Thursday, 6 October 2016

सफर: कास पठार

                प्रत्येक ठरलेला कार्यक्रम पूर्णत्वास जातोच असे नाही आणि कॉलेज संपल्यावर पुन्हा एकत्र भेटून फिरायला जाणे म्हणजे थोडे कठीणच. कोणाला सुट्टी नाही, कोणाला घरी जायचे आहे, कोणाची परीक्षा,कोणाला घरचे जाऊ देत नाहीयेत असे कोणाचे काय तर कोणाचे काय! आणि सगळ्यांनी आलेच पाहिजे असा आपला हट्ट.. मग दोन-चार वेळा असे ठरवलेले प्लॅन रद्द होत गेले की हट्ट सोडावा लागतो आणि जेवढे जमतील त्यांना तरी भेटू म्हणून मग दोघं-चौघं भेटणे सुरु होते. तरीही आमची जवळपास सात- आठ महिने रखडलेली मुंबई दर्शनची योजना पार पडली आणि तिथेच कास ट्रीपचा मुहूर्त ठरला. तोही दोन आठवडे पुढे ढकलला गेला आणि शेवटी परवाच्या शनिवारी आम्ही भेटलोच. मी नाही आले तरी तुमची ट्रिप कॅन्सल करू नका म्हणत मीच साताऱ्यात पहिल्यांदा दाखल झाले, होय नाही करत चंचल, शितल आणि अब्दुल आले, आणि फिक्स येणारच होते असे संकेत आणि ऋतुराज मुसळधार कोसळणाऱ्या पावसातच पुण्याहून निघाले. तशाच पावसात बसेस मिळत नसल्याने रखडत रखडत मजल दरमजल करत सायली आणि अमोलही रात्री साताऱ्यात हजर झाले. संकेतच्या घरी चहा आणि भजी, नंतर अजिंक्यला जेवण आणि रात्री आईस्क्रीम पार्टी!    

                   रविवारी सकाळी सुपनेकरांच्या नाश्तासेंटर मध्ये गरमागरम पोहे खाल्ले. आणि ५ गाड्यांवर ९ जण निघालो. कासची सफर करायला.... 

"सहज सोप्पे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे" 
अशा रोमँटिक मूड मध्ये सातारा ते कासचा प्रवास दुचाकीवरून केला. (रोमँटिक मूड असला तरी चंचलसोबत प्रवास केला ही गोष्ट वेगळी) इतके सुंदर दृश्य होते,  अक्षरशः ढग डोंगराच्या पायथ्याशी येऊन बसलेत असे  दिसत होते. 

           
थंडगार वारा, सगळीकडे दाटलेले धुके आणि मोकळा रस्ता! धरणीमाता हिरवा शालू नेसून नटलेल्या नववधूसारखी सुंदर दिसत होती.. कसलीही मरगळ, थकवा पळून जाईल इतके छान वातावरण! कोणी मागे कोणी पुढे असे करत आणि आलटून पालटून गाडी चालवत पठारावर पोहोचलो. 


पठारावरची इवली इवली छोटी फुले...थोडे मोकळे आकाश असेल, पावसाने उघडीप दिली आणि सूर्याची किरणे डोकावू लागली की दूरवर पाहावे तिकडे फुलेच फुले दिसतात हा अनुभव मला मागच्या वेळी आलेला पण यावेळी दिवसभर पाऊसच होता. थोडावेळ फिरलो त्यात आभाळी, तेरडा, सोनकी, अबोलिमा, टोपली कारवी, सीतेची आसवे/ निळी पापणी अशी काही फुले पाहिली शिवाय अजून काही ज्यांची नावे माहित नाहीत तीही पाहिली. कारवीची फुले दर सात वर्षांनी फुलतात हे काही दिवसांपूर्वीच समजले त्यामुळे ती यावर्षी पाहता आली याचा खूप आनंद वाटला. नेत्रसुख घेतलेच आणि आठवणी म्हणून कॅमेऱ्यात बंदिस्तही केली.


                  पोहोचल्यावर झालेली चुकामुक, तिथे चॉकोलेटच्या बदल्यात फोटोला पोझ देणारा  छोटा दोस्त, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी...गारठून गेल्यावर मधेच घेतलेला चहा...मित्रांच्या गप्पा आणि चेष्टामस्करी, तलावावरचा गारठा आणि तिथे घेतलेला गवतीचहा, वडापाव, भजी आणि पुन्हा चहा... सगळेच अविस्मरणीय!

                 कासहून परतीची वाट लवकर धरली कारण पुढे सज्जनगडला जायची माझी खूप इच्छा होती. साताऱ्यात कित्येकदा जाणे झाले पण सज्जनगड अजून पाहिलाच नाही अशी खंत यावेळी सोबत घ्यायची नव्हती. दुपारी तीनच्या दरम्यान आम्ही सज्जनगडला जायला निघालो. तिकडेही मोकळा रस्ता, आजूबाजूचे हिरवे सौंदर्य डोळ्यात साठवत गडावर पोहोचलो. चढताना अकरा मारुतींचे आणि गडावर श्रीरामांचे तसेच समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेऊन, घरून आणलेल्या शिदोरीवर ताव मारून आता शहराकडे मोर्चा वळवला. (दुसऱ्या दिवशी साताऱ्यात दुसरा मोर्चा निघणार होताच पण त्याचा आणि आमच्या या मोर्चाचा संबंध फक्त रात्री पुण्या-मुंबईला जाणाऱ्या गाड्यांच्या कमतरतेपुरता जाणवला.)
साताऱ्यात येऊन आम्ही चारभिंती ला गेलो. उंचावरून दिसणारे संपूर्ण शहराचे विहंगम दृश्य अतिशय विलोभनीय...

इथे येऊन थोडे निवांत बसलो... एक दिवसासाठी का असेना पण दैनंदिन आयुष्यातून असा वेळ काढून मित्रांना भेटलो, निसर्गाच्या सानिध्यात गेलो की बरे वाटते. अजून काही दिवसांसाठी पुन्हा रहाटगाडग्यात रमायला मनाची तयारी होते, आणि याच मित्रांसोबत पुढची योजना मनात आपली बैठक जमवू लागते.


पुढच्या ट्रिपची आखणी होईपर्यंत या आठवणींमध्ये रमू... त्यासाठी काही हसऱ्या क्षणांचे हे कोलाज!

7 comments:

  1. Too superb yr megha...
    Keep it up👍

    ReplyDelete
  2. Awesome!! Point to point lihilay...mast😇

    ReplyDelete
  3. Awesome!! Point to point lihilay...mast😇

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेख...����..वाचताना तिथे परत असल्याचा भास होत होता .superb megha.

    ReplyDelete
  5. well written Avadla majay tumchi sarvanchi !
    -Sayli's friend
    Durgesh

    ReplyDelete