Wednesday, 25 October 2017

मला नाही भेटायचे आता तुला!

तुला एक सांगू का?
मला नाही भेटायचं आता तुला!

आपण महिना-दोन महिने पाहत नाही एकमेकांना
किती छोट्या गोष्टी असतात, बऱ्याचवेळा निरर्थक,
भांडतो त्यावरून आपण दोन दोन दिवस
रुसून बसतो आपण एकमेकांवर
बस्स झाले आता हे सगळे, मला नाही भेटायचं आता तुला!

तुझी पाठ दुखते माहित आहे मला
आणि नाही आवडत मला हे
तू फक्त मला भेटण्यासाठी
सहा तास बसचे हेलकावे खातोस ते
मलाही एका दिवसाच्या सुट्टीत
एवढ्या दूरचा प्रवास करणे नाही जमत
बस्स झाले आता हे सगळे, मला नाही भेटायचं आता तुला!

भेटल्यावर कोणीतरी पाहिल
म्हणून गावापासून दूर जायचे
बाहेर भेटतोय म्हणून चुकुनही
हातही हातात नाही घ्यायचे
कशाला हवा मग एवढा खटाटोप
बस्स झाले आता हे सगळे , मला नाही भेटायचे आता तुला!

भेटल्यावर मांडायचे महिनाभराचे हिशोब
ताळेबंद होता होत नाही
मागचे गैरसमज दूर करता करता
नवीन गैरसमज आणि मग रडारड
तुझी होत नसेल पण मी रडतेच
नेहमीप्रमाणे मनातल्या मनात
बस्स झाले आता हे सगळे , मला नाही भेटायचे आता तुला!

निरोप देताना पुन्हा डोळे पाणावतात
नंतर कधी भेटू ते सांगता येत नाही
या गोष्टीचा कंटाळा आलाय मला
बस्स झाले आता हे सगळे
मला नाही भेटायचे आता तुला दोन चार तासांसाठी!
मी येतेय राहायला तुझ्यासोबत
कधीही दूर न जाण्यासाठी
पुन्हा या अशा भेटींचा खेळ नाही मांडायचा मला
बस्स झाले आता हे सगळे , मला नाही भेटायचे आता तुला!
- मेघा 

No comments:

Post a Comment