Showing posts with label पुुस्तकांच्या दुनियेत. Show all posts
Showing posts with label पुुस्तकांच्या दुनियेत. Show all posts

Thursday, 21 December 2017

कुतूहल

कधी कधी कुतूहलापोटी काहीही मूर्खासारखा प्रश्न डोक्यात येतो आणि आपण तो जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतो तेव्हा आपण "मोठे" झालेलो असतो असं म्हणतात. पण माझ्या लक्षात आले की काही असेच प्रश्न अनुत्तरित राहिले तर ते मेंदूच्या कुठल्यातरी कप्प्यात अडगळ बनून राहत असतील तर अशी किती अडगळ साचून राहील आणि मग एक दिवस असा येईल की मेंदूच भंगारात द्यावा लागेल.
मग मी आता ठरवले आहे की आपण आता लहान व्हायचे, खूप लहान व्हायचे आणि आपल्याला पडणारे सग्गळे प्रश्न गूगल काकांना विचारायचे.
एके दिवशी असाच डोक्यात विचार आला की आपण विज्ञानात ऊर्जा अक्षय्यतेचा नियम शिकलो हे खरे. विश्वातील एकूण ऊर्जा सदैव कायम राहते हे मान्य करून चालू. पण पृथ्वीवरील ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत "सूर्य". या सूर्याजीरावांची एवढी ऊर्जा आपण सदैव वापरत असू तर कधी ना कधी त्यांची ऊर्जा संपेलच ना! मग सूर्य काय दिवसेंदिवस लहान होतो का? हे शोधायचे ठरले.
मग काय विचारले मी काकांना अन पटकन त्यांनी उत्तर दिले. "हो तर!"
"सूर्याची जी ऊर्जा बाहेर पडते त्यामुळे त्याचे वस्तुमान कमी होते आणि त्याचा आकार लहान लहान होत जातो. आता तो गोलाकार असल्याने त्याचा कमी होणारा आकार आपण त्रिज्या किंवा व्यासाच्या रूपात सांगू. दरवर्षी सूर्याची त्रिज्या ७४ सेंमी ने कमी होत जाते."

आता या कुतूहलाने मला अजून काही प्रश्नांची उत्तरे शोधायला भाग पाडले आणि मी मग गूगलकाकांना कामाला लावले. तेव्हा त्यांनी मला सांगितले की जगात १२,९८,६४,८८० पुस्तके आहेत. ९३,००० TED Talk videos, १९५ देश, ४४१६ शहरे आहेत, असे जर शोधले तर किती सिनेमे, किती गाणी, किती इमारती, किती गाड्या असे चिक्कार पाहायला मिळेल.  इतक्या गोष्टी आहेत आणि आपल्याकडे वेळ कितीसा आहे?
तेही पाहिले मग हिशोब करून! सोडते की काय!
आता २५ वर्ष पूर्ण होतील (जगलेली), मग आपण १०० वर्ष जगणार असा आदर्शवादी विचार केला तर आपल्याकडे आहेत ७५ वर्षे! त्याचे  दिवस मोजले तर होतात २७३७५ फक्त! आता या एवढ्याच दिवसात काय काय करायचे ते आपले आपल्याला ठरवावे लागेल. सध्यातरी लहान होऊन प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे ठरवले आहे, म्हणजे मेंदू भंगारात द्यायला नको, हो ना?

Tuesday, 14 June 2016

प्रेषित

भूतकाळात अडकून न पडता वर्तमानात जगायचे आणि भविष्याची आखणी करायची असं मनाला  कितीही समजावलं तरी वर्तमानात काही गोष्टी अशा घडतात, अशा पद्धतीने समोर येतात की आपण नकळत भूतकाळात डोकावतो. असेच काहीसे झाले आज…
"प्रेषित", १९८३ साली प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी लिहलेली ही विज्ञानकादंबरी. 
"पृथ्वीप्रमाणेच दुसऱ्या कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी असेल का याचा गुप्तपणे शोध घेत असताना एका शास्त्रज्ञाच्या हाती लागलेली माहिती, त्याचा अपघाती मृत्यू, आणि त्याने त्या परग्रहावर पाठवलेल्या संदेशातून पुढे चाळीस वर्षांनंतर घडलेल्या घटना" नाट्यमय पद्धतीने रंगवल्या आहेत. वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद या कादंबरीत आहेच शिवाय १९८३ सालात कल्पना केलेल्या भविष्यात होऊ शकतील अशा कितीतरी गोष्टी आज २०१६ मध्ये खऱ्या वाटतात. मला खरोखर ही कादंबरी यासाठी आवडली की सामान्य माणसाला समजेल अशा रीतीने प्रसंगांची, वैज्ञानिक संकल्पनांची मांडणी केली आहे. ही कादंबरी वाचून पूर्ण झाली आणि मला आठवले… 

मी नववीत होते तेव्हा एका परीक्षेमार्फत जिल्ह्यातून शंभरेक मुलांची निवड "विज्ञानमंच" या आठ दिवसांच्या कार्यशाळेसाठी झाली होती. सातारा जिल्ह्यातील त्या मुलांमध्ये मीही एक होते. माझ्यासह एकूण पन्नास मुलामुलींसाठी हे निवासी शिबीर होते. बाकीचे साताऱ्याच्या जवळपासचे (सातारा तालुक्यातील) असल्याने ते त्यांच्या घरूनच ये जा करत. त्यावेळी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज मध्ये ही कार्यशाळा चालू होती. आणि बी. एस्सी, एम एस्सी चे प्राध्यापक आम्हाला वेगवेगळे विषय शिकवत आणि प्रयोगाची प्रात्यक्षिकेही देत होते. या कार्यशाळेत आम्हाला विज्ञान शाखेतील अनेक विषयांची तज्ञांकडून ओळख करून दिली गेली. अनेक वैज्ञानिक प्रयोग स्वत: करायला मिळाले. तिथे मार्गदर्शन वर्ग चालू असताना आम्हाला बसल्या जागी चहा बिस्कीट मिळत असे याचे कोण कौतुक वाटायचे! एवढी Special treatment त्याआधी कुठेच मिळाली नव्हती. त्या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी उद्घाटनाच्या भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य आम्हाला उद्देशून म्हणाले होते "you are the cream of society" आजही ते शब्द आठवले की अंगावर मुठभर मास चढल्यासारखे वाटते.

