Sunday, 6 March 2016

फ्लेमिंगो फेस्टीवल


आज फ्लेमिंगो पक्षी पाहायला गेले होते. शिवडी जेट्टीजवळ हजारोंच्या संख्येने हे पाहायला मिळतात. मराठीमध्ये त्यांना रोहित पक्षी म्हटलं जातं. पण बहुतांश लोक फ्लेमिंगो या नावानेच ओळखतात. सौराष्ट्रातून स्थलांतर करून येतात ते हिवाळ्यात मुंबईला..मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मी पहिल्यांदा प्रत्यक्षात पाहिले फ्लेमिंगो.. सकाळची वेळ होती आणि खूप धुकं असल्यामुळे आधी नजरेस पडलेच नाहीत. आणि जेव्हा दिसले तेव्हा खूप दूर गेले होते ते.. इकडून तिकडे उडून जाताना जेवढे दृष्टीस पडले तेवढंच डोळ्यांना सुख लाभलं.. हळूहळू सूर्य माथ्याला आला आणि मी परतीचा रस्ता धरला.
यावर्षी मात्र योग्य वेळेला मी त्याठिकाणी पोहोचले. समुद्राच्या भरती- ओहोटीनुसार फ्लेमिंगो किनाऱ्याच्या जवळ किंवा दूर जात असतात. भरतीची वेळ संध्याकाळची होती आणि मी दुपारीच तिथे जाऊन बसले. आधी ते सर्व दूर होते. माझ्या नजरेच्या टप्प्यातही नव्हते आणि कॅमेऱ्याची लेन्ससुद्धा मला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याएवढी सक्षम नव्हती. हळूहळू पाणी किनाऱ्याकडे सरकू लागले आणि त्याचबरोबर फ्लेमिंगोही.. एरवी काही वाटत नाही. पण पक्षी पाहायला गेलो की दुर्बिणीची उणीव भासते. इतर लोकांकडे, पक्षीनिरीक्षक- अभ्यासकांकडे असते. मग त्यांचं पाहून झालं की त्यांना विनंती करून पाच मिनिटासाठी त्यांची दुर्बीण मागून घ्यायची. त्यातून दिसलं की आनंदी व्हायचं. ते सांगतील ती माहिती कानात आणि डोक्यात साठवून ठेवायची. पक्ष्यांचे आवाज ऐकायचे, हालचाली, चालणं, उडणं पाहायचं..त्यांचे प्रकार, राहणीमान, खाद्य समजून घ्यायचं.. मजा वाटते खूप.. चार पाच तास कसे गेले कळलेच नाही. सहा वाजेपर्यंत ते अगदी किनाऱ्यालगत आले. खूप जवळून पाहता आले. मनासारखे फोटो काढता आले. छान छान फोटो काढल्याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटावीशी वाटली.














आज तिथं गेले तेव्हा खूप गर्दी होती माणसांची.. आपल्यासारखीच आवड असणारे शेकडो लोक पाहून आनंद झाला. अगदी लहान लहान मुले कोणी आई- बाबांसोबत, कोणी शिक्षकांसोबत आलेली.. कुतूहलाने पाहत होती. अनेक प्रश्न विचारात होती. थोड्या वेळासाठी वाटलं लहानपणी असे शिक्षक मिळायला पाहिजे होते आपल्याला.. पक्षी प्राण्यांची माहिती थेट निसर्गात घेऊन जाऊन दाखवणारे, शिकवणारे..किंवा आईबाबांना एवढा वेळ, अशी आवड असायला पाहिजे होती.. पण नंतर तिथे आलेल्या काही वृध्द व्यक्तींकडे पाहिले. तेही आज प्रथमच हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवत होते. मग स्वत:ला समजावलं की आपण त्यांच्या तुलनेने तर खूप लवकर हा आनंद घेतोय. It’s never too late. आता फार उशीर झालाय असं म्हणून आत्ता केलं नाही तर आणखीच उशीर होणार. अगदी एखादी चांगली सवय असेल, चांगलं पुस्तक असेल, नवीन कला शिकायची असेल, नवीन छंद जोपासायचा असेल. मनात आलं की सुरु केला पाहिजे. उशीर झालाय, आता मी करू शकणार नाही असं म्हणून आपलं मन आपणच मोडता कामा नये. एक लक्षात आलं की ज्या उत्साहाने ती लहान मुले हे पक्षी पाहत होती तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्त उत्साह आणि कुतूहलाने ते आजी आजोबा सर्व निरखत होते. हे सुंदर दृश्य डोळ्यात साठवत होते. कदाचित आयुष्यभराच्या कमाईतून दमडी दमडी साठवून ठेवलेल्या आणि नुकताच नवीन खरेदी केलेल्या कॅमेरामध्ये हे क्षण टिपण्याचा आनंद घेत होते. आणि या सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून कुठेतरी आत मलाही समाधान मिळत होते.

No comments:

Post a Comment