Thursday, 24 December 2015

नवे पर्व... नवा प्रवास...

२०१५ चे शेवटचे काही दिवस उरलेत … वर्ष सरताना नाही म्हटलं तरी गेलेल्या वर्षाचा मागोवा घेतला जातोच. या वर्षात अनेक महत्वपूर्ण गोष्टी घडल्या. माझ्यासाठी काही जग इकडचे तिकडे नाही झाले पण मला मिळालेली अनुभवाची शिदोरी नक्कीच मोठी आहे. 
                २०१४ ची जागृती यात्रा सुरु होती न त्या यात्रेसोबत मी उडीसाहून बिहारमधील नालंदा विद्यापीठाकडे प्रयाण करत असताना आम्ही ट्रेनमध्येच नवीन वर्षाचे स्वागत केले. त्याचदिवशी आम्ही आमच्या Water group तर्फे "save water" अर्थात "पाणी वाचवा" मोहीम राबवली. जागृती यात्रा उत्साहात पूर्ण केली आणि त्याचबरोबर नवीन लोकांशी मैत्रीही झाली. मला एक फ्रेंच मैत्रीण मिळाली
सुहानी… गुजरातमधील अहमदाबादहून यात्रेसाठी आलेली मुलगी माझी अगदी जवळची मैत्रीण झाली. अर्चना... एक हसतमुख सुंदर मुलगी मला आयुष्यभराची प्रेरणा व मार्गदर्शक म्हणून लाभली. जगावं तर तिच्यासारखं अशी मुलगी. 

त्यानंतरचा उल्लेखनीय प्रवास आणि अनुभव म्हणजे मलाजा… गुजरातच्या छोटा उदेपूर जिल्ह्यातील एक आदिवासी गाव … मी माझ्या मनाचा राजा, ना सवयीचा गुलाम, ना ही वेळेचा… अशी जीवनपद्धती असलेल्या राठवा कुटुंबात मी जगण्याची नवीन कला पाहत होते, शिकत होते, अनुभवत होते. दोन महिने रोज सकाळी आले, पुदिना किंवा गवतीचहा घालून बनवलेला कोरा चहा न चुकता समोर यायचा अन दिवसाची गोड सुरुवात व्हायची. हळद , मीठ, मिरचीची तेलात फोडणी देऊन केलेली कोणतीही भाजी आणि मक्याची भाकरी हेच रोजचे जेवण… कधी कधी आमटी-भात. आधी फक्त हातवारे करून सुरु झालेला संवाद हळूहळू शब्दांमध्ये व्हायला लागला. त्यांना आपली भाषा शिकवण्यापेक्षा त्यांचीच भाषा बोलणे सोप्पे पडले. माझ्या 'राठवी शब्दकोशा'त रोज २-४ शब्दांची भर पडू लागली. तिथे मला भेटलेली माझी माणसे म्हणजे भूरीबेन आणि विरीयाभाई. ते कधी माझे दादा-दादी झाले कळलेच नाही.
 
जगणे हे आपले उत्तरदायित्व आहे हे मी त्यांच्याकडून शिकले. दादीबद्दल मी या आधीही सविस्तर लिहले आहे. 

आनंदवनला भेट देण्याची माझी इच्छाही याच वर्षाच्या उत्तरार्धात पूर्ण झाली. जगण्याचं बळ मिळतं या प्रकल्पाला भेट दिल्यावर. बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खूप मोठे व्रत घेतले आहे. या कार्यात कोणत्याही रूपाने मला हातभार लावता आला तर मी माझे भाग्य समजेन. सहा वर्षांपूर्वी भेटलेल्या माझ्या अर्चूताईला मी या निमित्ताने पुन्हा भेटले. तिच्यासोबत तिच्या घरी असताना मला आपल्याच घरी असल्यासारखं वाटलं. तिच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे.

 हे सर्व पाहिलं की जाणवतं अजून खूप काही करायचं बाकी आहे आपलं… अखंड चालायला हवं…
              त्या प्रेरणेमुळेच की काय पण याच वर्षात मी एक नवीन प्रवास सुरु केला. दूर राहणारा पण सदैव सोबत असणारा कार्तीदादा भेटला मला. त्याच्या सोबतीने आणि निमित्ताने मी एका लहान मुलाच्या शिक्षणासाठी माझ्या परीने मदत करायला लागले. आपल्याला आपल्या आई-बाबांकडून खूप काही मिळाले, अगदी कशाचीच उणीव भासली नाही. मग एका होतकरू आणि गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आपला थोडा हातभार लागला तर आपल्याच जन्माचे सार्थक होईल. याचे श्रेय मात्र माझ्या या दादालाच. 
               प्रवास… कोणताही असो मग , प्रवासाची विलक्षण आवड असलेली मी या वर्षातील काही थरारक अनुभवांमुळे मात्र  थोडी वैतागले. अनपेक्षित अंगावर आलेल्या काही प्रसंगांमुळे माणूस घाबरतो… मीही थोडी घाबरलेच. सुट्टी असेल, project चं काही काम असेल किंवा सण -समारंभ, घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकाला प्रवास अपरिहार्य आहे.  त्यामुळे कुठेही थांबणे शक्य नाही… थांबले तरी पुढची मोठी झेप घेण्याकरता सिद्ध होण्यासाठी… सज्ज होण्यासाठी… काही दिवसांपूर्वीच Robert Frost ची एक कविता वाचनात आली.
Whose woods these are I think I know.   
His house is in the village though;   
He will not see me stopping here   
To watch his woods fill up with snow.   

My little horse must think it queer   
To stop without a farmhouse near   
Between the woods and frozen lake   
The darkest evening of the year.   

He gives his harness bells a shake   
To ask if there is some mistake.   
The only other sound’s the sweep   
Of easy wind and downy flake.   

The woods are lovely, dark and deep,   
But I have promises to keep,   
And miles to go before I sleep,   
And miles to go before I sleep.

                कितीही थांबावेसे वाटले तरी आपले इच्छितकार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा मैलांचा प्रवास करावाच लागेल. खूप आवडली मला ही कविता. नवीन वर्षात नव्या उत्साहाने नवीन प्रवासासाठी नव्या दिशेला जायला मी आता सिद्ध होत आहे.  तुम्हाला ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. तुमचाही हा प्रवास सुखाचा, आनंददायी आणि समृद्ध होवो.
चार वर्षांपूर्वी प्रवासात असतानाच मी लिहिलेली एक कविता….

प्रवास
कधी निसर्गाच्या सानिध्यात एकांतात
कधी आप्तेष्टांच्या सहवासात उत्साहात
प्रवास
कधी कधी आनंददायी रमणीय
तर कधी अगदीच कंटाळवाणा
प्रवास
कधी द्रुतगती मार्गाने सुसाट
कधी पायवाटेने अनवाणी
प्रवास
कधी नव्या दिशेचा शोध घेण्यासाठी
कधी मळलेल्या वाटाच पुन्हा तुडवण्यासाठी
प्रवास
     कधी फक्त मौज म्हणून
तर कधी त्याशिवाय गत्यंतरच नाही म्हणून
प्रवास
बसमधील असेल तर संपेल तासा- दोन तासांत
पण तरीही सुरूच राहील आयुष्याचा अखंड
प्रवास
जन्मापासून मृत्युपर्यंत माणसाच्या
की उत्पत्तीपासून लयापर्यंत ग्रह ताऱ्यांच्या ?
प्रवास
 एक कोडे याचे उमगलेच नाही मला
गणित सृष्टीचे सुटले का कुणाला?
प्रवास करताना विचार करते आयुष्याचा
की विचार करताना प्रवास करते आयुष्याचा?
~ मेघा


Sunday, 8 November 2015

माझा मोबाईल

माझा मोबाईल…
काही गोष्टी आपल्यासोबत खूप दिवस राहतात. माझा मोबाईल त्यापैकीच एक. Sony Ericsson Live with Walkman चा एक सुंदर फोन गेली तीन साडेतीन वर्षे माझ्याकडे आहे. माझ्या बहिणीने तो मला घेऊन दिलेला. आकर्षक शुभ्र देहयष्टी, खणखणीत आवाज आणि आणखी बऱ्याच उपयुक्त गुणांमुळे तो सदैव माझा प्रिय आहे. तो तसाच सुंदर शुभ्र राहावा म्हणून मी त्याला खूप जपला.

 तो अनेकदा माझ्या हातातून पडलादेखील, पण कव्हर आणि स्क्रीनगार्ड  असल्यामुळे त्याला अजूनही कुठे इजा किंवा दुखापत झालेली नाहीये.  आज मात्र तो फोन अगदीच निकामी झाल्यासारखा वाटतोय. सकाळी बसमधून येताना तो रेंज पकडत नव्हता. किमान २५ वेळा तो बेशुद्ध होऊन थोड्या वेळात शुद्धीवर यायचा. मला वाटलं वयोमानामुळे त्याला आता प्रवास झेपत नसावा. प्रवासात असताना कदाचित त्याला प्रत्येक ठिकाणी वेगळ्या tower चे नेटवर्क पकडावे लागत असेल.  मी त्याची बैटरी काढून ठेवली. लोणावळ्यात बस थांबल्यावर मी पुन्हा त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण त्याची परिस्थिती काही सुधारली नाही. आता होस्टेलवर पोहचल्यावर त्याला खाऊ पिऊ  घातले (फुल चार्ज केला ) पण अजूनही त्याची गत तशीच आहे. मला वाटते हा आता थोड्या दिवसांचा सोबती आहे. त्याला जास्त मेहनत करावी लागू नये अशी काळजी मला आता घ्यावी लागेल. मोबाईल सारख्या वस्तू replace करता येतात, त्यामुळे काही दिवसांनी याची जागा दुसरा कोणतातरी फोन घेईल. मी याला हळूहळू विसरूनही जाईन. पण त्याने वेळोवेळी मला केलेली मदत लाखमोलाची आहे. त्याची नोंद घ्यावीच लागेल म्हणून हा छोटासा लेख…  

Friday, 30 October 2015

यू टर्न

"यू टर्न" 
खूप दिवसांची इच्छा होती हे नाटक पाहण्याची… पण प्रयोग असेल तेव्हा नेमकं काहीतरी असायचं submission, exam वगैरे. आज सहज लोकसत्ता मधील प्रयोगाची जाहिरात पाहिली आणि ठरवलं, आज पाहायचाच.. आजचा नाटकाचा ५८० वा प्रयोग होता.  नाटक म्हटलं की आधीच मी खूप उत्साही असते. कोणत्याही movie पेक्षा हे वेगळं असतं. वेळ पाहिला, bag उचलली आणि निघाले.

डॉ. गिरीश ओक आणि ईला भाटे यांचा अभिनय म्हणजे उत्तमच… एवढ्या मोठ्या कलाकारांबद्दल किंवा मोठ्या लेखनाबद्दल मी पामराने काय बोलावे! पण मला जे अगदी मनापासून वाटलं ते सांगते. घटस्फोटीत मेजर सुधीर वैद्य आणि विधवा रमाबाई गोखले यांची ही कथा…एकाकीपणा घालवण्यासाठी companion म्हणून राहण्याचा ते निर्णय घेतात. दोन व्यक्ती भेटतात, प्रेमात पडतात, घरच्यांचा (मुलांचा ) विरोध, मग समजावणे आणि नंतर लग्न अशी typical story नाहीये ही किंवा दोन एकाकी माणसांचे रडगाणेही नाहीये … संवाद खूप सुंदर लिहले आहेत याचे.  त्यातून हा विषय अगदी  मनाला जाऊन भिडतो. या नाटकातील मला आवडलेली काही वाक्ये 
"अपेक्षाभंगाचे दुःख वाटून घेण्याचा अधिकार कोणालाच नसतो, कारण आपण अपेक्षा ठेवतो म्हणून अपेक्षाभंग होतो . रोप लावतानाच आपण अशी अपेक्षा ठेवतो की उद्या त्याला फुलं-फळं येतील आणि आपल्याला सुख आणि आनंद देतील, असं करणं म्हणजे त्या रोपाच्या मुळाशी दुःखाचं बीज पेरणं… "
मेजर आणि गोखलेबाईनी मुलांकडून ठेवलेल्या अपेक्षा फार मोठ्या नव्हत्या… पण  मुलांना आपला निर्णय पटला नाही आणि म्हणून ते आपल्याशी तुटक वागायला लागले याचे दुःख फार मोठे… 
सगळं आयुष्य मुलाबाळांसाठी वेचलेल्या पालकांनी आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आल्यावर सोबतीचे सुख मिळावे म्हणून केलेला प्रयत्न, याला मुलांची नापसंती आहे हे कळल्यावर पुन्हा एकटे राहण्याचा निर्णय घेताना एकमेकांशी किंवा कदाचित स्वतः च्या मनाशीच केलेला वाद… 
मुलांच्या हौसेमौजेखातर आणि त्यांना पाहिजे ते मिळावे म्हणून झटणारे, त्यांचे  हट्ट पुरवणारे आपण, आपल्या आयुष्याच्या उतरार्धात किमान त्यांनी आपल्या गरजांचा तरी विचार केला पाहिजे. आपल्या एकटेपणाबद्दल केवळ कोरडी सहानुभूती दाखवण्यात काय अर्थ ? एवढीच त्यांची मुलांकडून अपेक्षा !
आणखी एक असेच वाक्य,  
"आता सुख दुःखाकडे जर वेगळ्या दृष्टीने पाहता आले पाहिजे नाहीतर प्रत्येक पावसाळ्यात आभाळातून अंगावर पाणी पडलं आणि वाहून गेलं, एवढाच आयुष्याला अर्थ उरायचा… " 
नाटकात वेळोवेळी बोलल्या गेलेल्या संवादांना तत्वज्ञानाची एक किनार आहे. मानवी नात्यांबद्दल आपल्या  ज्या संकल्पना आहेत त्याबद्दल पुन्हा विचार करायला या नाटकाने मला भाग पाडले. नाटकाला बव्हंशी ज्येष्ठ नागरिक मंडळी होती पण मी २२ वर्षांची म्हातारी हे नाटक पाहून त्यातील विचारांनी समृद्ध झाले  आणि पुन्हा तरुण झाले एवढं नक्की… 

Monday, 28 September 2015

बदलतंय काहीतरी...

