Tell me about yourself असं आपल्याला जेव्हा कोणी विचारतं ना, तेव्हा आपण खूप मोकळे नाही बोलत अनेकदा. मुलाखत असो वा सभा-समारंभातील भेटीगाठी, समोरच्याला जे अपेक्षित आहे ते सांगतो. किंवा कुठेतरी आपली ओळख करून दिली जाते तेव्हा ती अगदी सोयीस्कररित्या पाहिजे तेवढीच केली जाते. करून दिलेल्या ओळखीतून आपण मग एकमेकांना तोलतो. मिळालेला पुरस्कार, दहावी-बारावीचे मार्क्स , आपला व्यवसाय, आपण घेतलेली शैक्षणिक पदवी हीच आपली ओळख असते का? त्याच्याही पलीकडे आपण व्यक्ती म्हणून असतो ना ! आपली आवड, छंद , स्वभाव याची फारशी माहिती दिली जात नाही.
मला कधीकधी वाटतं, आपण चुकीची गाडी तर नाही ना पकडली ? की गाडी बरोबर आहे पण रस्ता चुकलोय? शिक्षण , नोकरी किंवा व्यवसाय हे सर्व म्हणजे जगण्याची फक्त साधने होती ना! ती साध्य केव्हा बनली तेच बहुतेक आपल्याला कळलं नसावं. ध्येय गाठायचं आहे म्हणताना प्रवासात येणाऱ्या सुंदर गोष्टी अनुभवायच्या राहून तर नाही ना जात आपल्याकडून ? आजचा दिवस सुंदर आहे, हे जग सुंदर आहे, इथली माणसे खूप मस्त आहेत, छान छान पुस्तके आहेत, मंजुळ संगीत आहे, सूर्योदय आशादायी आहे मग अनेकांचं जीवन का निराशावादी बनत चाललंय? कुठेतरी चुकतंय काहीतरी!
इथे कोणी मृगजळाच्या मागे धावतो, कोणी ओअसिस शोधत फिरतो आणि कितीतरी लोक एकाच पाणवठयावर आयुष्यभर जगतात. पण समाधानाने मरणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच सापडतील. आयुष्य संपत आल्यावर "अरे जगायचं राहूनच गेलं" असं वाटून घेण्यापेक्षा आजच जगून घेऊया…
आपली ओळख हे आपलं जगणं असावं, आपलं हसणं आणि बोलणं असावं !
आपली ओळख हे आपलं जगणं असावं, आपलं हसणं आणि बोलणं असावं !
No comments:
Post a Comment