सांगायचा मुद्दा हा होता की त्या कार्यशाळेतून एक दिवस आयोजक आम्हाला डॉ. जयंत नारळीकरांचे व्याख्यान ऐकायला घेऊन गेले. ते खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत हे आधीच सांगितले होते. त्यामुळे आम्ही चूपचाप जाऊन व्याख्यान ऐकत बसलो. त्यावेळी त्यांनी काय सांगितले ते आता फारसे लक्षात नाही (किंबहुना आठवत नाहीच). पण एका विज्ञानकादंबरीचे नाव "कृष्णमेघ" (The Black cloud) लक्षात राहिले आणि त्यांनी दिलेला पत्ता "आयुका, पुणे-७" असा वहीत लिहून ठेवलेला. ती वही रद्दीत गेली पण पत्ता लक्षात राहिला. पुढे मी अनेकवेळा फलटणला पुस्तक प्रदर्शन भरले की त्यात ते "कृष्णमेघ" मिळते का शोधत राहायचे. अनेक पुस्तके वाचली पण हे काही मिळाले नाही. मी हळूहळू ते विसरून गेले. मग मागच्या वर्षी मी जेव्हा इंटरनेट वापरून पुस्तकांची ऑनलाइन खरेदी करायला लागले तेव्हा या पुस्तकाची आठवण झाली. मी पुन्हा शोध सुरु केला पण माझ्या लक्षात राहिलेली गोष्ट अर्धीच खरी होती. मला त्या कादंबरीचे लेखक डॉ. नारळीकर आहेत असे वाटायचे. मला ती कादंबरी काही केल्या मिळत नव्हती. मग मी असेच एकदा दादरच्या पुस्तकांच्या दुकानात गेले तिथे मला डॉ. नारळीकरांचे विज्ञानकथांचा संग्रह असलेले "यक्षांची देणगी" पुस्तक दिसले. मी ते खरेदी केले आणि त्याची प्रस्तावना वाचताना मला हे समजले की The black cloud ही फ्रेड हॉयल यांनी लिहलेली कादंबरी आहे आणि ते डॉ. नारळीकर यांचे डॉक्टरेटचे मार्गदर्शक होते. आता मला ती कादंबरी नक्कीच मिळेल. आज 'प्रेषित' वाचली, आणि ती आवडली. आता "कृष्णमेघ"ही आवर्जून वाचेन. 

Tuesday, 17 March 2015

लपवलेल्या काचा


लपवलेल्या काचा वाचायला घेतलं आणि माझा माझ्याच माणसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला; त्याहीपेक्षा महत्वाचं  म्हणजे आपल्या जगण्याकडे पाहण्याचा कोन काही अंशाने वळला. सलिल कुलकर्णी गायक म्हणून आवडले  त्यापेक्षा ते लेखक म्हणून खूप भावले . गाणं मला कळत नाही आणि वाचन मी करते अधूनमधून म्हणून मी असं म्हणते. ते  गायक म्हणून खूप ग्रेट आहेतच पण खरंच मला गाण्यातील काही कळत नाही. आपल्या मनात जे जे काही येत असतं ना , ते ते त्यांनी खूप सहज मांडलं आहे त्यांच्या पुस्तकात. इतकं साधं, सरळ, नेमकं, स्पष्ट आणि निरागस कोणी लिहू शकतं का? असा प्रश्न कोणाला पडत असेल तर त्याने हे पुस्तक वाचावं.


वाचताना कुठेतरी मध्येच असं वाटतं की अरे मीपण हाच विचार केला होता पण इतकं छान मांडायला कधीच जमलं नसतं मला. असं वाटतं  की माझ्या मनात नेमकं हेच चालू आहे ते यांना कसं  सुचलं.  "पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरवात करावी म्हणतोय" असं ते जेव्हा म्हणतात तेव्हा  खरंच असं करता आलं तर आयुष्य किती सुंदर होईल याची जाणीव होते. "तीन डोक्यांचा नाटककार" आणि "मी म्हणालो बरं!!" यातील नावाडी संकल्पनाच खूप सुंदर. सगळंच पटतं. 'ओळखा , तुम्ही कोण आहात' मध्ये व्यक्तीव्यक्तीमध्ये जे वर्गीकरण केलंय ते मजेशीर आणि रंजक आहे. आपण आपोआप ते वाचताना आपल्याला कोणत्यातरी category मध्ये बसवून टाकतो. आईवर,संगीतावर, मराठी भाषेवर, कवी आणि कवितांवर, निसर्गावर आणि सभोवतालच्या माणसांवर असलेलं त्यांचं प्रेम क्षणोक्षणी जाणवतं.  मी हे पुस्तक अजून वाचतेच आहे जितक्या वेळा वाचेल तितक्या वेळा ते आणखी सुंदर वाटतं. आपलं  वाटतं .
इतरांनीही ते वाचावं  म्हणून हा ब्लॉग.