Friday, 30 October 2015

यू टर्न

"यू टर्न" 
खूप दिवसांची इच्छा होती हे नाटक पाहण्याची… पण प्रयोग असेल तेव्हा नेमकं काहीतरी असायचं submission, exam वगैरे. आज सहज लोकसत्ता मधील प्रयोगाची जाहिरात पाहिली आणि ठरवलं, आज पाहायचाच.. आजचा नाटकाचा ५८० वा प्रयोग होता.  नाटक म्हटलं की आधीच मी खूप उत्साही असते. कोणत्याही movie पेक्षा हे वेगळं असतं. वेळ पाहिला, bag उचलली आणि निघाले.

डॉ. गिरीश ओक आणि ईला भाटे यांचा अभिनय म्हणजे उत्तमच… एवढ्या मोठ्या कलाकारांबद्दल किंवा मोठ्या लेखनाबद्दल मी पामराने काय बोलावे! पण मला जे अगदी मनापासून वाटलं ते सांगते. घटस्फोटीत मेजर सुधीर वैद्य आणि विधवा रमाबाई गोखले यांची ही कथा…एकाकीपणा घालवण्यासाठी companion म्हणून राहण्याचा ते निर्णय घेतात. दोन व्यक्ती भेटतात, प्रेमात पडतात, घरच्यांचा (मुलांचा ) विरोध, मग समजावणे आणि नंतर लग्न अशी typical story नाहीये ही किंवा दोन एकाकी माणसांचे रडगाणेही नाहीये … संवाद खूप सुंदर लिहले आहेत याचे.  त्यातून हा विषय अगदी  मनाला जाऊन भिडतो. या नाटकातील मला आवडलेली काही वाक्ये 
"अपेक्षाभंगाचे दुःख वाटून घेण्याचा अधिकार कोणालाच नसतो, कारण आपण अपेक्षा ठेवतो म्हणून अपेक्षाभंग होतो . रोप लावतानाच आपण अशी अपेक्षा ठेवतो की उद्या त्याला फुलं-फळं येतील आणि आपल्याला सुख आणि आनंद देतील, असं करणं म्हणजे त्या रोपाच्या मुळाशी दुःखाचं बीज पेरणं… "
मेजर आणि गोखलेबाईनी मुलांकडून ठेवलेल्या अपेक्षा फार मोठ्या नव्हत्या… पण  मुलांना आपला निर्णय पटला नाही आणि म्हणून ते आपल्याशी तुटक वागायला लागले याचे दुःख फार मोठे… 
सगळं आयुष्य मुलाबाळांसाठी वेचलेल्या पालकांनी आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आल्यावर सोबतीचे सुख मिळावे म्हणून केलेला प्रयत्न, याला मुलांची नापसंती आहे हे कळल्यावर पुन्हा एकटे राहण्याचा निर्णय घेताना एकमेकांशी किंवा कदाचित स्वतः च्या मनाशीच केलेला वाद… 
मुलांच्या हौसेमौजेखातर आणि त्यांना पाहिजे ते मिळावे म्हणून झटणारे, त्यांचे  हट्ट पुरवणारे आपण, आपल्या आयुष्याच्या उतरार्धात किमान त्यांनी आपल्या गरजांचा तरी विचार केला पाहिजे. आपल्या एकटेपणाबद्दल केवळ कोरडी सहानुभूती दाखवण्यात काय अर्थ ? एवढीच त्यांची मुलांकडून अपेक्षा !
आणखी एक असेच वाक्य,  
"आता सुख दुःखाकडे जर वेगळ्या दृष्टीने पाहता आले पाहिजे नाहीतर प्रत्येक पावसाळ्यात आभाळातून अंगावर पाणी पडलं आणि वाहून गेलं, एवढाच आयुष्याला अर्थ उरायचा… " 
नाटकात वेळोवेळी बोलल्या गेलेल्या संवादांना तत्वज्ञानाची एक किनार आहे. मानवी नात्यांबद्दल आपल्या  ज्या संकल्पना आहेत त्याबद्दल पुन्हा विचार करायला या नाटकाने मला भाग पाडले. नाटकाला बव्हंशी ज्येष्ठ नागरिक मंडळी होती पण मी २२ वर्षांची म्हातारी हे नाटक पाहून त्यातील विचारांनी समृद्ध झाले  आणि पुन्हा तरुण झाले एवढं नक्की… 

No comments:

Post a Comment