आज सहजच जुनी डायरी काढली… मीच ४-५ वर्षांपूर्वी लिहलेल्या दोन ओळी… 

"सहा महिन्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या, परिस्थिती बदलली, स्वभाव बदलले, group बदलले.  थोडक्यात काय तर हे सगळं नेहमीच बदलत असतं, बदलत राहणार आणि जरी ते नाही बदललं तरी मला ते बदलल्यासारखं वाटणार कारण मीच बदलतेय, माझा दृष्टीकोन बदलतोय… "

बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. रोज कानावर शब्द पडतातच ना " सगळं जग बदलतंय, काळाबरोबर बदलायला नको?" असे काहीसे . गंमत वाटते कधीकधी मला ही सगळी. आज माझी डायरी वाचून मला जाणवले मी स्वत:पण त्या गमतीचाच एक भाग आहे. 

Monday, 21 September 2015

ते १५ तास !!!!!!

             मुंबई ते पुणे प्रवास… घराच्या ओढीने, आप्तेष्टांच्या काळजीपोटी आणि प्रेमापोटी हजारो लोक पुणे - मुंबई प्रवास दररोज करत असतात. "प्रवाशांच्या सेवेसाठी" राज्य परिवहन बसेस रोज या मार्गावर धावत असतात. मध्य रेल्वेमुळे तर हा प्रवास खूप सुखकर, आरामदायी  आणि जलद झाला आहे. मुंबईहून निघालो, खिडकीजवळची सीट पकडली आणि मराठी/ हिंदी गाण्यांची playlist सुरु केली की कधी कर्जत, खंडाळा, लोणावळा ओलांडून पुण्यात पोहोचलो हे कळतसुद्धा नाही. असा हा नेहमीचा प्रवास मात्र परवाच्या दिवशी खूप वेगळा अनुभव देऊन गेला. एरवी चातकासारखी पावसाची वाट पाहणारे आम्ही त्यादिवशी फक्त पाऊस थांबावा म्हणून मनातल्या मनात देवाचा धावा करत होतो. हवाहवासा वाटणारा पाऊस कधी रौद्ररूप धारण करेल सांगता येत नाही.
               गौरी-गणपतीच्या सणासाठी मी घरी निघाले होते. मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस दुपारी ३ वाजता ठाण्यातून पकडली. बरं झालं, reservation करून ठेवलं होतं असं मनातल्या मनात म्हटलं आणि माझ्या खिडकीजवळच्या सीटवर जाऊन बसले. दोन दिवसाची सुट्टी, काय काय करायचं याचे मनाशी आडाखे बांधत आणि मागच्या आठवड्याची उजळणी करत चालले होते. आपल्या आजूबाजूला कोण बसलंय याच्याशी काही देणं घेणं नव्हतंच. तरीपण उगाचच चहुबाजूने एक नजर फिरवली आणि लक्ष पुन्हा खिडकीतून बाहेर. नजर बाहेर असली तरी डोक्यात विचारचक्र सुरु असल्याने खरेतर मी बाहेर काय पाहत होते हे मलाही सांगता येणार नाही. गाडी थांबली, मी एकवेळ घड्याळ पाहिलं. ४:१५ वाजले होते. कर्जत स्टेशन….वडापाव, इडली-वडा, भेळ आणि चहा-कॉफी विकणारे खिडकीशी येऊन ओरडत होते. भूक लागलीच तर असावे म्हणून मी सफरचंद आणले होते सोबत आणि नेहमीप्रमाणे ५-६ chocolates होते. त्यामुळे त्या विक्रेत्यांकडेही मी थोडंसं दुर्लक्षच केलं. अजून दोन तास आणि मी पुण्यात… गाडी वेळेवर आहे का हे पाहण्यासाठी एकदा timetable तपासले. ५-१० मि. उशिरा पोहोचणार असं वाटलं. पण गाडी कर्जत स्टेशनवरच रेंगाळली हे लक्षात आल्यावर मी पुस्तक बाहेर काढले. 'यक्षांची देणगी' मधील एक कथा वाचली आणि पुन्हा बाहेर पाहिले तरी मी कर्जतमध्येच होते. मग जरा आजूबाजूच्या लोकांच्या चर्चेकडे कान दिला. गाडी का थांबली आहे याची पुसटशीदेखील कल्पना नव्हती मला. कोणीतरी म्हणाले, पावसामुळे कामशेतजवळ रेल्वे रुळावर पाणी आले आहे. तेवढं ओसरलं की मार्ग मोकळा होईल. आणि ५ च्या दरम्यान गाडी निघाली. लोकांनी एक नि:श्वास टाकला. कोणीतरी हळूच गणपती बाप्पा मोरया म्हटलं.
                  या एक तासात माझ्या आजूबाजूला बसलेल्यांनी यावर्षीच्या पावसाबद्दल थोडी चर्चा केली असावी असा मी अंदाज बांधला. कारण आता त्यांच्या बोलण्यात आमची शेती डोंगर उतारावर आहे. थोडी सपाट आहे त्यावर भाजीपाला लावलाय पण आम्हाला काही पाण्याची काळजी नाही वगैरे चालू होते. मग मी या चर्चेचा श्रोता व्हायचं ठरवलं. आतापर्यंत आपल्याच विश्वात असलेले आम्ही सहप्रवासी, आता कोण कुठे कशासाठी निघाले आहे याची विचारपूस करू लागले. आम्ही सहाजण बसलो होतो समोरासमोर. त्यात एकजण गांधी टोपी घातलेले, कपाळावर गंध-बुक्क्याचा टिळा लावलेले ५०-५५ वर्षाचे काका होते. शेतकरीच असावेत, कामशेतचेच रहिवासी होते. ट्रेनच्या त्या डब्यात बसल्या बसल्या आम्ही म्हणजे ते काका, डोंबिवलीचे एक दांपत्य, काळबादेवीचे एक गुजराती दांपत्य आणि मी असे आम्ही आता युरोप, अमेरिका, इस्राईल, चीन या देशांच्या राहणीमान आणि शेतीची सफर करून आलो. तीन वर्षापूर्वी हे शेतकरी काका कृषी विभागातर्फे जगभरातील शेतीची अभ्याससहल करून आलेले आणि हे गुजराती दांपत्य त्यांच्या मुलाकडे अमेरिकेला राहून आलेले. त्यामुळे हा परदेशभ्रमणाचा विषय किमान तास-दीड तास पुरला. आता त्यांचा तो अमेरिकेचा मुलगा तुलनेने जवळ म्हणजे पुण्याला राहायला आला आहे आणि त्याच्या लहान मुलाच्या शाळेतील आजी-आजोबा मेळाव्यासाठी हे दोघे पुण्याला चाललेले. ऐनवेळी जायचे ठरले आणि AC chair car चे ticket मिळाले नाही म्हणून आज ते आमच्या शेजारी होते. दुसरे दोघे गौरीच्या सणासाठी पुण्यात स्थायिक असलेल्या मोठ्या भावाकडे चाललेले.
           गाडी नेहमीच्या वेगाने खंडाळा स्टेशनवर येउन थांबली. ६;३० इथेच वाजले. गाडीला एक तास उशीर झालाय हे सर्वांनी आतापर्यंत आपापल्या नातेवाईकांना कळवले होते. पण गाडी या स्टेशनवर सुद्धा आणखी तासभर रेंगाळली. काहीतरी गंभीर आहे याचा अंदाज यायला लागला पण आता माघारी जाणे कठीण झाले होते. कर्जत मध्येच इशारा दिला असता तर आम्ही लोकलने पुन्हा मुंबईला गेलो असतो असे सूर ऐकू येऊ लागले. गुजराती काका काकू खंडाळ्यातून बसने पुण्याला जायचा विचार करू लागले. पण हायवेपर्यंत मी अंधारात आणि पावसात चालत येणार नाही असे काकूंनी सांगितल्यामुळे काकांनी तो पर्याय बाद केला. त्यांच्या संवादावरून मला पु. लं. च्या पेस्तनकाका-काकूंची आठवण झाली. प्रत्येक स्टेशनवर गाडी थांबली की हे काका platform वर जाऊन उभे राहायचे आणि काकू आतूनच come inside , come inside म्हणत काकांना हाका मारायच्या. काकूंना मराठी फारसे येत नव्हते. काका नागपूरला मराठी माध्यमातून शिकल्याने चांगली मराठी बोलत होते. खंडाळ्यात काकांना कळले की कामशेतजवळ रेल्वे रूळाखालची खडी वाहून गेल्यामुळे गाडी पुढे सरकत नाही आणि आपल्या गाडीपुढे एक पुणे-लोणावळा लोकल, एक एक्सप्रेस उभी आहे आणि सर्वजण तो मार्ग मोकळा होण्याची वाट पाहत आहेत. कोणीतरी tweeter वर त्याचे फोटो पोस्ट केले आहेत ही बातमी घेऊन काका पुन्हा डब्यात आले.   हे फोटो मला मिळाले अन मग मी ते सर्वांना दाखवले. 

हे फोटो पाहिल्यावर काळजी वाढू लागली पण आता वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. खंडाळ्यातून गाडी सुटल्यावर डब्यातील सर्वांनीच गणपतीबाप्पाचा जयघोष केला. पण दहा- पंधरा मि. नी गाडी पुन्हा थांबली. आता ८ वाजले होते. लोणावळा स्टेशन होते. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. भूक लागली म्हणून लोकांनी काही ना काही खरेदी करून खाल्ले. मी पण चहा घेतला. लोणावळ्यात कळले की ९ वाजेपर्यंत गाडी निघेल. उशिरा का होईना पण आपण पोहोचू सुखरूप अशी मनाला समजूत घालणे सुरु झाले. एका भेळवाल्याने आपला आमच्या बोगीबाहेर उभा राहून त्याचा धंदा केला. भूक लागलेली असल्याने लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती. त्याचे चुरमुऱ्यांचे पोते रिकामे झाले आणि तो गेला, पण गाडी काही सुरु झाली नाही. घड्याळाचा काटा जसा १०-१०:३०-११ कडे सरकू लागला तसतसा लोकांनी घरी फोन करून घ्यायला कोणीतरी यावे म्हणून संपर्क सुरु केला. काही जणांनी स्टेशनवरून express way कडे कूच केली, मिळेल त्या वाहनाने पुण्याला जाऊ या उद्देशाने.  नातेवाईक कोणी bike तर कोणी चारचाकी घेऊन स्टेशनवर आले. मी घरी फोन करून सांगितले आता काही सकाळपर्यंत लोणावळ्यातून गाडी बाहेर पडेल असे वाटत नाही. तुम्ही निवांत झोपा, मी सकाळी उजाडल्यावर बसने येईन पुण्याला आणि तोपर्यंत ट्रेन निघालीच तर चांगलेच आहे.
            एवढ्या वेळात डोंबिवलीच्या काका -काकूंनी मला  त्यांच्यासोबत रात्री त्यांच्या घरी यायचे सुचवले. पुण्यात रात्री एवढ्या उशिरा तू एकटी कशी जाणार या काळजीने. गुजराती दांपत्याने तर मला त्यांची बेबी करून टाकले होते. मला हे खा, ते घे म्हणून आग्रह करत होते. लोणावळ्यातच आणखी एका आजीची ओळख झाली. त्यांनाही शिवाजीनगर ला उतरायचे होते आणि सोबत मी असेन म्हणून त्या मला चिकटून राहिल्या. पहिल्यांदाच mobile सोबत घेऊन आलेल्या. त्यातले काही कळत नव्हते पण आज त्याचा त्यांना खूप फायदा झाला. तो नसता तर त्यांच्या  घरच्यांची काळजीने काय अवस्था झाली असती देव जाणे! 
          रेल्वे रुळाचे काम रात्री १२:३० च्या सुमारास झाले असावे. १२:३० वाजता आमच्या पुढे असलेली चेन्नई एक्सप्रेस सुटली आणि एक वाजता आमची ट्रेन. पण पुढे तळेगाव पर्यंत ती प्रत्येक स्टेशनवर थांबेल असे सांगण्यात आले. कदाचित रात्री उशिरा चालली असल्यामुळे प्रवाशांसाठी सोयीसाठी त्यांनी हा निर्णय घेतला असेल असे मला वाटले. पण ट्रेन खूपच मंदगतीने चालली होती. आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्यच होते. इतक्या साऱ्या लोकांची जबाबदारी त्या चालकावर होती त्यामुळे त्याने कसलाही धोका न पत्करता हळूहळू जायचे ठरवले असेल. लोणावळा ते पुणे हे एक- सव्वा तासाचे अंतर पार करायला ४ तास लागले आणि पहाटे ५;३० ला मी पुण्यास पोहोचले.  शिवाजीनगर स्टेशन वर उतरून बसने घरी गेले.
          मागील जन्माचे आपले ऋणानुबंध असतील म्हणूनच आपण एकमेकांना भेटलो आणि १४-१५ तास एकमेकांसोबत राहिलो असे ते काका बोलले. १५ तासात बरेच काही share केले सर्वांनी. पुन्हा असेच कधीतरी भेटू पण "असे" आजच्यासारखे नको असे म्हणून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. 

Friday, 11 September 2015

तुझ्यासवे...

सकाळ सांज ऊन सावली
                  खेळ तुझ्यासवे...
रंग आणि कुंचले
                  चित्र तुझ्यासवे...
सूर ताल शब्द
                 गीत तुझ्यासवे...
राग लोभ माया
                 प्रीत तुझ्यासवे... 

