आज तसे friends सोबत नाहीत इकडे  IIT मधे त्यामुळे काही celebration  पण  नाही
मागच्या वर्षी क्षितिजवर स्नेहल, प्रेरणा, प्रणिता यांच्यासोबत मस्त enjoy  केला  होता.चंद्राचे photos काढले होते।  भजी  करून खाल्ली  होती  आणि गप्पा मारत terrace वर  बसलो  होतो, कधीकधी तेच  दिवस  खूप छान  वाटतात या आताच्या busy schedule कड़े  पाहिल्यावर