संध्याकाळ…
कोणाला खुणावणारी, कोणाला हसवणारी…
कोणाच्या डोळ्यात पाणी आणणारी, काहीशी हुरहूर लावून जाणारी ….
मला मात्र या मावळत्या दिनकराच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी… अशी ही संध्याकाळ…
थोडावेळ सूर्यास्ताकडे पाहून मी माघारी फिरले आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आले, आणखी दोन क्षण न पाहते तर किती सुंदर दृश्य पाहण्यास मुकले असते कोण जाणे!!!
घरट्याच्या दिशेने जाणारा हा पाखरांचा थवा थोडा रेंगाळला… सूर्याला जणू प्रदक्षिणा घालत आहेत असा भास झाला... कॅमेऱ्याची सोबत आहेच आणि आता तर शब्दांनीही सोबत केली हे क्षण साठवून ठेवायला..आणि नकळत मी पुटपुटले ...
"अशाच एका सांजवेळी
नभी सोन्याचे कोंदण
सोन्याच्या गोळ्याला अन
पाखरांची ती माळ मनोरम"
आजकाल अनेक कवितांच्या प्रेमात पडले आहे. स्पृहा जोशी, शांता शेळके यांच्या कविता, चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्या वाचायला मिळत आहेत याचा आनंद आहेच, शिवाय माझ्या शब्दकोशात मोलाची भर पडते आहे आणि असे काहीसे सुचते आहे...आणि आजच जीएंची पत्रवेळा हाती पडली… ते म्हणतात "खरं सांगायचं तर, मला काव्याची देणगी नाही, पण मिजास मात्र आहे!" व्वाह!
khup chan..............
ReplyDelete