Friday, 4 September 2015

दौरा

काल गडकरी रंगायतन ला "आयुष्यावर बोलू काही" ची मैफिल होती. हा कार्यक्रम सुरु होऊन ऑगस्ट मध्ये १२ वर्षे पूर्ण झाली. तपपूर्ती विशेष कार्यक्रम म्हणून सध्या याचे आणखी काही कार्यक्रम सुरु आहेत. त्यातील एकातरी कार्यक्रमाला आपण जायचेच अशी माझी इच्छा होती. गेली ५-६ वर्षे मी या कार्यक्रमाला जाता येईल अशी संधी शोधत होते. पण सध्या मुंबईत राहत असल्याने हे सहज साध्य झाले. कार्यक्रम खूपच सुंदर आहे, असतो आणि कालही तेवढाच सुंदर झाला. मैफिल संपूच नये असा वाटत असतं पण ती संपते. एक अगदी नवं, आधी न ऐकलेलं गाणं ऐकवून सलीलसरांनी कार्यक्रमाची सांगता केली. या संपूर्ण कार्यक्रमातील एक मला भावलेली कविता… 
दौरा-- संदीप खरे 
कसले झाले आहे जिणे उनाड दुनियाभर
वारा बांधून देत नाही एका जागी घर
बैठक मारून बसत नाही एका जागी जीव
गावालाही उरलीच नाही आता कुठली शीव
सरकत येतात डोक्यावरती रोज नवे ढग
डोळे मिटून उघडेस्तोवर बदलून जाते जग
गाठण्यासाठी ठरल्या वेळी ठरलेला टप्पा
मैलांच्या या अटळ ठोंब्या दगडांशी गप्पा
जेव्हा मिळेल तेव्हा घास, जो जो मिळेल तो
सवयीनेच हात ओंजळ ओठांशी नेतो
असोशीने होत नाही क्षुधेचा उत्सव,
पाण्यालाही उरली नाही तहानेची चव
डोळे लाल, कोरडे ओठ आणि केस राठ
एक तुकडा जमिनीचा मागत राहते पाठ
कट कट हालचालींच्या हाडांचा आवाज
दुखरा मणका, माथी ठणका अन निद्रा नाराज
कसले सूर, कसले शब्द, कसली कलासक्ती
अहो गाढवासारखी वाटू लागते जगण्यावरची भक्ती
वर्ष काय विरून जाते क्षणाचीही खात्री
दर मैलावर दिसत राहतात चिरडलेली कुत्री
जड मन, जड जीभ, जड जड अंग
तसाच घ्यायचा चेहऱ्यावरती लावून थोडा रंग
ढवळून येतात सत्य, स्वप्न, दिवस आणि रात

दिसत राहतात फक्त टाळ्या वाजवणारे हात  

ही कविता स्वत:च सर्व काही सांगून जाते. खुपदा आपल्याला या कविता का आवडतात तर त्या आपल्या मनातील भाव हळुवार प्रकट करत असतात म्हणून. आपल्याला जे खूप आर्ततेने सांगायचे असते ते अगदी मोजक्या शब्दात त्या सांगून जातात म्हणून.. 

Saturday, 25 July 2015

भूरीबेन विरीयाभाई राठवा ऊर्फ "आमची दादी"

                    आमची दादी… मलाजा मुक्कामात पूर्ण दोन महिने आमची काळजी घेणारी आणि निरपेक्ष प्रेम करणारी ही एकमेव व्यक्ती… पहिल्या दिवशी मात्र तिला घरी पाहिलेले मला आठवत नाही. कुठे गेली होती कोणास ठाऊक? दादीचे जावई रामसिंगभाई भाषा केंद्रात काम करतात. त्यांच्या घरी आमची राहण्याची व्यवस्था केलेली होती. ते घरजावई असल्याने अर्थातच त्यांचे सासू सासरे म्हणजे विरीयाभाई आणि भूरीबेन यांच्या राहत्या घरी आम्ही  गेलो. विरीयाभाई सरकारी वन संशोधन केंद्रात काम करतात. आम्ही त्यांना दादाजी म्हणू लागलो. आणि भूरीबेन झाली आमची हक्काची दादीमा… 

              त्यांच्या भाषेत लहानांसाठी  तू आणि मोठ्यांसाठी तुम्ही असे वेगवेगळे संबोधन नसल्यामुळे बोलताना सर्वांशी एकेरी बोलतोय असं वाटायचं. पण हळूहळू त्याची सवय झाली. आणि दादीला हिंदी येत नसल्यामुळे तिच्याशी राठवी बोलताना तीचे एकेरी संबोधन होऊ लागले. पण त्यामुळे तिच्याबद्दल आपसूक जवळीक वाटू लागली. आमच्यासाठी दादी 'मकईनू रोटला' म्हणजेच मक्याची भाकरी करायची. रोटला एवढा मोठा असायचा की एकावेळी अर्ध्याच रोटल्यात पोट भरायचे.  पण अगदी चवदार… रुचकर आणि खमंग भाजलेला तो रोटला खाल्ला की अगदी तृप्त व्हायचो आम्ही. भाजी शक्यतो दारात लावलेल्या गवार, वांगे, दुधी भोपळा, कोबी किंवा बटाट्याची असायची. भरपूर तेल आणि हळद, चवीला थोडंसं मीठ आणि मिरची एवढाच काय तो भाजीचा मसाला! पाणी न घालता फक्त तेलावर शिजवलेली तिने केलेली भाजी विशेषत: वांग्याची भाजी खूपच छान व्हायची.
                  गव्हाच्या रोटीला ती 'गमनी रोटली' म्हणायची… तिने केलेली ती रोटली खाणे मात्र जिवावर यायचे. शक्यतो दुपारी कधी चपाती करायची असेल तर मीच करायचे. एकदा ती मला मदत करायची म्हणून आली. मी तिला म्हटलं "मी लाटून देते, तू भाजून घे." तिच्या पद्धतीने चपाती भाजताना चपातीला तेल लावत नसत. मी तेलाची किटली जवळ घेऊन बसले होते. दोन तीन वेळा चपाती उलटल्यावर तिला म्हटलं "तेल लाव थोडं" तिने पळीभर तेल ओतलं आणि चपाती जणू तळून काढली! नंतर माझ्या लक्षात आलं की तिला सांगण्याआधी मी करून दाखवायला हवं होतं. मग ती शिकली आणि नंतर बरोबर करायला लागली. पण तरीही तिने मक्याची भाकरीच करावी असा आमचा आग्रह असायचा. रात्री मक्याची भाकरी करून ठेवायची आणि आम्ही जेवायला उशीर करत असू तर "बेन, रोटला थी जो !" म्हणून आवाज द्यायची. 
                     चुलीवर स्वयंपाक करायला मला तिनेच शिकवले. याआधी कधी मी चुलीवर स्वयंपाक नव्हता केला. (एकदा आई कुठेतरी गेलेली असताना चुलीवर वांग्याचं भरीत तेवढं केलं होतं. मस्त झालं होतं कारण माझ्यासोबत ते खाल्ल्यावर शेजारच्या छोट्या मुलाने त्याच्या आईला हट्टाने ते शिकून घ्यायला सांगितलं होतं. आणि त्यादिवशी आम्हाला जेवण पुरलं नव्हतं.)



