जून महिना उजाडला की बऱ्याच जुन्या आठवणी डोके वर काढतात. मागच्या जून मध्ये या आठवणींची आठवण काढायला उसंतच नव्हती. मागच्या वर्षी मी मे ते जुलै गुजरातमध्ये होते तरीही दोन दिवस का असेना मुंबईला येणे झालेच आणि ते दोन दिवसही कधीच विसरले जाणार नाहीत असेच.. जूनच्या जुन्या आठवणींमध्ये तीही एक आठवण जमा झाली.
- जून २०११
चुलतभावाला इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा होता. त्या प्रवेशफेरीचे निमित्त झाले आणि मी पहिल्यांदा मुंबईत दाखल झाले. सकाळी लवकर प्रवेश फेरीचे काम झाले की दिवसभर मग आम्ही मुंबईत कुठे कुठे फिरायचो. ४ दिवस दादर-वरळी-बांद्रा-महालक्ष्मी-छत्रपती शिवाजी टर्मिनस खूप ठिकाणी फिरलो. काका तेव्हा आमच्यासोबत असायचे. बेस्ट बसचा २५ रू. चा दैनिक मैजिक पास… दिवसभर मुंबईत कुठेही बस मध्ये बसा आणि कुठेही उतरा. काका इतकी वर्ष मुंबईत राहिलेले असल्यामुळे त्यांना सगळ्या बसेस, मार्ग माहित. कसलाही विचार न करता आम्ही दोघे त्यांच्या पाठी चालायचो, ते चढतील त्या बस मध्ये चढायचे, ते उतरतील तिथे उतरायचे.
वरळीचे नेहरू तारांगण मला पहायचे होते पण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा शो सुरु व्हायला बराच अवकाश होता म्हणून मग तेथील सिक्युरिटी गार्ड ने आम्हाला सायन्स सेंटर पाहून यायला सुचवले. मधल्या शॉर्टकटने आम्ही नेहरू सायन्स सेंटरला पोहोचलो. बाप रे! एवढी मोठी इमारत आणि कित्ती सारे ज्ञानामृत… एका दिवसात फक्त चालून सगळे पाहता येते. शिकायचे समजून घ्यायचे असेल तर आठवडाच काय, महिनाही अपुरा पडेल. चालून चालून आणि उभ्यानेच सगळे पाहून पाय थकले. मग आम्ही तिथेच बाहेर येउन, बागेत बसून काकींनी डब्यात दिलेली बटाट्याची भाजी अन चपाती खाल्ली. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा आत पाहायला गेलो. तेव्हा ठरवले होते की पुन्हा मुंबईला आल्यावर इथे यायचे नक्की. पण अजून ते राहिलेच आहे. पण आत्ता आठवले आहे तर आता लवकरच जाईन पुन्हा.…
४ दिवसात जमेल ती ठिकाणे पाहिली आणि गेले घरी माघारी.
- जून २०१२
सुट्टीचा उपयोग करून घ्यायचा. कुठेतरी इंटर्नशिप करायची आणि त्यासोबत भरपूर फिरायचं, मजा करायची असं मी, चंचल आणि अपर्णाने ठरवलं. अभ्यासक्रमात ही इंटर्नशिप समाविष्ट नव्हती तरीही आम्ही ती करायची ठरवलं होतं. १५ दिवस मस्तपैकी अपर्णाच्या डोंबिवलीच्या घरी राहिलो. लोकलने डोंबिवली ते ठाणे प्रवास म्हणजे डेंजर!!! तुफान गर्दी… बऱ्याचदा आम्हाला ट्रेन पकडताच यायची नाही गर्दीत. दोनवेळा तर असे झाले की एकजण एका ट्रेन मध्ये चढायची. दुसऱ्या दोघींना काय ते जमायचे नाही मग त्यामागून येणाऱ्या ट्रेन मध्ये कसेबसे चढायचो. पण खुशीखुशीने निवडलं होतं ते, झालो त्यातून पार. NDT (Non Destructive Testing)मध्ये ट्रेनिंग घेत होतो. आम्हाला मार्गदर्शन करणारी मुलगी मस्त chill असायची. सुरुवातीला बरंच काही वाचायला सांगायची. ते नीट कळत नव्हते तेव्हा आम्ही दुपारपर्यंत कंटाळून जायचो, आणि तिच्या ते लक्षात आले की ती आम्हाला जा म्हणून सांगायची, नाहीतर आम्हीच काहीतरी बहाणा सांगून सटकायचो. ऑफिसमध्ये असताना अनेकदा कोणाचे लक्ष नाही पाहून कंप्युटरवर गेम्स सुद्धा खेळलो. पण जेव्हा ती साईटवर घेऊन जायची तेव्हा छान वाटायचे. जे वाचतो, लिहतो ते प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय नीट समजत नाही. हळूहळू कळायला लागले वाचलेले आणि मग रिपोर्ट्समध्ये पण इंटरेस्ट यायला लागला.
