मेळघाट… सातपुडा पर्वत रांगांमध्ये दडलेला अमरावती जिल्ह्यातील एक मोठा प्रदेश… हिरवी गर्द वनराई आणि गिरीशिखरांमधून नागमोडी वळणे पार करून गेल्यावर दिसणारी छोटी छोटी गावं … कोरकू आदिवासींची इटुकली-पिटुकली घरं…
हिरवा शालू नेसून साजशृंगार केलेल्या नववधूप्रमाणे सजलेली सृष्टी पाहावी तर मेळघाटातच… इथे डोळ्यांना शीतल सुखदता आणि मनाला गारवा देणारी हिरवळ चहूकडे पाहायला मिळते. शांत निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ रुळलो तर जणू निसर्गातील प्रत्येक अविष्कार आपल्याला साद घालतो. झाडांच्या पानांची सळसळ आणि झऱ्यांतून वाहणाऱ्या पाण्याची खळखळ ऐकताना जणू सतारीवरून अलगद बोटे फिरवल्यावर ऐकू येणाऱ्या नादमाधुर्याचा आभास होतो. पक्ष्यांचे कूजन कान तृप्त करतात आणि नकळत आपल्यालाही त्यांच्या वादसंवादात सामावून घेतात…
परंतू मेळघाटच्या या सृष्टीसौंदर्यात एक भीषण रखरखतं वास्तव लपलेलं आहे. सततचे बालमृत्यू आणि कुपोषण यांनी हा प्रदेश ग्रासलेला आहे. १९९७-९८ च्या पावसाळ्यात मेळघाटमध्ये होणारे बालमृत्यू आणि रोजच कानांवर येणाऱ्या बातम्या ऐकून पश्चिम महाराष्ट्रातील काही तरुण तिथे धावून गेले. आणि 'मैत्री धडक मोहिमे'अंतर्गत 'बालमृत्यू आणि कुपोषण' यासाठी झटणारे अनेक हात पुढे आले. गेली १८-१९ वर्षे दरवर्षी पावसाळ्यात ही मोहीम केली जाते आणि ज्या गावांत काम सुरु झालं तिथे कुपोषणाने होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण घटविण्यात मोठ्या प्रमाणावर यश आले आहे.
२०१२ च्या सप्टेंबर धडक मोहिमेसाठी जायचं असं मी ठरवलं आणि प्रवासाला निघाले.
कराड ते मेळघाटमधील धारणी तालुक्यातील कासमार पर्यंतचा प्रवास अगदी सुखकर झाला पण खरे आव्हान तर त्यापुढे होते. दुसऱ्या दिवशी काम सुरु करायचे म्हणून आमच्या ग्रुपमध्ये जे डॉक्टर होते त्यांनी आम्हाला लगेचच प्रशिक्षण दिले. औषधांची प्राथमिक ओळख, रोगांचा प्रादुर्भाव आणि त्याची लक्षणे एवढी पुरेशी माहिती अगदी सोप्प्या शब्दांत समजावून दिली.
कासमारपासून साधारण ४ किमी अंतरावर असणाऱ्या 'सावऱ्या' गावात मला काम करायचे होते. ६ वर्षांखालील मुलांच्या घरी दररोज भेट देऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करायची, योग्य ते औषधोपचार करायचे आणि गंभीर आजार असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जायचं असं ते काम… दिवसभरात १५ ते २० किमी पायपीट होत असली तरी चांगलं काम केल्याचं समाधान थकलेल्या चेहऱ्यावरही उठून दिसतं.
स्थानिक लोकांची कोरकू भाषा अवगत नसल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणं , जवळीक निर्माण करून आपल्याप्रती विश्वास संपादन करणं म्हणजे एक आव्हानच होतं. परंतू त्यांची बोलीभाषा शिकल्यामुळे त्यांच्यावर औषधोपचार करणं, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचं मोठं जिकिरीचं कामही तुलनेनं सोप्पं झालं.
आदिवासी लोकांचे प्रश्न सोडवायचे म्हणून एकेक प्रश्नाच्या मुळाशी जायचं तर वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तसे आणखी कित्येक प्रश्न एकामागोमाग एक येतात आणि मग आपण त्यात गुंतून जातो. ८-१० पाड्यांपलीकडे जग केवढे आहे याची त्यांना कल्पनाच नाही. शाळा पोचल्या तरी शिक्षण पोचले नाही ही या भागाची शोकांतिका आहे. आणि शिक्षण घेऊन नोकरी करायची तर गुलामांचं जिणं जगावं लागेल त्यामुळे शाळेत जायला माझ्या कोरकू बांधवांना मुळीच आवडत नाही. त्यामुळे शिक्षण कितीही भल्याचं असलं तरी त्याला त्यांचा स्पष्ट नकार आहे. त्यापेक्षा दिवसभर जंगलात भटकतील आणि आपल्याच शेतात राजासारखं राहतील.
माझ्या मेळघाट प्रवासात आणि मुक्कामात मला अनेक व्यक्ती आणि वल्ली भेटल्या. आमच्यासाठी रोज रुचकर जेवण बनवणारी माई, तिची १०-१२ वर्षांची भाची मालती, मधुभाऊंसारखे मार्गदर्शक, निलेशसारखा सतत धडपडणारा मित्र आणि कुपोषणाने ग्रासलेला, आईशिवाय राहणारा एक वर्षाचा हसता- खेळता अभय या सर्वांनी त्यांच्याही नकळत मला खूप गोष्टी शिकवल्या.
आयुष्यभर पुरेल एवढी अनुभवांची शिदोरी आणि न मागता साथ देईल अशी मैत्री सोबत घेऊन मी परतले.

खरोखर जगणं काय असतं आणि आपण काय जगतो याचा उहापोह करायचा असेल तर आयुष्यात एकदातरी मेळघाटला जाऊन आलंच पाहिजे असं मला वाटतं. शेवटी काय जगणं वसूल झालं पाहिजे.





No comments:
Post a Comment