               तर ही माझी दादी रोज सकाळी सकाळी मला उठवायची चहा प्यायला.  बिनदुधाचा चहा मी तिच्या प्रेमाखातर दोन महिने दररोज घेतला. कधीकधी तर सकाळी लवकर केलेला चहा ग्लासमध्ये भरून गरम राहावा म्हणून ती चुलीत निखाऱ्यांवर ठेवायची. आणि मी उठल्यावर तो ग्लासभर चहा प्यायचे. नंतर नंतर तिने चहा बनवून ठेवण्याऐवजी सगळे साहित्य काढून ठेवायची. पातेले, गाळणी, पाणी आणि चहापत्ती (वाघबकरी मसाला चहा ) सगळं बाजूला काढून ठेवून मला हाक मारून मग तिच्या कामाला जायची. "बेन चा पिवो" असं दटावायची… साखरेला मोरुस, पातेल्याला तपेली, आणि चहाला चा म्हणायची तर गवतीचहाला लिली चा… कधी आले, पुदिना, गवतीचहाचा चहा प्यायची मला लहर यायची. मग मी स्वत: बनवून प्यायचे.

                    घरात नेहमी एकटीच असल्याने सतत कोणत्यातरी कामात ती स्वत:ला गुंतवून ठेवायची. घरातली सर्व कामे तीच करायची पण तरी ती तिच्या मर्जीची मालकीण होती. कसलीही तक्रार नाही. एखाद्या दिवशी खाटेवर पडून राहायची आणि मला म्हणायची "आज खूप काम आहे पण मी नाही करणार." तिच्यासोबत एकदोनदा मी शेतात गेले. तिला काम करताना पाहून माझ्या आईची आठवण झाली मला. माझी आईसुद्धा असंच काम करत असते दिवसभर. अखंड…
                           दादीने दारात अळू लावलेली होती. दर ४-८ दिवसांनी ती काही पाने काढून विकायला जायची. सोबत पुदिना आणि लिंबे पण विकायची. बाजारात गेल्यावर तिकडचे रस्ते पाहून तिचा गोंधळ व्हायचा म्हणून शक्यतो बाजारात न जाता बाजारपेठेच्या अलीकडेच दारोदार जाऊन ती ते विकायची. 


               
              एरवी घरात ओढणीच गुंडाळलेली असायची पण बाजारात जाताना मात्र छान साडी घालून जायची. निरोप घेताना तिला एक साडी दिली. ती स्वीकारताना बरेच आढेवेढे घेतले तिने पण "ती तुझ्याचसाठी आहे आणि तूच ठेव" म्हटल्यावर तिच्या डोळ्यातील जो आनंद होता तो लाखमोलाचा… 
              घरात तिचा दरारा होता, मनमानी होती, आपलं मत विचारणार पण स्वत:च्या मनाचंच करणार अशी तिची ख्याती होती. तिला मी काम करताना पाहिलं, ओरडताना पाहिलं, हसताना पाहिलं, रडताना पाहिलं तर कधी पदराआड अश्रू लपवतानाही पाहिलं. तिची जगण्याची उर्मी पाहिली.
              एकदा शेतात गेले असता मी तिला म्हटलं "मी तुला शिकवते, माझा फोटो काढ".  मला नाही जमणार मला नाही जमणार असं ती म्हणत असतानाही उगीचच तिच्या हाती कॅमेरा सोपवून दिला. आधी दोन - चार फोटो काढताना कॅमेरा हलला पण नंतर तिला जमलं. तिने काढलेला माझा हा फोटो.

तिला फोटो काढायला जमले याच्या आनंदाने फुललेला तिचा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही. त्याक्षणी ती जगातील सर्वात आनंदी व्यक्ती होती…. 



Tuesday, 21 July 2015

खंड्या...

खंड्या… 
             माझ्या मलाजा गावातील मुक्कामात खंड्या हा एक वेगळा chapter बनला. त्यामुळे त्यासाठी एक separate post पाहिजेच. प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषा बदलत जाते, याचे पक्षिविश्वाशी निगडित उत्तम उदाहरण म्हणजे खंडया पक्षी. किंगफिशर या पक्ष्याला काही लोक खंड्या म्हणतात, काही जण बंड्या, बंडू तर काही धीवर नाव सांगतात. पक्ष्यांची प्रमाण नावे शोधताना महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे कार्याध्‍यक्ष डॉ. राजू कसंबे यांनी या पक्ष्याला धीवर हे नाव दिले आहे. धीवर म्हणजे मासे पकडणारा... त्यामुळे आता खंड्या नाही; तर मराठीत धीवर या नावाने किंगफिशर ओळखला जाणार आहे.

              हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी आहे. हे पक्षी युरेशियात पसरलेला आहे तो बहुतांश बल्गेरिया, तुर्की, पश्चिम आशिया, भारतीय उपखंडापासून फिलिपिन्सपर्यंत आढळतो. लहान आकार, अत्यंत आकर्षक रंग, हे याचे वैशिष्ट्य आहे. छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक इत्यादी मुख्य खाद्य आहे. पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करून अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे.
            खंड्या हे सामान्य नाम असून या पक्षाच्या विविध जातींपैकी पांढर्‍या छातीच्या खंड्याला नुसते खंड्या या नावाने ओळखतात. याच्या इतर जातभाईंची नावे लहान खंड्याकवडा खंड्या , काळ्या डोक्याचा खंड्यातिबोटी खंड्याघोंगी खंड्या , मलबारी खंड्या अशी आहेत.
        स्थानिक राठवी भाषेत त्याला लक्कडखोद म्हणत होते. मलाजामध्ये राहायला गेल्यानंतर ५-६ दिवसांनीच पहिल्यांदा मी तिथे खंड्याला पाहिलं. त्या आधी एकदा मी पडवळपाड्याला एक खंड्या पाहिला होता. एका घरी household survey करण्यासाठी म्हणून मी गेले असता जवळील विहिरीतून तो उडून एका झाडावर बसलेला मी पाहिला. जसा तो मला पहिल्यांदा दिसला तसा तो अनेकदा दिसला. दिसला म्हणण्यापेक्षा माझी नजर त्याच्याच शोधात असायची असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हातात कॅमेरा असेल तेव्हा मी जेवढे जमतील तेवढे त्याचे फोटो काढले. पण जवळ जाताच तो उडून जायचा. आणि उडणाऱ्या खंड्याचे फोटो घेणे मला जमलेच नाही. पण उडताना त्याने पसरलेल्या पंखावर दिसणारा शांत निळा रंग पाहून मी भारावून जायचे, हरखून जायचे आणि पाहतच राहायचे. 

