Sunday, 4 August 2019

मैत्री दिनानिमित्त शुभेच्छा

आज सकाळपासून मैत्री दिनानिमित्त शुभेच्छा देतेय-घेतेय परंतु आज इथे खास लिहावेसे वाटले ते वेगळ्या काही लोकांसाठी... त्यांचे फोटो माझ्याकडे नाहीत, फोन नंबर नाहीत किंवा पत्ताही नाही... जिचे बोट धरून शाळेत जायला लागले ती बालमैत्रिण बबली, आमच्या दोन गायी राणी-लाडी (हो, त्याही मैत्रिणीच), प्राथमिक-माध्यमिक शाळेतील सख्या ज्यांनी माझी अखंड बडबड न कंटाळता ऐकून घेतली (काहींचे चेहरेही नीटसे आठवत नाहीत आता), ज्युनिअर कॉलेजची दोन वर्षे कायम माझ्यासोबत होती ती माझी सायकल (सजीव नसली म्हणून काय झाले!), एवढेच नव्हे तर १५ तास रेल्वेमध्ये अडकले तेव्हा माझी काळजी घेणारे काका काकू आणि माझ्या भरवश्यावर निश्चिंत झोपलेल्या आज्जी, दोन तासांच्या प्रवासात भेटलेले फक्त हरवलेल्या मांजरीसाठी पंढरपूर, जोतिबा, जेजुरी, शिर्डी देवदर्शन करणारे काका, २५ मुलांना स्पर्धेसाठी घेऊन जाताना जगभरच्या भ्रमंतीचे किस्से सांगणारे गुरुजी, महत्वाच्या दिवशी नर्व्हस असताना स्मितहास्य आणि आत्मविश्वास वाढवणारे दोन शब्द बोलणारी अनोळखी मुलगी, पुढचे मागचे काहीही माहीत नसताना माझ्या प्रोजेक्ट मध्ये नवनवीन कल्पना सुचवणारे सहप्रवासी... या आणि अशा सर्वांसाठी मैत्री दिनानिमित्त खूप शुभेच्छा! त्या त्या क्षणापूरते का असेना तुम्ही माझ्या सोबत होतात आणि खऱ्या मित्राची भूमिका तुम्ही उत्तम निभावली, मला घडवले आणि माझा प्रवास (आयुष्याचा असो की गाडीतून) सुखकर केलात! तुम्ही सर्वजण माझ्या कायम स्मरणात राहाल.... Happy Friendship Day!

Friday, 10 May 2019

कर्ण-वृषाली भेट



काही दिवसांपूर्वी कर्ण-वृषाली भेटीची काल्पनिक गोष्ट वाचलेली... त्यावर आधारित मी रचलेली छोटीशी कविता

अश्व दौडे चंपानगरी, आनंदी आज स्वारी
कित्येक वर्षांनी जाऊ घरी, दोन क्षण घुटमळे गंगातीरी
तांबूस रंग पसरुनी चौफेर, सूर्यनारायण क्षितिजावर
तीच लालिमा नभावर, चित्र जुनेच मनावर
गंगामाईच्या कुशीत बालपण, खेळगडी-सोबती-बंधू शोण
शंख शिंपले आणि पोहणं, मध्यान्हाचे राही भान
राधाईची साद कानी, वृषालीची आठवण मनी
कर्ण थबकला एका क्षणी, हाती लगाम आवरुनी
जाता परिचित मार्गांनी, काठावर दिसे एक तरुणी
जलकुंभ डोईवर धरुनी, पाहता नजर रोखुनी
कानी पडला मधुर स्वर, वाट चुकला का धनुर्धर?
हसून मनोमन दिले उत्तर, स्वगृहाचा कधी पडतो विसर?
उत्तरे-प्रत्युत्तरे चालली, एकमेका ओळख पटली
डोळ्यांची भाषा कळली, बालपणीची वसु भेटली
लटका राग नाकावर, चालू लागली वाटेवर
पत्र धाडले आजवर, माझी नाही अगदी फिकीर
काय बोलतो कुमार, स्नेह जडलेलातीवर
करुनी हलके स्मित, अंगराज प्रवेशला नगरीत

Monday, 8 April 2019

दुरावा

आज गुपचूप आले दोन हुंदके
ऐकणारे कोणी नाही म्हणून माघारी गेले
तेवढ्याच अलवारपणे
तू जातेयस पुन्हा दूर
पहिल्यासारखी...
जिथून सुरुवात झालेली आपल्यातील
पडत जाणाऱ्या अंतराची
न मिटणाऱ्या, न दिसणाऱ्या
वाढत जात होते, डोळ्यांना दिसत नसले तरी
जाणवत मात्र होते...
मी करत राहिले मूक आर्जव
मूकच होते ते, कसे पोहोचणार तुजपाशी
मीही प्रयत्न केले नाही ती दरी मिटवण्याचे
आक्रोश तुला ऐकू येणार नाही 
अशी एवढी घट्ट समजूत झाली की
तुझ्या नसण्याची होऊ लागली सवय
हाकेच्या अंतरावर आलीस तरी
आपलेपणा वाटला नाही,
कसा कोण जाणे...
तुझ्या जवळ येण्याचा खरेपणाही
आता भासू लागला एका मृगजळासमान

Sunday, 31 March 2019

फुटक्या आरशात...



एका वेड्या मुलीने गावात फिरताना पाहिले सहज,
रस्त्यावर पडलेल्या फुटक्या आरशात स्वत:ला...
उन्हात फिरून चेहरा काळवंडलेला,
डोक्यावर घेऊन मानेभोवती रुमाल लपेटलेला ...
खांद्यावर लटकवलेली कधीकाळी लाल रंगाची असलेली,
ब्रँडेड बॅग पण आता विटकरी रंगाकडे झुकलेली...
पार्लरसाठी खर्चलेले हजार रुपये तिसऱ्या दिवशी व्यर्थ
वीस वर्ष शिकून घेतलेल्या डिग्रीला नोकरी पुरताच अर्थ...
तापलेले रस्ते तुडवत, नकाशातून वाटा धुंडाळत
सोबत चार विश्वासू मुलींना घेऊन होती दारोदार हिंडत...
इथे प्रत्येक दिवशी भेटत नवी माणसे, नवे अनुभव
नवे चेहरे, कधी अशिक्षिताकडून एक नवी शिकवण...
जगाच्या शाळेत तुजसम असतील बहू,
नको वेडे तू उगाच तुझ्या भ्रमात राहू...
एकदा पुन्हा त्या फुटक्या आरशात नीट पहा,
पण अंतर्यामी डोकावून जाणून घे स्वत:ला,
कष्ट कर, कर्तृत्वाचा ठसा उमटवून मग मिरव
वेगळेपण तुझ्यातील दिसू दे जगाला...
~ मेघा निकम

Sunday, 6 January 2019

सततची धावपळ, आळसाच्या धुळीने माखलेली रसिकता आणि समाजमाध्यमांवर खर्च केलेला निरर्थक वेळ यांमुळे काही दिवस वाचनापासून दूर राहिले होते. कुठेतरी चुकतंय, काहीतरी हरवलंय असं सतत वाटत होतं पण भवतालच्या गर्दीत मी स्वतःला गुंतवून ठेवल्याने ते काहीतरी काय ते कळत नव्हते. आज कित्येक दिवसांनी एक नवेकोरे पुस्तक हातात घेतले आणि इतके दिवस कुठेतरी हरवलेली माझी मीच मला नव्याने सापडले.