ट्रेनिंगशिवाय या सुट्टीत बरेच काही केले. एकत्र स्वयंपाक करायला मजा यायची. मला अजूनही नेहमी आठवते. चंचल किंवा अपर्णा काहीतरी बनवत असतील तेव्हा मी ओट्यावर चढून बसायचे. किचनचा ओटा L आकाराचा होता, त्याच्या मोठ्या लांब बाजूला शेगडी होती आणि छोट्या बाजूवर पाण्याची भांडी असायची. सरकवा-सरकवी करून मी तिथे बसायला थोडी जागा करायचे. आणि मग निवांत बसून मी खूपवेळ बडबड बडबड करत राहायचे. रात्री जेवल्यानंतर कितीही कंटाळा आला असला तरी, झोप येत असली तरी आम्ही पत्ते खेळल्याशिवाय झोपायचो नाही. सुट्टी होती ना ती मग खेळायला नको का?म्हणून फक्त! दरम्यान चंचलचा वाढदिवस आला. केक फुगे वगैरे आणून मस्त साजरा केला. एक दिवस घारापुरीची लेणी (एलिफंटा केव्ह्स) पाहायला गेलो. बोटीतला प्रवास, पाऊस, मक्याचे कणीस, फोटो,खरेदी… मस्त दिवस होता तो! या सुट्टीतील काही फोटो एकत्र…
- जून २०१३
साईटवरील इंजिनिअर चांगले मार्गदर्शक होते, शिवाय ते आमच्याच कॉलेजमधील होते. प्रोजेक्ट व्यवस्थापकांनी सुद्धा खूप मदत केली. नवनवीन गोष्टी आम्हाला शिकवल्या. सर्वेईंग करताना फार मजा आली. फ्लोर लेवल फिक्स करायची होती. आणि आमच्या गाईडनी सेट केलेली ऑटो लेवल थोडी उंच होती. त्यातून पाहायला माझी उंची कमी असल्यामुळे पायाखाली विटा मांडून मला पाहावे लागायचे. साईटवर सुरक्षिततेसाठी आम्ही जेव्हा सेफ्टी शूज, हेल्मेट, जाकेट घालायचो तेव्हा उगाचच स्वत:चा अभिमान वाटायचा.
दरम्यान रविवारी सुट्टी म्हणून आम्ही सर्व मैत्रिणी चंचलच्या मामांकडे गेलो होतो. जेवणे आटोपली आणि बाकीच्या सर्वजणी अपर्णाच्या घरी गेल्या. मी चंचलच्या इथेच राहिले. दुसऱ्या दिवशी आम्ही साईटवर जाऊ आणि मग संध्याकाळी मी पुन्हा माझ्या काकांकडे… असे ठरले हते. पण त्यादिवशीच पाऊस जो सुरु झाला ते सलग ३ दिवस चालूच होता. आम्ही साईटवर ही गेलो नाही, घरातून बाहेरच पडलो नाही. तेव्हाच उत्तर भारतात ढगफुटी झाली होती. आणि दिवसभर त्याच्या बातम्या, मुलाखती टिव्हीवर चालू होत्या. चौथ्या दिवशी पावसाने रजा घेतली आणि मग आमचे काम पूर्ववत झाले. या पावसामुळे मात्र आम्हाला त्या सुट्टीत कुठेही फिरता आले नाही. पण तरीही हा अनुभव बरेच काही शिकवून गेला आणि आम्हाला समृद्ध करून गेला.
त्यानंतरचे अनुभव पुढच्या भागात…


No comments:
Post a Comment