          
            या खंड्याची गंमत अशी होती की ज्यादिवशी आम्ही काम करेल त्याचदिवशी तो दिसायचा. इतर वेळी फक्त फिरायला म्हणून आम्ही बाहेर पडलो तर त्याचं दर्शन दुर्मिळ… नाहीतर असं व्हायचं जेव्हा आम्ही कामासाठी सकाळी बाहेर पडू आणि तो दिसला कि समजायचं आज आपलं काम नक्की होणार.
            एके दिवशी सकाळी सकाळीच शिवारफेरी साठी घराबाहेर पडलो. रस्त्यात अचानक दोन पक्षी दिसले. एवढे दिवस मला वाटायचं की या भागात एकच खंड्या आहे. तोच इकडे तिकडे फिरताना दिसतो. पण आज एकदम दोन दिसले आणि थोडा पुढे गेल्यावर त्याहून आकाराने थोडे मोठे असलेले आणखी दोन. आज माझी दिवाळीच होती. पण ते थोडे दूर असल्याने नीटसे टिपता आले नाहीत. पण त्यांना उडताना पाहण्याचा मात्र मी मनमुराद आनंद घेतला. ती लांब चोच, तो निळा आणि पिंगट रंग आणि कंठाचा शुभ्र पांढरा रंग… वा !! निसर्गाची किमयाच भारी… त्याच्यासारखी रंगसंगती दुसऱ्या कोणाला जमणार! 
             एके दिवशी छोटा उदेपूरला गेलो आणि दिवसभर कामासाठी फिरत राहिलो. छोटाउदेपूर हे जिल्ह्याचं ठिकाण असूनही तिथे हॉटेल किंवा रेस्टोरंटचा पत्ताच नव्हता. तिथला एका खमण स्पेशल दुकानातून घेतलेल्या एक प्लेट ढोकळ्यावर दिवसभर हिंडलो. घरी परत आलो तर येता येता माझ्या डोक्यात विचार चालू होते कामे तर चांगली झाली पण आज गावात फिरलो नाही त्यामुळे खंड्या काही दिसला नाही.. असं म्हणत म्हणतच मी घराचं ते लाकडी फाटक उघडलं आणि पाहते तर काय! खंड्या चक्क घरी…!!! घरासमोरील झाडांमध्येच उभ्या तिरप्या एका कळकावर तो बहुदा माझीच वाट पाहत बसलेला असावा.



   
दोन फोटो क्लिक केले. तो उडून गेला. मी खुश होते, आज तो दिसला याचे समाधान होते तर तो पुन्हा आला आणि लाईटच्या तारेवर येउन बसला. मला राहवले नाही , मी पुन्हा घरात जाऊन कॅमेरा घेऊन आले. भूक लागली होती. आवरून दुसऱ्या कामाच्या तयारीला लागायचं होतं पण मी मात्र खंड्याच्या मागे लागले होते. त्याचा एक सुंदर फोटो मला काढता यावा एवढीच माझी इच्छा होती.


 
           अगदी मलाजातील शेवटच्या दिवशीसुद्धा आम्ही गावात न फिरता तेजगढला अकॅडेमी मध्ये आलो असताना तिथेही आम्हाला खंड्या दिसला. पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी याची आवड मला कधीपासून लागली कोणास ठाऊक… पण हा field stay खंड्यामुळे माझ्यासाठी अविस्मरणीय राहील एवढं मात्र नक्की… 

Sunday, 19 July 2015

पिठोरा चित्र

               गुजरातमधील छोटा उदेपूर जिल्ह्यात एका राठवा आदिवासी कुटुंबासोबत दोन महिने मी राहिले. गावात फिरताना बऱ्याच घरांमध्ये पिठोरा चित्र पाहावयास मिळाले. राठवा आदिवासी संस्कृतीचा हा एक अविभाज्य घटक आहे. आवड म्हणून हे चित्र रेखाटले जात नाही. कोणाची काही मोठी समस्या असेल तर तिच्या निवारणासाठी प्रार्थना केली जाते आणि त्या समस्येतून बाहेर पडल्यावर, आपली इच्छा पूर्ण झाल्यावर हे चित्र घरातील तीन भिंतीवर काढले जाते. या चित्रात घोडे आणि घोडेस्वार हे खूप महत्वाचे. चंद्र, सूर्य, झाडे, प्राणी, पक्षी, घर, घड्याळ  आणि विविध कामे करणारी माणसे यांचं एका ठराविक पद्धतीने केलेलं चित्रण. ही दोन चित्रे प्रातिनिधिक स्वरुपात एका आदिवासी निवासी शाळेतील भिंतीवर काढलेली आहेत. 

             घरात गेल्यावर समोरच्या तुलनेने ज्याची लांबी जास्त असेल अशा भिंतीवर मुख्य चित्र आणि त्याच्या लगतच्या दोन लहान भिंतीवर अर्धी भिंत व्यापेल एवढ्या जागेवर हि चित्रे रंगवण्याची पद्धत असते. ते चित्र पूर्ण झाल्यावर मग 'बाबा पिठोरा'साठी कोंबडा, बकरी अर्पण केले जाते. चित्रासमोर दिवे लावून पूजा केली जाते त्याचबरोबर पारंपारिक गीते आणि नृत्य केले जातात.
          मानसिंगभाई राठवा यांनी रंगवलेली चित्रे आम्ही पाहिली. खूप सराईतपणे ते हि चित्रे रंगवतात. देशात खूप ठिकाणी आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन किंवा इतर कामासाठी त्यांना बोलावले जाते. छोटा उदेपूर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या दर्शनीय भिंतीवरही पिठोरा  चित्र पाहायला मिळाले. सध्या त्यांची दुसरी पिढीसुद्धा त्यांच्यासोबत काम करते. पण चित्रातील बारकावे मात्र मानसिंगभाईंच्या इतके कोणाला अजूनतरी दाखवता येत नसावेत. प्रत्येक लहानसहान वैशिष्ट्य न चुकता ते रेखाटतात. 
             
                 त्यांच्या मोठ्या चित्रातील बारकावे दिसावेत म्हणून एका एका भागाचे काही वेगळे फोटो मी काढले आहेत. खूप सुंदर आणि अनोखी कला मला पहावयास मिळाली हे माझं भाग्यच. 








Friday, 8 May 2015

आणखी एक वर्ष सरलं ...

