Showing posts with label संस्कृती...जपावीशी. Show all posts
Showing posts with label संस्कृती...जपावीशी. Show all posts

Sunday, 19 July 2015

पिठोरा चित्र

               गुजरातमधील छोटा उदेपूर जिल्ह्यात एका राठवा आदिवासी कुटुंबासोबत दोन महिने मी राहिले. गावात फिरताना बऱ्याच घरांमध्ये पिठोरा चित्र पाहावयास मिळाले. राठवा आदिवासी संस्कृतीचा हा एक अविभाज्य घटक आहे. आवड म्हणून हे चित्र रेखाटले जात नाही. कोणाची काही मोठी समस्या असेल तर तिच्या निवारणासाठी प्रार्थना केली जाते आणि त्या समस्येतून बाहेर पडल्यावर, आपली इच्छा पूर्ण झाल्यावर हे चित्र घरातील तीन भिंतीवर काढले जाते. या चित्रात घोडे आणि घोडेस्वार हे खूप महत्वाचे. चंद्र, सूर्य, झाडे, प्राणी, पक्षी, घर, घड्याळ  आणि विविध कामे करणारी माणसे यांचं एका ठराविक पद्धतीने केलेलं चित्रण. ही दोन चित्रे प्रातिनिधिक स्वरुपात एका आदिवासी निवासी शाळेतील भिंतीवर काढलेली आहेत. 

             घरात गेल्यावर समोरच्या तुलनेने ज्याची लांबी जास्त असेल अशा भिंतीवर मुख्य चित्र आणि त्याच्या लगतच्या दोन लहान भिंतीवर अर्धी भिंत व्यापेल एवढ्या जागेवर हि चित्रे रंगवण्याची पद्धत असते. ते चित्र पूर्ण झाल्यावर मग 'बाबा पिठोरा'साठी कोंबडा, बकरी अर्पण केले जाते. चित्रासमोर दिवे लावून पूजा केली जाते त्याचबरोबर पारंपारिक गीते आणि नृत्य केले जातात.
          मानसिंगभाई राठवा यांनी रंगवलेली चित्रे आम्ही पाहिली. खूप सराईतपणे ते हि चित्रे रंगवतात. देशात खूप ठिकाणी आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन किंवा इतर कामासाठी त्यांना बोलावले जाते. छोटा उदेपूर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या दर्शनीय भिंतीवरही पिठोरा  चित्र पाहायला मिळाले. सध्या त्यांची दुसरी पिढीसुद्धा त्यांच्यासोबत काम करते. पण चित्रातील बारकावे मात्र मानसिंगभाईंच्या इतके कोणाला अजूनतरी दाखवता येत नसावेत. प्रत्येक लहानसहान वैशिष्ट्य न चुकता ते रेखाटतात. 
             
                 त्यांच्या मोठ्या चित्रातील बारकावे दिसावेत म्हणून एका एका भागाचे काही वेगळे फोटो मी काढले आहेत. खूप सुंदर आणि अनोखी कला मला पहावयास मिळाली हे माझं भाग्यच. 








Saturday, 2 May 2015

चीनी संस्कृतीमधील अभिष्टचिंतन

चीनमध्ये हस्तांदोलन करताना "समोरच्या व्यक्तीला सहा सुखे मिळोत" अशा शुभेच्छा देतात, असं शांता शेळकेंच्या लिखाणातून कळलं. सामान्यत: माणसाला आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, सुविद्य पती / पत्नी आणि गुणी, आज्ञाधारक मुले ही पाच सुखे मिळावीत अशीच इच्छा असते; मग हे सहावे सुख कोणते? त्यांच्या कल्पनेनुसार हे सहावे सुख ज्याचे त्याला उमगावे आणि त्याला ते मिळावे असा त्या शुभेच्छांचा अर्थ असतो.

नाहीतर जीवन संपत आल्यावर "अरे, जगणे राहूनच गेले" असे वाटते. जे काही केले ते संसारासाठी , मुलाबाळांसाठी केले. स्वत:साठी जगणे जमलेच नाही. आपल्या सुखासाठी कधी थोडावेळ काढलाच नाही अशी खंत वाटते. हे आपले सुख नेमके कशात आहे याचा ज्याचा त्याने मागोवा घ्यावा आणि त्याला ते सुख प्राप्त व्हावे अशी भावना त्या अभिष्टचिंतनातून व्यक्त होते. 

माझ्या जीवन प्रवासातील सोबत्यांनाही माझ्याकडून हेच अभिष्टचिंतन… 

व्हिक्टर फ्रान्केल या मानसशास्त्रज्ञाच्या मते माणूस हा अर्थपुर्णतेच्या शोधातील प्राणी आहे. (An animal in search of Meaning)

जिंदगी वसूल झाली पाहिजे हे वाचून जेव्हा मी माझ्या आयुष्याबद्दल विचार करायला लागले. आपले जीवन अर्थपूर्ण असले पाहिजे याची जेव्हा जाणीव झाली तेव्हापासून मीही माझ्या या सहाव्या सुखाच्या शोधात आहे. तुम्हालाही तुमचे सहावे सुख लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना…