Friday, 22 May 2020

वारूळ नवे- जुने


मन एक वारूळ जणू
जखमांचे, जखमांवरील खपल्यांचे
अनेक वार, काहीसे घाव
कोण जाणे एखादा आघातही
कोण्या एकट्या क्षणी वारूळ फूटावे
अन एकापाठी एक याव्या बाहेर
जखमा भळभळणाऱ्या, खोलवर रुतलेल्या
काही चिघळलेल्या, काही चघळलेल्या
त्यांतही चुरस कोण कोणापेक्षा मोठी
एकेकीला मग करायचे बोलते
एखादी निमूट गप्प दोन वाक्य बोलून
एखादी बोलूच देत नाही इतरांना
कोणी मोकळ्या होऊन जातात विरून
काही दगड झालेल्या सोसून सोसून
तरीही खपली निघाली तर भुणभुण करणाऱ्या
काही हळव्या टचकन डोळे ओलावणाऱ्या
वारूळ फुटले की सगळ्याच बाहेर पडतात
काही चिरडल्या जातात, भरडल्या जातात
काही फक्त मागे व्रण ठेवून जातात
काही ओले घाव आणखी खोल करतात
काही जातात निघून कायमच्या
तर काही...काही पुन्हा नवे वारूळ बांधतात
ते नवे वारूळ असते की असतो फक्त आभास
जुन्याच जखमांवर नवीन खपल्या आणि नव्याचा भास

Saturday, 2 May 2020

एकमेकांना बळ देऊया



प्रिय आई बाबा यांस
पत्र लिहण्यास कारण की आज त्याची नितांत गरज आहे आणि पुढे ते जपून ठेवता येईल, त्याची आठवण पुढच्या वर्षी, चार वर्षांनी, दहा वर्षांनीही तेवढीच राहील आणि त्यावेळी आपल्याला एकमेकांचा अभिमान वाटेल.
तुम्ही कसे आहात? मी कशी आहे? तुम्हीही बरे आहात, मीही बरी आहे, खाऊन पिऊन ठणठणीत आहे हे आपण रोज एकमेकांशी फोनवर किंवा whats app video call वर बोलून पाहून एकमेकांना कळत असते, ते पत्रातून सांगण्याची तशी गरज नाही. गरज आहे ती एकमेकांच्या अव्यक्त चिंता, काळजी किंवा भावना व्यक्त करण्याची आणि एकमेकांना धीर देण्याची.
Covid-19 म्हणजेच कोरोना विषाणूशी संपूर्ण जग लढा देत असताना आपल्याला एकमेकांची काळजी वाटते आणि ते साहजिकच आहे.सुदैवाने हॉस्पिटल्स, पोलीस यंत्रणा आणि प्रशासन आपली काळजी घेण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत, अशावेळी आपण त्यांना सहकार्य करावे आणि आहोत तिथेच आपापल्या जागी राहून कोरोना संक्रमण टाळावे एवढीच अपेक्षा आपल्याकडून केली जात आहे.
तुम्हाला माझी काळजी वाटते कारण मी आज मुंबईमध्ये red zone मध्ये राहते. इथे आजूबाजूला containment zones आहेत. तुम्हाला काळजी वाटते कारण तुम्ही मला जन्म दिला आहे, वाढवले आहे आणि तुमच्यासाठी मी कायमच लहान बाळ असणार आहे पण आज मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते की मी आता 27 वर्षाची आहे, माझे इथे स्वत:चे घर आहे, मला आठवड्यातून 1 दिवस सुरक्षिततेचे योग्य नियम पाळून भाजी आणता येत आहे, तुम्ही मला घडवताना स्वावलंबी केले आहे, संकटांना सामोरे जायला शिकवले आहे आणि आता जेव्हा या गोष्टींना तोंड द्यायची वेळ आली आहे तेव्हा तुम्ही घाबरत आहात आणि काही अंशी मलाही कमजोर करत आहात.
घरी येण्याची इच्छा मलाही तितकीच आहे पण त्याहून जास्त काळजी मला या गोष्टीची आहे की चुकून मला कोरोनाची लागण झालेली असेल आणि मी घरी आले आणि home quarantine जरी झाले तरी माझ्यामुळे तुम्हाला कोरोनाचा त्रास होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून मी घरी यायला तयार नाही. मला काळजी वाटते कारण तुम्ही माझे आई बाबा आहात, आता तुम्ही दोघांनीही वयाची पन्नाशी- साठी ओलांडली आहे आणि तुम्ही निरोगी राहावे अशी माझी इच्छा आहे.
देशात बऱ्याच ठिकाणी मुंबई पुण्यातून परवानगी घेऊन/न घेताही आपापल्या गावी गेलेल्या अशा cases आहेत की गावी गेल्यानंतर त्यांना लक्षणे दिसू लागली आणि नंतर ते corona positive आहेत असे समजले.
तुम्हाला आठवते का तुम्ही तुमच्या बालपणाच्या गोष्टी सांगताना किती कठीण परिस्थितीतही कष्ट करून तुम्ही कसे यशस्वी झाला ते सांगत होतात. दोन वेळच्या भाकरीचे वांदे होते, आज आम्ही lockdown मध्ये देखील 3 वेळेला ताजे अन्न खात आहोत, भाज्या संपल्या तर डाळी, सांडगे, चटण्या आहेतच. महिनाभराचा किराणा भरून ठेवलाय. डोक्यावर छप्पर आहे. मला जेवण बनवता येते ती गोष्ट वेगळी पण ज्यांना येत नसेल तर तो/ती काय खात असेल याची काळजी करण्यापेक्षा चार पदार्थ बनवायला शिकवण्याची आणि शिकण्याची हीच वेळ आहे.
फक्त तुम्हालाच नाही तर जगातल्या सर्व पालकांना माझी अशी विनंती आहे की मुलांना तुम्ही मोठे केले, शिकवले, स्वावलंबी केले आहे तर आज तुम्ही दिलेल्या शिकवणीच्या परीक्षेचा काळ आहे असे समजा आणि मुलांना लढू द्या, त्यांची काळजी करण्यापेक्षा त्यांना धीर द्या, नवीन गोष्टी करण्यास शिकण्यास प्रोत्साहन द्या, पण कृपया भावनिक होऊन त्यांना घरी बोलावू नका.
हे दिवसही लवकरच जातील आणि तुम्ही एकमेकांना भेटू शकाल.
दुसरी गोष्ट म्हणजे जसे मी तुमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करेन तसाच प्रयत्न राज्यातील देशातील प्रत्येकाने स्वत:पुरता विचार करत केला तर व्यवस्थेवर त्याचा ताण येईल आणि ज्यासाठी आपण हे टाळतोय तेच घडेल, आणि आपण जिंकत आलेली लढाई शेवटी शेवटी हरू, त्याची मला जास्त काळजी आहे. 80% लोकांमध्ये लक्षणे नसतानाही त्या लोकांचे reports corona positive आले आहेत.
अशावेळी जसे भावनिक होऊन मला माझ्या घरी जायचे आहे असा विचार मी केला नाही पाहिजे तसेच तुम्ही म्हणजे माझ्या आई बाबांनी माझी मुलगी घरी यायला पाहिजे असा विचार करता कामा नये.
ज्यांना घरदार नाही, जेवायला मिळत नाही, नोकरी नाही अशांची व्यवस्था प्रशासन प्राधान्यक्रमाने करत आहे, आणि ते गरजेचे आहे.
ज्यांना अजूनही शक्य आहे त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एकमेकांना वाचवूया, एकमेकांना बळ देऊया.
तुमचीच
छकुली

Friday, 10 April 2020

जर हा प्रादुर्भाव थांबला नाही तर कदाचित...



जर हा प्रादुर्भाव थांबला नाही तर कदाचित...

जर तुम्ही आज सहकार्य नाही केले तर कदाचित...
काही दिवसांनी तुमच्या account मध्ये
महिना अखेरीस पगार येणार नाही कदाचित...
काही दिवसांनी तुमची लोकलमध्ये जागा
पकडणारे कोणीतरी जागेवर नसेलच कदाचित...
ऑफिसमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणारा
तुमचा सहकारी तुमच्या बाजूला नसेल कदाचित...
काही दिवसांनी तुमचा नेहमीचा कोपऱ्यावरचा
भाजीवाला तुम्हाला दिसणार नाही कदाचित...
काही दिवसांनी तुमचा रोजचा दूधवाला
तुमच्या घरी दूध घालणार नाही कदाचित...
काही दिवसांनी तुमचा ड्राइव्हर, तुमचा वॉचमन
सुद्धा ड्युटीवर येणारच नाही कदाचित...
काही दिवसांनी पार्ट्या, गप्पागोष्टी करणारा तुमचा
एखादा मित्रही तुम्हाला भेटणार नाही कदाचित...
काही दिवसांनी तुमचा फॅमिली डॉक्टरही
तुमच्यावर उपचार करण्यासाठी नसेल कदाचित...
काय सांगावे काही दिवसांनी तुमचे दूरचे काका, तुमची जवळची आत्या, तुमचे आजोबा,तुमची आई, तुमचा भाऊ, तुमचा नवरा/बायको, तुमचे बाळ किंवा स्वतः तुम्हीच या जगात काय आहे, काय नाही, कोण आहे, कोण नाही, काय सुरू, काय बंद काहीही पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी नसाल काही दिवसांनी कदाचित...

काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतः ला जपा, इतरांना जपा... आणि कोरोना संबंधित कोणतीही लक्षणे आढळली तर आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा.
~मेघा निकम

Saturday, 4 January 2020

अरसिक



अगदीच नाही झाले अरसिक रुक्ष वगैरे

पण आताशा नाही तो उत्साह

रहाटगाडग्यात गुरफटले की

अपेक्षाभंगाने केले नीरस?

घेण्याचा आनंद नाही म्हणून

आता सापडू लागला तो देण्यात?

बक्षीस म्हणा की कौतुक

सन्मान असो की शाबासकी

ओंजळ भरलीच नाही आणि

तरी होत चाललीये रिकामी?

हेच असतं का गमक मोठेपणाचं?

औदार्याचं की नुसतंच वय वाढण्याचं?

Sunday, 4 August 2019

मैत्री दिनानिमित्त शुभेच्छा

आज सकाळपासून मैत्री दिनानिमित्त शुभेच्छा देतेय-घेतेय परंतु आज इथे खास लिहावेसे वाटले ते वेगळ्या काही लोकांसाठी... त्यांचे फोटो माझ्याकडे नाहीत, फोन नंबर नाहीत किंवा पत्ताही नाही... जिचे बोट धरून शाळेत जायला लागले ती बालमैत्रिण बबली, आमच्या दोन गायी राणी-लाडी (हो, त्याही मैत्रिणीच), प्राथमिक-माध्यमिक शाळेतील सख्या ज्यांनी माझी अखंड बडबड न कंटाळता ऐकून घेतली (काहींचे चेहरेही नीटसे आठवत नाहीत आता), ज्युनिअर कॉलेजची दोन वर्षे कायम माझ्यासोबत होती ती माझी सायकल (सजीव नसली म्हणून काय झाले!), एवढेच नव्हे तर १५ तास रेल्वेमध्ये अडकले तेव्हा माझी काळजी घेणारे काका काकू आणि माझ्या भरवश्यावर निश्चिंत झोपलेल्या आज्जी, दोन तासांच्या प्रवासात भेटलेले फक्त हरवलेल्या मांजरीसाठी पंढरपूर, जोतिबा, जेजुरी, शिर्डी देवदर्शन करणारे काका, २५ मुलांना स्पर्धेसाठी घेऊन जाताना जगभरच्या भ्रमंतीचे किस्से सांगणारे गुरुजी, महत्वाच्या दिवशी नर्व्हस असताना स्मितहास्य आणि आत्मविश्वास वाढवणारे दोन शब्द बोलणारी अनोळखी मुलगी, पुढचे मागचे काहीही माहीत नसताना माझ्या प्रोजेक्ट मध्ये नवनवीन कल्पना सुचवणारे सहप्रवासी... या आणि अशा सर्वांसाठी मैत्री दिनानिमित्त खूप शुभेच्छा! त्या त्या क्षणापूरते का असेना तुम्ही माझ्या सोबत होतात आणि खऱ्या मित्राची भूमिका तुम्ही उत्तम निभावली, मला घडवले आणि माझा प्रवास (आयुष्याचा असो की गाडीतून) सुखकर केलात! तुम्ही सर्वजण माझ्या कायम स्मरणात राहाल.... Happy Friendship Day!