                        नवीन वर्ष, नवीन हर्ष … प्रत्येक नवीन वर्ष असंच एक उत्साह घेऊन येत असतं. आपल्यासाठी नवीन वर्ष हे एकाच वर्षात किमान ४ वेळा सुरु होत असतं. इंग्रजी कॅलेंडरनुसार १ जानेवारीला, दुसरं गुढीपाडव्याला, तिसरं म्हणजे आपला आपला वाढदिवस आणि चौथं नवीन वर्ष म्हणजे आपण एक इयत्ता पास होऊन पुढच्या वर्गात जातो ते नवीन शैक्षणिक वर्ष. किमान ४ वेळा यासाठी म्हटलं की काहीजणांसाठी आर्थिक वर्ष एप्रिल मध्ये सुरु होऊन मार्च मध्येही संपतं. आणखी वेगळा दिवस असेल जेव्हा कोणाचंतरी नवीन वर्ष 'तेव्हा' सुरु होत असेल. संस्थेचा वर्धापनदिन, लग्नाचा वाढदिवस वगैरे… 
                    माझंही एक शैक्षणिक वर्ष आज संपलं; आणि उद्यापासून नवीन सुरु. हल्ली भली मोठी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे उंबराचं फूल. गेली तीन वर्षं मी या उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीतरी training, project वगैरे करायचं ठरवलं आणि त्यामुळे पाहिजे तशी सुट्टी काही मिळाली नाही.
                              एकेक वर्ष किती पटापट निघून जात आहे. शाळेचा पहिला दिवस काही मला आठवत नाही पण हायस्कूलचा पहिला दिवस चांगलाच आठवतोय. सकाळी बाबा गाडीवर सोडायला आले होते शाळेत. दुपारी पाऊस सुरु झाला आणि ३:०० वाजता शाळा सुटली. आईने डब्यात तोंडल्याच्या चकत्या करून त्याची भाजी दिली होती चपातीसोबत. तो पाऊस, ती नवीन शाळा, ती मी… सगळं अजून तसंच चित्र दिसतंय डोळ्यांसमोर.
                             दहावी झाली, बारावी झाली, पाहता पाहता engineering पण झालं पूर्ण. दिवस पाखरासारखे की कापरासारखे कुणास ठाऊक ? पण उडून जातात भुर्रकन, हे मात्र नक्की. मी मुंबईत आले. मुंबई मला खूप आवडते. पण मुंबई जेवढी training च्या १५ दिवसात पाहिली होती तेवढीपण नाही पाहिली गेल्या एक वर्षात. हां, म्हटलं तर मराठी नाटक आणि films पाहिल्या. भरत  जाधवचं पुन्हा सही रे सही, मुक्ता बर्वेचं छापा काटा आणि लव्हबर्डस. खूपच सुंदर नाटके आहेत ही. चांगली कलाकृती पहायची असेल तर अशी नाटके पाहावीच. आणि आणखी एक, तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी मिळत असेल तर अशा कार्यक्रमांना एकदा हजेरी लावाच.  ही सुट्टी कायम स्मरणात राहील.
                                 माझं बोलणं नेहमीच असं भरकटत जातं. तर या येणाऱ्या नवीन वर्षात आणखी काही नवीन करता येईल याचं planning सध्या माझ्या डोक्यात, मनात सुरु आहे. तुमच्याकडे काही नवीन कल्पना असेल तर comment  box मध्ये लिहा. मला जे सुचेल, जे मी करेन ते upcoming article मध्ये पाहालच!


Wednesday, 6 May 2015

Memories unlimited


This is the first movie I created to recollect memories. All girls together...
We really had fun together...








Saturday, 2 May 2015

चीनी संस्कृतीमधील अभिष्टचिंतन

चीनमध्ये हस्तांदोलन करताना "समोरच्या व्यक्तीला सहा सुखे मिळोत" अशा शुभेच्छा देतात, असं शांता शेळकेंच्या लिखाणातून कळलं. सामान्यत: माणसाला आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, सुविद्य पती / पत्नी आणि गुणी, आज्ञाधारक मुले ही पाच सुखे मिळावीत अशीच इच्छा असते; मग हे सहावे सुख कोणते? त्यांच्या कल्पनेनुसार हे सहावे सुख ज्याचे त्याला उमगावे आणि त्याला ते मिळावे असा त्या शुभेच्छांचा अर्थ असतो.

नाहीतर जीवन संपत आल्यावर "अरे, जगणे राहूनच गेले" असे वाटते. जे काही केले ते संसारासाठी , मुलाबाळांसाठी केले. स्वत:साठी जगणे जमलेच नाही. आपल्या सुखासाठी कधी थोडावेळ काढलाच नाही अशी खंत वाटते. हे आपले सुख नेमके कशात आहे याचा ज्याचा त्याने मागोवा घ्यावा आणि त्याला ते सुख प्राप्त व्हावे अशी भावना त्या अभिष्टचिंतनातून व्यक्त होते. 

माझ्या जीवन प्रवासातील सोबत्यांनाही माझ्याकडून हेच अभिष्टचिंतन… 

व्हिक्टर फ्रान्केल या मानसशास्त्रज्ञाच्या मते माणूस हा अर्थपुर्णतेच्या शोधातील प्राणी आहे. (An animal in search of Meaning)

जिंदगी वसूल झाली पाहिजे हे वाचून जेव्हा मी माझ्या आयुष्याबद्दल विचार करायला लागले. आपले जीवन अर्थपूर्ण असले पाहिजे याची जेव्हा जाणीव झाली तेव्हापासून मीही माझ्या या सहाव्या सुखाच्या शोधात आहे. तुम्हालाही तुमचे सहावे सुख लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना… 

Thursday, 30 April 2015

सत्तावीस उणे नऊ


अकबर बिरबलाची एक गोष्ट लहानपणी वाचली होती. त्यात कोणीतरी विद्वानाने अकबराच्या दरबारातील सर्वांना पेचात टाकलेले असते. एक साधा प्रश्न विचारून त्यांना कोड्यात टाकलेले असते. प्रश्न असा होता की सत्तावीस उणे नऊ म्हणजे किती ? तर 'अठरा' या उत्तरावर समाधानी होतो तो विद्वान कसला!!

मग प्रश्नाचं उत्तर द्यायला बिरबल पुढे सरसावला आणि म्हणाला. "सत्तावीस उणे नऊ म्हणजे शून्य." आता हे शून्य कसं ? तर वर्षात एकूण नक्षत्रे असतात सत्तावीस, त्यातील नऊ नक्षत्रे पावसाची असतात आणि तीच वजा केली तर हाती काहीच उरत नाही. हे एका शेतकऱ्याच्या दृष्टीकोनातून किंवा इतर व्यावसायिक दृष्टीने पाहिले की पटते. हंगाम किंवा ऐन उमेदीचा काळ हातातून निसटला तर बाकी शून्यच , नाही का?

मला हीच गोष्ट आपल्या आयुष्याशी निगडित वाटते. तारुण्य आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा उमेदीचा काळ. सत्तावीस नक्षत्रांपैकी नऊ प्रमाणेच आयुष्याचा एक तृतीयांश भाग हा तारुण्याचा असतो.  हा कालावधी हातून निसटता कामा नये. या वयात नवीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते.  एकदा तो उत्साह गेला कि मग जगाच्या रहाटगाडग्यात तो ही गुंतून पडतो.  मी असंही वाचलंय कुठेतरी की माणूस त्याच्या वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत हाती घेतलेली कोणतीही गोष्ट, कृती, काम तडीस नेवू शकतो. किंबहुना निसर्ग त्याला हे काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी ऊर्जा देत राहतो. अर्थात त्यानंतर तो करू शकत नाही असं माझं म्हणणं नाहीये. आपलं तारुण्य टिकवणंसुद्धा आपल्याच हाती आहे. ती जिद्द, तो उत्साह आयुष्यभर टिकवणारे लोक पुढे महान झालेली कित्येक उदाहरणे आहेत जगात.

पण या पावसाळ्याच्या नऊ नक्षत्रांचा हवा तसा लाभ करून घेता आला तर उरलेल्या १८ नक्षत्रांमध्ये विविध प्रयोग करून वर्षाचं उत्पन्न दुप्पट तिप्पट करायलाही मजा येईल ना! नाहीतर पावसाळा वाया गेला म्हणून दु:ख करत बसणारे अन पुढचा पावसाळा येईपर्यंत हातावर हात धरून खंत करणारेही 'जगतात'च त्याचं आयुष्य, खरंतर ते रेटत असतात आयुष्य.…