Thursday, 30 April 2015

सत्तावीस उणे नऊ


अकबर बिरबलाची एक गोष्ट लहानपणी वाचली होती. त्यात कोणीतरी विद्वानाने अकबराच्या दरबारातील सर्वांना पेचात टाकलेले असते. एक साधा प्रश्न विचारून त्यांना कोड्यात टाकलेले असते. प्रश्न असा होता की सत्तावीस उणे नऊ म्हणजे किती ? तर 'अठरा' या उत्तरावर समाधानी होतो तो विद्वान कसला!!

मग प्रश्नाचं उत्तर द्यायला बिरबल पुढे सरसावला आणि म्हणाला. "सत्तावीस उणे नऊ म्हणजे शून्य." आता हे शून्य कसं ? तर वर्षात एकूण नक्षत्रे असतात सत्तावीस, त्यातील नऊ नक्षत्रे पावसाची असतात आणि तीच वजा केली तर हाती काहीच उरत नाही. हे एका शेतकऱ्याच्या दृष्टीकोनातून किंवा इतर व्यावसायिक दृष्टीने पाहिले की पटते. हंगाम किंवा ऐन उमेदीचा काळ हातातून निसटला तर बाकी शून्यच , नाही का?

मला हीच गोष्ट आपल्या आयुष्याशी निगडित वाटते. तारुण्य आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा उमेदीचा काळ. सत्तावीस नक्षत्रांपैकी नऊ प्रमाणेच आयुष्याचा एक तृतीयांश भाग हा तारुण्याचा असतो.  हा कालावधी हातून निसटता कामा नये. या वयात नवीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते.  एकदा तो उत्साह गेला कि मग जगाच्या रहाटगाडग्यात तो ही गुंतून पडतो.  मी असंही वाचलंय कुठेतरी की माणूस त्याच्या वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत हाती घेतलेली कोणतीही गोष्ट, कृती, काम तडीस नेवू शकतो. किंबहुना निसर्ग त्याला हे काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी ऊर्जा देत राहतो. अर्थात त्यानंतर तो करू शकत नाही असं माझं म्हणणं नाहीये. आपलं तारुण्य टिकवणंसुद्धा आपल्याच हाती आहे. ती जिद्द, तो उत्साह आयुष्यभर टिकवणारे लोक पुढे महान झालेली कित्येक उदाहरणे आहेत जगात.

पण या पावसाळ्याच्या नऊ नक्षत्रांचा हवा तसा लाभ करून घेता आला तर उरलेल्या १८ नक्षत्रांमध्ये विविध प्रयोग करून वर्षाचं उत्पन्न दुप्पट तिप्पट करायलाही मजा येईल ना! नाहीतर पावसाळा वाया गेला म्हणून दु:ख करत बसणारे अन पुढचा पावसाळा येईपर्यंत हातावर हात धरून खंत करणारेही 'जगतात'च त्याचं आयुष्य, खरंतर ते रेटत असतात आयुष्य.… 

1 comment: