भूतकाळात अडकून न पडता वर्तमानात जगायचे आणि भविष्याची आखणी करायची असं मनाला कितीही समजावलं तरी वर्तमानात काही गोष्टी अशा घडतात, अशा पद्धतीने समोर येतात की आपण नकळत भूतकाळात डोकावतो. असेच काहीसे झाले आज…
"प्रेषित", १९८३ साली प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी लिहलेली ही विज्ञानकादंबरी.
"पृथ्वीप्रमाणेच दुसऱ्या कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी असेल का याचा गुप्तपणे शोध घेत असताना एका शास्त्रज्ञाच्या हाती लागलेली माहिती, त्याचा अपघाती मृत्यू, आणि त्याने त्या परग्रहावर पाठवलेल्या संदेशातून पुढे चाळीस वर्षांनंतर घडलेल्या घटना" नाट्यमय पद्धतीने रंगवल्या आहेत. वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद या कादंबरीत आहेच शिवाय १९८३ सालात कल्पना केलेल्या भविष्यात होऊ शकतील अशा कितीतरी गोष्टी आज २०१६ मध्ये खऱ्या वाटतात. मला खरोखर ही कादंबरी यासाठी आवडली की सामान्य माणसाला समजेल अशा रीतीने प्रसंगांची, वैज्ञानिक संकल्पनांची मांडणी केली आहे. ही कादंबरी वाचून पूर्ण झाली आणि मला आठवले…
मी नववीत होते तेव्हा एका परीक्षेमार्फत जिल्ह्यातून शंभरेक मुलांची निवड "विज्ञानमंच" या आठ दिवसांच्या कार्यशाळेसाठी झाली होती. सातारा जिल्ह्यातील त्या मुलांमध्ये मीही एक होते. माझ्यासह एकूण पन्नास मुलामुलींसाठी हे निवासी शिबीर होते. बाकीचे साताऱ्याच्या जवळपासचे (सातारा तालुक्यातील) असल्याने ते त्यांच्या घरूनच ये जा करत. त्यावेळी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज मध्ये ही कार्यशाळा चालू होती. आणि बी. एस्सी, एम एस्सी चे प्राध्यापक आम्हाला वेगवेगळे विषय शिकवत आणि प्रयोगाची प्रात्यक्षिकेही देत होते. या कार्यशाळेत आम्हाला विज्ञान शाखेतील अनेक विषयांची तज्ञांकडून ओळख करून दिली गेली. अनेक वैज्ञानिक प्रयोग स्वत: करायला मिळाले. तिथे मार्गदर्शन वर्ग चालू असताना आम्हाला बसल्या जागी चहा बिस्कीट मिळत असे याचे कोण कौतुक वाटायचे! एवढी Special treatment त्याआधी कुठेच मिळाली नव्हती. त्या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी उद्घाटनाच्या भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य आम्हाला उद्देशून म्हणाले होते "you are the cream of society" आजही ते शब्द आठवले की अंगावर मुठभर मास चढल्यासारखे वाटते.
सांगायचा मुद्दा हा होता की त्या कार्यशाळेतून एक दिवस आयोजक आम्हाला डॉ. जयंत नारळीकरांचे व्याख्यान ऐकायला घेऊन गेले. ते खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत हे आधीच सांगितले होते. त्यामुळे आम्ही चूपचाप जाऊन व्याख्यान ऐकत बसलो. त्यावेळी त्यांनी काय सांगितले ते आता फारसे लक्षात नाही (किंबहुना आठवत नाहीच). पण एका विज्ञानकादंबरीचे नाव "कृष्णमेघ" (The Black cloud) लक्षात राहिले आणि त्यांनी दिलेला पत्ता "आयुका, पुणे-७" असा वहीत लिहून ठेवलेला. ती वही रद्दीत गेली पण पत्ता लक्षात राहिला. पुढे मी अनेकवेळा फलटणला पुस्तक प्रदर्शन भरले की त्यात ते "कृष्णमेघ" मिळते का शोधत राहायचे. अनेक पुस्तके वाचली पण हे काही मिळाले नाही. मी हळूहळू ते विसरून गेले. मग मागच्या वर्षी मी जेव्हा इंटरनेट वापरून पुस्तकांची ऑनलाइन खरेदी करायला लागले तेव्हा या पुस्तकाची आठवण झाली. मी पुन्हा शोध सुरु केला पण माझ्या लक्षात राहिलेली गोष्ट अर्धीच खरी होती. मला त्या कादंबरीचे लेखक डॉ. नारळीकर आहेत असे वाटायचे. मला ती कादंबरी काही केल्या मिळत नव्हती. मग मी असेच एकदा दादरच्या पुस्तकांच्या दुकानात गेले तिथे मला डॉ. नारळीकरांचे विज्ञानकथांचा संग्रह असलेले "यक्षांची देणगी" पुस्तक दिसले. मी ते खरेदी केले आणि त्याची प्रस्तावना वाचताना मला हे समजले की The black cloud ही फ्रेड हॉयल यांनी लिहलेली कादंबरी आहे आणि ते डॉ. नारळीकर यांचे डॉक्टरेटचे मार्गदर्शक होते. आता मला ती कादंबरी नक्कीच मिळेल. आज 'प्रेषित' वाचली, आणि ती आवडली. आता "कृष्णमेघ"ही आवर्जून वाचेन.
No comments:
Post a Comment